Raising Chickens
Raising Chickens Agrowon
ॲग्रो विशेष

Backyard Chicken Breed : परसबागेतील संगोपनासाठी देशी कोंबड्यांच्या विविध जाती

Team Agrowon

डॉ. आर. सी. कुलकर्णी, डॉ. के. वाय. देशपांडे

स्थानिक आनुवंशिक जैवविविधता आणि उत्पादनाची शाश्‍वतता राखण्यासाठी देशी कोंबडीच्या (Desi Chicken Breed) जातींचे संवर्धन महत्त्वाचे आहे. या कोंबड्या कमी गुणवत्ता असलेल्या खाद्याचे मांस व अंडीमध्ये अगदी सहजतेने रूपांतर करू शकतात.

नेकड नेक :

१) कोंबड्याचे मूळ स्थान अज्ञात आहे. परंतु असे मानले जाते, की नवव्या शतकाच्या शेवटी हंगेरियन विजेत्यांनी या कोंबड्या भारतात आणल्या असाव्यात.

२) मानेवरती पिसे किंवा हॅकल्स नसतात संगोपन मुख्यतः अंडी व मांस उत्पादनासाठी केले जाते.

३) इतर जातींच्या तुलनेत उष्ण आणि दमट वातावरणात या कोंबड्या उत्तमरीत्या तग धरू शकतात. वातावरणातील बदलाचा अंडी उत्पादन आणि पुनरुत्पादनावर फारसा फरक पडत नाही.

या जातीतील कोंबडीमध्ये उघडी मान यासाठी गरजेचा जनुक आहे. या वैशिष्ट्यामुळेच उपयोगी जनुकाचा वापर हा उष्ण उष्णकटिबंधीय ब्रॉयलर कोंबडी उत्पादन वाढीसाठी करता येतो.

४) लैंगिक परिपक्वता जवळ येताच उघडी त्वचा विशेषतः कोंबड्यामध्ये लालसर होते. अंडी उबवणुकीचा दर ५७.६६ टक्के आहे. एक कोंबडी वर्षाला सरासरी ७५ ते ९० अंडी देते.

हंसली :

१) ओडिशातील केओंझार आणि मयूरभंज जिल्ह्यात आढळते.

२) पिसांचा रंग प्रामुख्याने काळा असतो, तर शरीर गडद राखाडी असते. सभोवतालचे तापमान आणि आर्द्रता जास्त असतानाही या कोंबड्या कमी प्रमाणात पुरविण्यात येणाऱ्या खाद्यामध्ये चांगले उत्पादन देतात.

३) कोंबडीचे वजन कमी असते. भक्षकांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सहज उडू शकतात. कोंबडीचे सरासरी वजन २० आठवड्यांत १३१८ ग्रॅम आणि कोंबड्याचे वजन १६२९ ग्रॅम इतके भरते.

४) लैंगिक परिपक्वता येण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी लागतो. उत्पादित केलेली बहुतेक अंडी ही उबवण्यासाठी वापरली जातात. दरवर्षी उत्पादित केलेल्या अंड्यांची सरासरी संख्या ५० ते ६७ असते.

बसरा:

१) या जातीचे संगोपन महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या सीमेवर राहणारे आदिवासी बांधव करतात. परसातील कुक्कुटपालनासाठी ही जात फायदेशीर आहे.

२) कोंबडी आकाराने लहान असते. भक्षकांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कोंबड्या सरड्याप्रमाणे त्यांच्या शरीराचा रंग बदलतात.

३) पिसे पांढऱ्या रंगांची असतात. मान आणि शेपटीवरील पिसांचा रंग काळा असतो. खांदा, पंखांवर लाल-तपकिरी पिसे असतात.

४) कोंबडीची लैंगिक परिपक्वता ५ ते ७ महिने या वयोगटात येते. प्रतिवर्षी उत्पादित होणाऱ्या अंड्यांची सरासरी ४० ते ५५ असते. अंडी उबवणुकीचा दर ६० ते ८५ टक्के असतो.

दाओथिगीर :

१) ही जात आसाममधील मिरी, कोक्राझार, चिरांग, उदलगुरी आणि बास्का जिल्ह्यांत आढळते. मुख्यतः बोडो जमातींद्वारे अंगणात किंवा मुक्त संचार पद्धतीमध्ये संगोपन केले जाते.

२) या जातीचे नाव ‘थिगीर’ (डिलेनिया इंडिका) या वनस्पतीवरून आले आहे. थिगीरच्या फुलांचा आकार हा कोंबडीच्या डोक्यावर असणाऱ्या तुऱ्यासारखा असतो. बोडो भाषेत ‘दाओ’ शब्दाचा अर्थ ‘पक्षी’ असा होतो, त्यामुळे या जातीस दाओथिगीर हे नाव देण्यात आले.

३) कोंबड्या आकाराने लहान, परंतु वजनदार असतात. शरीरावर काळ्या, पांढऱ्या रंगांची पिसे आढळतात.

४) लैंगिक परिपक्वता येण्यासाठी ५ ते ८ महिन्यांचा कालावधी लागतो. कोंबडी वर्षाकाठी ६० ते ७० अंडी देते. अंडी उबवणुकीचा दर ८० ते ८५ टक्क्यांच्या दरम्यान असतो.

पंजाब ब्राऊन :

१) ही जात पंजाब आणि हरियाना राज्यात आढळते.

२) पिसारा तपकिरी असतो. कोंबड्याची शेपटी, पंख आणि मानेवर काळे पट्टे असतात.

३) संगोपन अंडी, मांस उत्पादनासाठी केले जाते. ५ ते ६ महिन्यांच्या कालावधीत लैंगिकदृष्ट्या परिपक्व होते.

४) दरवर्षी उत्पादित होणाऱ्या अंड्यांची सरासरी संख्या ६० ते ८० असते.

हरिणघट्टा ब्लॅक ः

१) ही जात पश्‍चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात आढळते. कोंबड्या आकाराने लहान असतात. त्यांचा रंग काळा असतो. नर आणि मादीच्या अंगावरील पिसांचा रंग काळा असतो.

२) कोंबडी ५ ते ६ महिन्यांत लैंगिकदृष्ट्या परिपक्व होते. वार्षिक अंडी उत्पादन सरासरी ९८ इतके आहे.

चितगाव ः

१) या जातीस ‘मलय’ म्हणून ओळखले जाते. ही जात बांगलादेश सीमेलगत असलेल्या ईशान्येकडील राज्यांमध्ये आढळते.

२) शरीराचा आकार मोठा असतो, पुढील बाजूस रुंद दिसतो, कंबरेचा भाग किंचित अरुंद असतो. इतर जातींच्या तुलनेत या कोंबडीची मान आणि पाय उंच असतात. पायावरती पंख नसतात. बहुतांश वेळा कोंबड्या सरळ स्थितीत थांबतात.

३) कोंबडी वर्षाकाठी ७० ते १२० अंडी देते.

काश्मीर फवरोला:

१) श्रीनगर, बारामुल्ला, अनंतनाग, बडगाम, कुपवाडा आणि पुलवामा जिल्ह्यात ही जात आढळते. या जातीसाठी थंड हवामान सर्वांत योग्य आहे.

२) तुऱ्यावर वैशिष्ट्यपूर्ण पंखांची टोपी (पिसांचा तुकडा) असतो. रोग प्रतिकारक क्षमता उत्तम असते. अंडी आणि मांसासाठी संगोपन केले जाते.

३) कोंबड्या वर्षाकाठी ६० ते ६५ अंडी देतात. अंड्याचे सरासरी वजन ४६.०६ ग्रॅम असते. लैंगिक परिपक्वता येण्यासाठी २१० दिवसांचा कालावधी लागतो. अंडी उबवणुकीचा दर ६४ टक्के आहे.

कौनायेन ः

१) ही जात मुख्यत्वे मणिपूर राज्यातील इम्फाळ आणि बिष्णुपुर या पूर्व आणि पश्‍चिम जिल्ह्यांत आढळते.

२) ‘कौना’ म्हणजे मणिपुरी भाषेत ‘लाथ मारणे किंवा लढणे’ आणि ‘येन’ म्हणजे ‘कोंबडी’ किंवा ‘कुक्कुट’. कोंबडीच्या लढाऊ वैशिष्ट्यांमुळे या जातीस कौनायन म्हणतात.

३) कोंबड्या त्यांच्या लढण्याच्या क्षमतेमुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात मोठा हातभार लावतात.

४) आठ महिन्यांच्या वयात कोंबड्यांना लढण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. या जाती अधिक विस्तारित कालावधीसाठी लढू शकतात.

५) लैंगिक परिपक्वता येण्यासाठी ५ ते ७ महिन्यांचा कालावधी लागतो. कोंबडी दरवर्षी सुमारे ३५ अंडी देते. अंडी उबवणुकीची क्षमता ८० टक्के आहे.

देशी कोंबडी संगोपनाचे फायदे ः

१) परसबागेतील कोंबडीपालनास योग्य जाती.

२) रोग प्रतिकारक शक्ती ही व्यावसायिक संकरित जातींच्या तुलनेत अधिक.

३) कमी-गुणवत्तेच्या खाद्याचे उच्च प्रतीच्या प्रथिनात रूपांतर करतात.

४) प्रतिकूल परिस्थितीशी सहज जुळवून घेतात.

५) अंडी, मांसाच्या चवीमध्ये लक्षणीय फरक आहे.

६) मातृत्व (ब्रूडीनेस) स्वभाव असतो.

डॉ. आर. सी. कुलकर्णी, ७७७६८७१८०० - (सहायक प्राध्यापक, कुक्कुटपालन शास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

डॉ. के. वाय. देशपांडे, ८००७८६०६७२ - (सहायक प्राध्यापक व विभाग प्रमुख, पशुपोषण विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : पीकविम्याचे बदल शेतकऱ्यांच्या किती फायद्याचे?

Weekly Weather : कमाल, किमान तापमानात वाढ; उष्णतेच्या लाटेची शक्यता

Mahabeej Seed : महाबीजने बियाण्यात साधली विक्रमी वाढ

Unseasonal Rain : नगरसह नेवासा, पारनेर, शेवगावमध्ये वादळी पाऊस

Summer Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची लागवड यंदा कमी प्रमाणात

SCROLL FOR NEXT