Dharashiv News Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Success Story : नाईकनवरे बंधूंनी माळरान जमीन केली कसदार

Team Agrowon

विकास गाढवे

Dharashiv News :धाराशिव जिल्ह्यातील ढोराळा (ता. कळंब) सुनील व भैरवनाथ नाईकनवरे या दोघा भावांनी माळरानावरील २५ एकर आणि पाच एकर मुरमाड जमिनीचा कायापालट केला आहे. एकेकाळी दुसऱ्याच्या दुकानामध्ये मजूर म्हणून काम करणाऱ्या दोघा भावांनी शेतीमध्ये प्रगती करत आज स्वतःच्या दुकानाचे मालक झाले आहेत.

ढोराळा (ता. कळंब, जि. धाराशिव) येथील सुनील व भैरवनाथ नाईकनवरे बंधूंची घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे दोघेही मुरूड (ता. लातूर) येथील एका ठिबक संच विक्रीच्या दुकानात काम करत होते.

‘कमवा व शिका’प्रमाणे दुकानात काम करत शिक्षण पूर्ण करीत शेतीकडे लक्ष दिले. दरम्यानच्या काळात सुनील नाईकनवरे यांनी शेतीची खूप आवड जपण्यासाठी आष्टी (जि. बीड) येथील भीमराव धोंडे कृषी महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले.

त्यांनी पूर्णपणे शेतीमध्ये झोकून देत थोरले बंधू भैरवनाथ यांच्या मदतीने पंचवीस एकर माळरान व पाच एकर मुरमाड जमिनीचा कायापालट केला. शेतीमध्ये मिश्रपिकांच्या लागवड तसेच भैरवनाथ ठिबक संच विक्री दुकानाच्या उभारणीतून आर्थिक उन्नती साधली आहे. सध्या नाईकनवरे बंधूंची वार्षिक उलाढाल सुमारे ४२ लाखांच्या पुढे आहे. दोघे भावांनी मिळून माळरानावरील जमीन कसदार केली आहे.

माळरानावर फुलविली डाळिंब बाग ः

नाईकनवरे बंधूंची वडिलोपार्जित २५ एकर माळरान, तर ५ एकर मुरमाड जमीन होती. दीड फूट खोदले तरी फक्त कडक पाषाण. शेतीतून फारसे काही मिळत नसल्याने आई व वडील मजुरी करायचे. त्यामुळे नाईकनवरे बंधुंकडे कामाशिवाय पर्याय नव्हता.

कृषी पदवी घेतल्यानंतर सुनील यांनी माळरानातील जमिनीवर काम करण्यास सुरुवात केली. दुसरीकडे भैरवनाथ यांनी शिराढोण व त्यानंतर मुरूड येथे ठिबक संच विक्रीचा व्यवसाय सुरू केला.

माळरानातील पाच एकरांत सुनील यांनी सुरुवातीला पंधरा फुटांतील माती एकत्र करून बेड तयार केले. त्यावर डाळिंब बाग फुलविली. तीन वर्षांत बागेतून उत्पन्न सुरू झाले. डाळिंबातूनच खऱ्या अर्थाने प्रगतीला सुरुवात झाली. पाच महिन्यांपूर्वीच वडील व्यंकटराव यांचे निधन झाले. त्यांनी श्रमाचे संस्कार दोघांवर केले असे भैरवनाथ सांगतात.

गाळमाती देई धनधान्य ः

कुटुंबाची हलाखीची परिस्थिती बदलण्यासाठी माळरानाची जमीन लागवडीखाली आणण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यासाठी सुरुवातीला नांगरणी करून दगड वेचले. सगळे दगड गोळा करून बांधावर टाकले. शेती करण्याचा उत्साह व आनंद वेगळाच होता.

त्यामुळेच जोशही यायचा. डाळिंब बाग व ठिबक संच विक्रीच्या दुकानातून चांगले उत्पन्न येऊ लागल्याने माळरानावर गाळ टाकण्याचे ठरविले. ढोराळा व तेरणा प्रकल्पातून गाळ आणत १४ एकरांमध्ये टाकून घेतला.

यामुळे जमीन सुपीक झाली. उर्वरित जमीन दरवर्षी नांगरून व दगड वेचून पिकाखाली आणली. मुरमाड पाच एकर जमिनीवरही गाळ टाकून त्यावर उसाचे उत्पादन सुरू केले. सध्या दीड महिन्याचा ऊस चार कांड्यात आहे असे सुनीलराव सांगतात.

भाजीपाल्यासह फळपिके, फुलशेती ः

कृषी पदवीधर असलेल्या सुनील यांना कोणते पीक कोणत्या वेळी घ्यावे, याचा पक्का अंदाज आला आहे. खरिपात राजमा, भुईमूग, सोयाबीन, तर रब्बीत ज्वारी, गहू व हरभरा शिवाय बारमाही ऊस लागवड असते.

त्यानंतर कांदा, कोथिंबीर, पपई, झेंडू, टरबूज, खरबूज आदी पिकांच्या जोडीला भाजीपाला व फळपिकांची लागवड केली जाते. डाळिंब बागेतून दरवर्षी सरासरी बारा लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.

टरबूज लागवडीतून दरवर्षी चांगली आर्थिक उलाढाल होते. सर्वाधिक अकरा किलोचा टरबूज व तीन किलो वजनाच्या खरबुजाचे उत्पादन घेतले आहे. अनुभवातून बाजारपेठेचा अभ्यास चांगला झाल्याने योग्य भाव मिळण्यास मदत झाली. एकावर्षी दीड एकर आले लागवडीतून सात लाखांचे उत्पन्न मिळाले. यातून शेतीला टर्निंग पॉइंट मिळाल्याचे भैरवनाथ सांगतात.

पहाटे तीन वाजता उठून शेतीकाम ः

कुटुंबांतील सगळे शेती कामांमध्ये स्वतःची भूमिका बजावतात. आई सुमन यांचे वय ६० वर्षे आहे. तरी देखील त्या आवडीने शेती कामे करतात. भैरवनाथच्या पत्नी सौ. भाग्यश्री व सुनील यांच्या पत्नी सौ. सविता या दोघी देखील शेतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.

भैरवनाथ दिवसातून किमान तीन तास शेतीकामे आणि दिवसभर ठिबक संच विक्रीच्या दुकानाची जबाबदारी सांभाळतात. हंगामात दोघे भाऊ पहाटे तीन ते सकाळी साडेआठपर्यंत शेतीकामांमध्ये व्यस्त असतात.

आधी मजुरी आता दुकानाचे मालक ः

दुकानात काम करून कुटुंबाला आधार देताना भैरवनाथ यांनी शिक्षणाला बारावीनंतर विश्रांती दिली. सुरुवातीच्या काळात ठिबक व तुषार संच विक्रीच्या दुकानात मजूर म्हणून काम केले. त्यानंतर स्वतःचे ठिबक व तुषार संच विक्रीचे दुकान थाटले. अशारीतीने एकेकाळी मजूर म्हणून काम करणारे भैरवनाथ आज स्वतःच्या दुकानाचे मालक व ठिबक संच कंपन्यांचे अधिकृत विक्रेते (डीलर) आहेत.

दोन शेततळे व विहिरीतून शाश्‍वत सिंचन ः

शाश्‍वत सिंचनासाठी दीड एकरावर शेततळे खोदले आहे. माळरान जमिनीतून पाणी झिरपल्याने थोडा पाऊस पडला की विहिरींना पाणी येते. शेततळे, तीन विहिरी व दोन विंधन विहिरीचे पाणी शेतीला पुरेसे होते.

सध्या दोन एकरांमध्ये नव्याने ३५० फूट लांब, २०० फूट रुंद व ३५ फूट खोलीच्या शेततळ्याचे खोदकाम चालू आहे. त्यात आताच पाणीसाठा झाला आहे. सिंचनासाठी तुषार सिंचन, ठिबकवर अधिक भर दिला जातो. कृषी विभागातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ नाईकनवरे बंधूनी घेतला आहे.

खूप दिले तरी शेतीची अखंड सेवा ः

शेतीतून चांगले उत्पन्न मिळू लागल्यानंतर आणखी साडेतीन एकर जमीन खरेदी केली. दोन बहिणींची लग्न केली. नवीन घर बांधले. शेतात शेड बांधले. मुरूडमध्ये स्वतंत्र दुकान खरेदी केले. मुले चांगल्या शाळेत शिक्षण घेत आहेत.

येत्या काळात डाळिंब बागेचे क्षेत्र वाढवून त्याला क्रॉप कव्हर लावण्याचा विचार आहे. सध्या गोठ्यामध्ये गीर गाईंसह देशी गाई आहेत. गोठ्यातून १५ ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. आगामी काळात मुक्त गोठा करून गीर गाईची संख्या वाढवणार आहे. ट्रॅक्टर व अवजारे खरेदी करायची आहेत. असा मानस भैरवनाथ व सुनीलराव यांनी व्यक्त केला.

सुनील नाईकनवरे. ९५७९६६२१६५,
भैरवनाथ नाईकनवरे, ९४२१३११८३८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT