Onion Rate  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Market Rate : अकरा गोण्या कांदा विकून उरले ११ रुपये

Onion Bajarbhav : अवकाळी पाऊस, गारपिटीने नुकसान, त्यात गेल्या सहा महिन्यांपासून कांद्याला दर नसल्याने शेतकऱ्यांच्या केवळ डोळ्यात पाणीच नाही तर शेतकऱ्यांना अक्षरशः रडायला लावण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Suryakant Netke

Nagar Onion Rate : अवकाळी पाऊस, गारपिटीने नुकसान, त्यात गेल्या सहा महिन्यांपासून कांद्याला दर नसल्याने शेतकऱ्यांच्या केवळ डोळ्यात पाणीच नाही तर शेतकऱ्यांना अक्षरशः रडायला लावण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

नेवासा तालुक्यातील एका शेतकऱ्याने दोन दिवसांपूर्वी ११ गोण्या कांदा विकला. ११ गोण्या कांदा विकूनही केवळ ११ रुपये शिल्लक राहिले. घोडेगाव (ता. नेवासा) बाजार समितीत किलोला १ रुपया ४० पैसे कांद्याला दर मिळाला आहे.

राज्यातील नगर, नाशिक, पुणे, सोलापूर, बीड, लातूर, औरंगाबाद आदी जिल्ह्यांत कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. कृषी विभागाकडे कांदा लागवडीची नेमकी माहिती उपलब्ध केली जात नसली तरी पस्तीस ते चाळीस लाख हेक्टरच्या जवळपास कांद्याचे क्षेत्र असते.

गेल्या दोन वर्षांपासून कांद्याचे क्षेत्र वाढतेच आहे. एकट्या नगर जिल्ह्यात गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट म्हणजे दोन लाख हेक्टर क्षेत्रावर कांद्याचे उत्पादन घेतले. साधारण एप्रिल-मे हा उन्हाळ कांदा काढणीचा कालावधी असतो.

यंदा मात्र या काळात आठ ते दहावेळा जोरदार अवकाळी पाऊस, गारपीट झाली. त्याचा परिणाम कांदा उत्पादनावर झाला आहे. कांदा भिजल्याने नुकसान झाले. आपसूकच बाजारात आवक वाढली आणि नेहमीप्रमाणे खरेदीदारांनी दर पाडले.

नेवासा तालुक्यातील घोडेगाव बाजार समितीत दोन दिवसांपूर्वी बाभूळखेड्याचे अनिल विधाटे यांनी ११गोण्या कांदा विकला. १ रुपया ४० पैसे प्रती किलो निच्चांकी दर मिळाला. वाहन भाडे, हमाली, मापाई व इतर खर्च वगळून ११ गोण्या कांद्यातून केवळ ११ रुपये शिल्लक राहिल्याची कांदापट्टी संबंधित शेतकऱ्यांला मिळाली आहे.

चार महिने राबून व एकरी साठ हजार रुपये खर्च करून मातीपेक्षाही कमी दराने कांदा विकावा लागत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. कांदा काढणी, शेतातून घरापर्यंत वाहतूक व इतर बाबी करूनही दराअभावी काहीच पदरात पडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतातच कांदा सोडून दिला आहे.

गेल्या काही दिवसापासून कांद्याला एक ते दोन रुपये किलोला दर मिळत आहे. अत्यंत चांगल्या कांद्याला जास्तीत जास्त सहा रुपये किलोपेक्षा अधिक दर नाहीत. मिळणारा दर लाजीरवाणा असल्याने आपल्या बाजार समितीत मिळणारा दर सांगून नामुष्की नको म्हणून काही दिवसापासून बाजार समित्यांनी कांदा लिलावाला मिळणारे दर सांगणेच बंद केले असल्याचे पाहायला मिळत आहेत.

टिकण्याची शक्यता कमीच

नगर जिल्ह्यासह राज्यात उन्हाळ कांद्याची एप्रिल-मे च्या कालावधीत काढणी केली जाते. या काळात बाजारात आवक वाढती असल्याने पुरेसा दर मिळत नाही. त्यामुळे दराच्या आशेने अगदी दिवाळीपर्यंत कांदा साठवून ठेवला जातो.

यंदा मात्र पावसात कांदा भिजल्याने कांदा फार काळ टिकेल अशी शक्यता दिसत नाही. त्यामुळे बाजारात नेल्याशिवाय पर्याय नाही आणि व्यापारी मातीमोल दराने खरेदी करणार हे निश्चित दिसत आहेत.

साठ हजार रुपये खर्च करून एक एकर कांद्याचे उत्पादन घेतले. त्याची काढणी केली. बारा टनाच्या जवळपास उत्पादन निघाले आहे. मजुरांची मजुरी द्यावी म्हणून त्यातील ११ गोण्या कांदा घोडेगाव बाजारात विक्रीला पाठवला. पट्टी हातात आल्यावर पैशाएवजी मनस्ताप हाती आला. खर्च जाऊन ११ गोण्या कांद्याचे ११ रुपये उरले. अशी जर परिस्थिती असेल तर शेतकरी जगणार कसा, अशा परिस्थितीतून आत्महत्या थांबतील कशा? शेतकऱ्यांचे ही होणारी परवड दिसत नाही का? शासनाने शेतकऱ्यांना आधार द्यायचा नाही मग कोण देणार?
अनिल लक्ष्मण विधाटे, कांदा उत्पादक शेतकरी, बाभूळखेडे ता. नेवासा, जि. नगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT