Ratnagiri News : वानर, माकडांच्या त्रासामुळे शेतकरी हवालदिल झाले असून वानरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, या मागणीसाठी गोळप येथील शेतकरी अविनाश काळे यांनी गुरुवारपासून (ता. ५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण शुक्रवारी (ता. ६) मागे घेतले. पालकमंत्री उदय सामंत यांनी दुपारी उपोषणस्थळी काळे यांची भेट घेऊन वनमंत्र्यांसोबत बैठक घेण्याची ग्वाही दिली. त्यानंतर काळे यांनी उपोषण मागे घेतले.
या प्रसंगी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, की शेतकऱ्यांचे प्रश्न मी समजून घेतले आहेत. शेतकऱ्यांना माझा पाठिंबा आहे. परंतु वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे जपानच्या दौऱ्यावर आहेत. ते ११ तारखेला आल्यानंतर पुढील आठ दिवसांत त्यांच्यासमवेत अविनाश काळे व रत्नागिरीतील शेतकऱ्यांची बैठक आयोजित करू. यातून मार्ग निघेल, असे मी आश्वासन देतो. आपण उपोषण स्थगित करावे.
सामंत यांच्या विनंतीवरून काळे यांनी बेमुदत उपोषण स्थगित केले. बैठकीत तोडगा न निघाल्यास पुन्हा उपोषण करू, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. उपोषणाकरिता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तन, मन, धनाने सहकार्य केले. भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, उदय बने, आंबा बागायतदार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश साळवी, सहकारतज्ज्ञ अॅड. दीपक पटवर्धन, शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष व भारतीय किसन संघाचे अध्यक्ष, शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी भेट दिली.
जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत पत्र देण्यात आले. रत्नागिरी तालुक्यातील अनेक शेतकरी, बागायतदार गुरुवारी उपोषणास्थळी आले. प्रत्येकाने जिल्हाधिकाऱ्यांना आम्हाला वानरांचा त्रास होत असल्याने व काळे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत असल्याचे पत्रही दिले.
शासनाने हा विषय गांभीर्याने घ्यावा, अन्यथा कोकणातील शेतकरी देशोधडीला लागेल, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. सायंकाळपर्यंत पाचशेहून अधिक शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता.
बागायतदारांना राखणीसाठी जादा भुर्दंड
वानर, माकडांच्या उपद्रवामुळे शेतकरी शेती, बागायती सोडून देत आहेत. प्रचंड कष्ट करून आणि पैसे खर्च करून पदरात वानर, माकडांमुळे काहीच पडणार नसेल तर शेती बागायती करायची कशाला? आज आंब्याची पन्नास झाडे असली तरी एक माणूस आंबे राखण्यासाठी ठेवावा लागतो.
झाडे थोडी किंवा जास्त आली तरी एका माणसाचे सहा महिन्यांचे किमान ७५,००० रुपये खर्च असतो. शिवाय फवारण्या कराव्या लागतात. हा खर्च लाखोंवर जातो. वानर, माकडांच्या उपद्रवामुळे राखणीसाठी खर्च जादा करावा लागत आहे. स्थानिक कामगार मिळत नसल्याने गुरख्यांना बोलवावे लागते. माकडांच्या त्रासामुळे अनेकांनी बागा करणेही सोडून दिले आहे, असे काही बागायतदारांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.