Mango Advisory : आंबा सल्ला (कोकण विभाग)

Mango Farming : आंबा बागेचे योग्य व्यवस्थापन आणि त्याबाबतचे सल्ले या लेखातुन पाहुयात.
Mango Farming
Mango FarmingAgrowon

Mango Orchard Management :

फुलोरा ते फळधारणा अवस्था

आंबा मोहरावर आणि लहान फळांवर फुलकिडींचा (थ्रीप्स) प्रादुर्भाव दिसून येत आङे. या किडीच्या प्रादुर्भावामुळे कोवळ्या सालीचा भाग खरवडल्यामुळे तो भाग काळा पडतो, पाने वेडीवाकडी होतात व नंतर गळून पडतात. मोहराचे दांडे खरवडल्यासारखे दिसतात. मोहर काळा पडून गळून जातो. प्रादुर्भाव दिसून येत असल्यास फुलकिडींच्या नियंत्रणासाठी स्पीनोसॅड (४५ टक्के) ०.२५ मि.लि. प्रति लिटर पाण्यातून फवारावे.

फळधारणा झालेल्या आंबा बागेमध्ये फळगळ कमी करण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेनुसार आठवड्यातून एकदा १०० लिटर पाणी प्रति झाड किंवा १५ दिवसांतून एकदा १५० ते २०० लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणात द्यावे. झाडाच्या बुंध्याभोवती आळ्यामध्ये गवताचे आच्छादन करावे.

आंबा फळांचे प्रखर सूर्यकिरणांपासून संरक्षण होण्यासाठी आणि फळांचा आकार व वजन वाढून डाग विरहित फळे मिळावीत, यासाठी गोटी ते अंडाकृती आकाराच्या फळांना २५ × २० सें.मी. आकाराच्या कागदी/ वर्तमानपत्राच्या पिशव्यांचे आवरण घालावे. आवरण घालताना फळाच्या देठाकडे इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. फळमाशीपासूनही संरक्षणास मदत मिळेल.

Mango Farming
Mango Farming : आंबा बागेतील फळगळीची कारणे अन् नियंत्रण उपाय

फळांचे उत्पादन वाढविणे आणि प्रत सुधारणे या साठी पोटॅशिअम नायट्रेट (१ टक्का) म्हणजेच १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती अवस्थेत असताना एकूण तीन फवारण्या कराव्यात.

अनेक ठिकाणी मोहर/फळधारणा अवस्थेतील आंब्यावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तुडतुडे मोहरातील, कोवळ्या फळातील रस शोषून घेत असल्यामुळे मोहराची गळ होते. यासोबतच त्यांनी शरीराबाहेर टाकलेल्या मधासारख्या चिकट पदार्थामुळे पानावर काळी बुरशी वाढते. या किडीची आर्थिक नुकसानीची पातळी (पालवी/मोहर अवस्था ५ किंवा त्या पेक्षा अधिक तुडतुडे प्रति पालवी/मोहर) ओलांडली असल्यास कीटकनाशकाची फवारणी करावी.

Mango Farming
Mango Farming : सातत्यपूर्ण प्रयोगांमधून वाढविला आंब्याचा दर्जा

फवारणी प्रमाण - प्रति लिटर पाणी

अ) बोंगे फुटण्याच्या अवस्थेत, लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि.

ब) मोहर फुलण्यापूर्वीच्या अवस्थेत, इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के प्रवाही) ०.३ मि.लि. किंवा ब्युफ्रोफेझीन (२५ टक्के प्रवाही) २ मि.लि.

क) वाटाणा अवस्थेत असताना, थायोमेथोक्झाम (२५ टक्के दाणेदार) ०.१ ग्रॅम.

नवीन आंबा लागवड

नवीन लावलेल्या आंबा कलमांना पहिली तीन वर्षे पाणी देण्याची व्यवस्था करावी. जोडाच्या खाली बुंध्यावर येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी. पहिल्या वर्षी आठवड्यातून दोनदा, तर दुसऱ्या वर्षी पंधरा दिवसांतून दोनदा व तिसऱ्या वर्षी महिन्यातून दोनदा प्रत्येक कलमांना ३० लिटर पाणी देण्याची व्यवस्था करावी. झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे.

डॉ. विजय मोरे, ९४२२३७४००१

(ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना आणि कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com