संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा
गंगापुर तालुक्यातील सिद्धपूर येथील शेतकरी गणेश गणगे यांनी मंगळवारी(ता. 9)सकाळी 10 वाजेच्या सुमारास एक ट्रॅक्टर कांदा गंगापूर येथील मार्केटमध्ये आणला होता.
त्याची प्रतवारी चांगली असताना देखील व्यापाऱ्यांनी या कांद्याला बोली लावून 105 रुपये क्विंटल भाव लावल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे होते. ती बाब त्यांनी बाजार समितीच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला.
खरेदी दराशी संबंध नाही मात्र थोडीफार मदत समिती करू शकते अशी भूमिका घेतल्यानंतर शेतकऱ्याच समाधान न झाल्याने त्याने कांदा बाजार समितीसमोर टाकला. जोपर्यंत दर मिळत नाही तोपर्यंत कांदा न उचलण्याचा इशारा दिला व तडक तहसीलदाराकडे धाव घेतली.
योग्य भाव न मिळाल्यास, आत्महत्या करतो असा इशारा दिला होता . यावेळी उपस्थित शेतकरी व पोलीस यांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. यानंतर सायंकाळी गणेश गणगे यांना बरोबर घेऊन शेतकरी नेते भाऊसाहेब शेळके यांनी टाकलेल्या कांद्याचा अंत्यविधी करून निषेध व्यक्त केला.
तीन दिवसाच्या आत गणेश गंगणे यांच्या कांद्याला दहा रुपये किलो भाव न दिल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाच्या समोर शेतकऱ्यांच्यावतीने मुंडन करून दहावा घालून आंदोलन करण्यात येईल असा शेतकरी नेते भाऊसाहेब शेळके यांनी दिला होता. त्यानंतर गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने 10 मे रोजी शेतकरी गणेश गणगे यांना पत्र दिले.
आपण कांदा बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर टाकला होता.तो उचलून न नेल्यामुळे बाजार समितीने तो उचलून समिती स्तरावर त्याची विल्हेवाट लावल्याचे कळविले होते. इकडे शेतकरी 10 रुपये प्रति किलो दर मिळवण्यावर ठाम मात्र होणार्या चर्चेतून तोडगा निघाला नाही त्यामुळे अंत्यविधी केलेल्या कांद्याचे दहाव शुक्रवारी घातल्याचे शेतकरी नेते शेळके म्हणाले.