Pune News : राज्यातील शेतकरी शेतमालाला हमीभाव नाही, सतत नैसर्गिक आपत्ती आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत आला आहे. यातच कुटुंबाच्या उदरनिर्वाहासोबत इतर प्रश्नांमुळे अडचणी वाढल्याने राज्यातील सुमारे १५ हजारहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आले आहे. ही माहिती मदत व पुनर्वसन विभागाच्या आकडेवारीवरून उघड झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे छ.संभाजी नगर आणि अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.
मदत व पुनर्वसन विभागाच्या माहितीनुसार जानेवारी २०१९ ते सप्टेंबर २०२४ या काळावधीत राज्यतील तब्बल १५ हजार ८२४ शेतकऱ्यांनी जीवन संपवले आहे. यात छत्रपती संभाजी नगर, अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्यांचे प्रमाण असून पुणे विभागात आत्महत्यांचे सर्वाधिक प्रमाण कमी आहे. पण नाशिक, नागपूर या विभागातील आत्महत्यांच्या प्रमाण पुणे विभागापेक्षा तुलनेने अधिक आहे.
अमरावती व छत्रपती संभाजी नगर विभाग
मदत व पुनर्वसन विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सर्वाधिक प्रमाण हे अमरावती व छत्रपती संभाजी नगर विभागात आहे. येथे २०१९ ते सप्टेंबर २०२४ पर्यंत अमरावती विभागात ६ हजार ४२१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर छ.संभाजी नगर विभागात ५ हजार ३९६ शेतकऱ्यांनी जीवन संपवले आहे.
यापाठोपाठ नाशिक विभागात २ हजार ०५९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून नागपूर विभागात १ हजार ७२८ शेतकऱ्यांनी जीवन यात्रा संपवली आहे. पुणे विभागात साडेपाच वर्षांत २१९ तर कोकण विभागात फक्त एका शेतकऱ्याने टोकाचा निर्णय घेतला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या साडेपाच वर्षांत प्रति वर्षी अडीज हजार पेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. २०१९ - २ हजार ८०८, २०२० - २ हजार ५४७, २०२१ - २ हजार ७४३, २०२२- २ हजार ९४२, २०२३- २ हजार ८५१ आणि २०२४ मध्ये १ हजार ९३३ असे एकूण १५ हजार ८२४ शेतकऱ्यांना आत्महत्याचे पाऊल उचलावे लागले आहे.
नेमकं आत्महत्यांचे कारण काय?
एकीकडे शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटले जात असतानाच राज्यात हजारो शेतकऱ्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. याचे कारण अनेक शेतकरीच केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरण असल्याचे सांगत आहेत. तर कर्जाचा बोजा, नैसर्गिक आपत्ती आणि खासगी सावकारीमुळे देखील शेतकऱ्यांना आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय घ्यावा लागला आहे.
सरकारचे हात शेतकऱ्यांच्या रक्ताने माखलेले : शेट्टी राज्य सरकारच्या एका विभागानेच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आकडे दिले आहेत. या आकड्यावरून केंद्र आणि राज्य सरकारचे हात शेतकऱ्यांच्या रक्ताने माखले असल्याचे सिद्ध होत आहे. यावर कोणतीच उपाय योजना केंद्र सरकार करत नाही. उलट राज्य सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहे. तर महाविकास आघाडीवाले या प्रश्नावर ब्र सुद्धा काढत नाहीत. हेच दुर्दैवी आहे.- माजी खासदार राजू शेट्टी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.