Paddy  agrowon
ॲग्रो विशेष

Crop Advisory : भात, नागली, काजू, आंबा पिकासाठी कृषी सल्ला (कोकण विभाग)

Team Agrowon

खरीप भात

BSKKV, Dapoli : फुटवे अवस्था रत्नागिरी जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या संभाव्य पावसात भात खाचरांचे बांध व त्यातील पाणी पातळी टिकून राहण्यासाठी बांधबंदिस्ती व्यवस्थित करून घ्यावी. आवश्यकता भासल्यास बाह्य स्रोतातून शेतीमध्ये पाणी घेता येईल अशी व्यवस्था करावी. पावसाची तीव्रता कमी असताना लागवडीनंतर ३० ते ४० दिवसांनी भात पिकाला ८७० ग्रॅम युरिया प्रति गुंठा या प्रमाणे नायट्रोजनयुक्त खताचा दुसरा हप्ता द्यावा. अधूनमधून पडणारा पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे कमी जमिनीच्या भातावर निळे भुंगेऱ्यांचा (ब्लू बीटल) प्रादुर्भाव होऊ शकतो. या किडीच्या प्रादुर्भावासाठी पिकाचे निरीक्षण नियमितपणे करत राहा. या किडीचा प्रादुर्भाव दिसत असल्यास पाऊस नसताना) फवारणी प्रति लिटर पाणी क्विनालफॉस (२५ टक्के ईसी) २ मिलि किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के ईसी) ०.५ मिलि. भाताच्या शेतातून खेकडे नियंत्रित करण्यासाठी, १ किलो शिजवलेल्या तांदळाच्या मदतीने आमिष तयार करा. शिजवलेल्या भातामध्ये ५० ग्रॅम गूळ आणि ॲसीफेट*(७५ डब्ल्यूपी) ७५ ग्रॅम मिसळावे. त्याचे सुपारी आकाराचे १०० गोळे बनवावेत. हे गोळे खेकड्यांच्या जिवंत बिळानजीक ठेवावे. खेकड्याची जिवंत बिळे लक्षात येण्यासाठी आमिष ठेवण्यापूर्वी एक दोन दिवस प्रत्येक बिळानजीक साध्या भाताचे गोळे ठेवावेत. बिळे मातीने बंद करावीत. दुसऱ्या दिवशी जी बिळे ओल्या चिखलासह उघडी झालेली असतील, तिथे वरील विषारी आमिष गोळे टाकावेत. चांगल्या नियंत्रणासाठी हा प्रकार ७ दिवस चालू ठेवावा. शेजारी शेतकऱ्यांसह एकाच वेळी केल्यास खेकड्यांच्या नियंत्रणासाठी चांगला फायदा होतो. (* लेबल क्लेम नाही, अॅग्रस्को शिफारस.)

आंबा

वाढीची अवस्था आंबा बागेमध्ये पॅक्लोब्युट्राझोलची मात्रा देण्याचे काम पावसाची तीव्रता कमी असताना पूर्ण करून घ्यावे. या रसायनाचा वापर करताना जमीन वाफसा स्थितीत असणे गरजेचे आहे. खताची मात्रा दिलेल्या हापूस आंबा बागेमध्ये एक महिन्यानंतर पॅक्लोब्युट्राझोलची आळवणी करावी. हापूस आंब्यामध्ये वर्षाआड फळे धरण्याचा गुणधर्मविशेषतः १० वर्षांनंतरच्या बागेमध्ये प्रकर्षाने दिसून येतो. यासाठी पूर्ण वाढलेल्या (१० वर्षांवरील) हापूस आंब्याला दरवर्षी नियमित फळे धरण्यासाठी झाडाच्या विस्ताराचा पूर्व-पश्‍चिम व दक्षिण-उत्तर व्यास मोजून त्याची सरासरी काढावी. विस्ताराच्या प्रति मीटर व्यासास ३ मिलि या प्रमाणात वाढनियंत्रकाची (पॅक्लोब्युट्राझोलची) मात्रा पावसाची तीव्रता कमी असताना द्यावी. पॅक्लोब्युट्राझोलची आवश्यक मात्रा ३ ते ५ लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. झाडाच्या बुंध्याभोवती विस्ताराच्या निम्म्या अंतरावर १० ते १२ सें.मी. खोल अशा सम अंतरावर तयार केलेल्या २५ ते ३० खड्ड्यांमध्ये वरील द्रावण समप्रमाणात ओतावे. नंतर खड्डे मातीने बुजवून टाकावे. पॅक्लोब्युट्राझोल देण्यापूर्वी झाडाभोवती असलेले तण काढून टाकावे.

काजू

वाढीची अवस्था मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता लक्षात घेता काजूच्या ४ वर्षांवरील प्रति कलम ४० किलो शेणखत किंवा हिरवळीचे खत, २ किलो युरिया, १.५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ५०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश ही खते कलमाच्या विस्ताराच्या थोडीशी आत बांगडी पद्धतीने चरात द्यावीत. त्यानंतर चर बुजवून घ्यावा. वर दिलेली खताची मात्रा चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या लागवडीस देताना पहिल्या वर्षी १/४, दुसऱ्या वर्षी १/२, तिसऱ्या वर्षी ३/४ पट मात्रा व चौथ्या वर्षी आणि त्यावरील झाडांना खतांची संपूर्ण मात्रा द्यावी.

नागली, वरी पुनर्लागवड

तणांचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लागवडीनंतर दोन ते तीन आठवड्यांनी बेणणी करावी. विशेषतः लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांपर्यंत नत्र खताचा दुसरा हप्ता देण्यापूर्वी बेणणी करून घ्यावी.

वेलवर्गीय भाजीपाला

वाढीची अवस्था किंवा फुलोरा पडवळ, कारली, दुधी भोपळा, शिराळी पिके वेल टाकू लागल्यावर त्यांना शिऱ्या लावून आधार द्यावा. आधारासाठी मंडपाची व्यवस्था करावी. वेलवर्गीय भाजीपाला पिकास नत्र खताची दुसरी मात्रा प्रति वेल १० ग्रॅम युरिया या प्रमाणात लागवडीनंतर एक महिन्याने समप्रमाणात विभागून द्यावी. नत्र खताची मात्रा देताना बेणणी करून बुंध्याजवळील माती भुसभुशीत करून वेलीस मातीची भर द्यावी. काकडीवर नागअळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास नियंत्रणासाठी फवारणी करावी. प्रमाण प्रति लिटर पाणी प्रोफेनोफॉस १ मिलि किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मिलि.

संपर्क ; ०२३५८-२८२३८७ डॉ. विजय मोरे, ०९४२२३७४००१

(कृषी विद्यावेत्ता आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Rabbi 2025 : तेलबिया पिकांसाठी भावांतरचा पर्याय तर कडधान्याची खरेदी वाढवा; कृषी मूल्य व किंमत आयोगाची शिफारस

Crop Loan : पीककर्जासाठी सीबिल धोरण बदला

Tractor Market : येवल्यात १५० वर ट्रॅक्टरची खरेदी

Orange Crop Damage : संत्रा नुकसानग्रस्तांसाठी १३४ कोटींची मागणी

Soybean Market : नांदेड जिल्ह्यात १७ ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्र

SCROLL FOR NEXT