Education  Agrowon
ॲग्रो विशेष

Good Education : शिक्षणातून निर्माण व्हावा सशक्त समाज

Local to Global : भविष्यात उत्तम दर्जाचे शिक्षण देऊन सशक्त समाज निर्माण करण्याची जबाबदारी ‘नवीन शैक्षणिक धोरणा’कडून अपेक्षित आहे. ‘लोकल टू ग्लोबल’ विचार शिक्षणातून रुजायला हवा.

Team Agrowon

प्रा. संभाजी पाटील

Education Update : बदलत्या विश्‍वानुसार विविध क्षेत्रांत होणारे परिवर्तन लक्षात घेऊन शिक्षणक्षेत्रातही बदलाचे वारे वाहू लागले आहेत. भारताला शिक्षण पद्धतीची फार मोठी परंपरा लाभली आहे. त्यात आश्रम व्यवस्था, गुरुकुल पद्धती, योगी व ऋषींना असणारे महत्त्व, तक्षशिला व नालंदा विद्यापीठ आदींचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

आज समाजाच्या प्रत्येक घटकाला शिक्षणाचे महत्त्व पटले आहे, तसेच शिक्षणक्षेत्रात जी सात्त्विकता टिकून आहे, त्यामध्ये शिक्षणाच्या प्रसारासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या अनेक विभूतींचे मोलाचे योगदान आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतर ‘ग्लोबल एज्युकेशन’ ही नवी संकल्पना अस्तित्वात येत आहे.

त्यामुळे शिक्षणक्षेत्रात व्यापक बदल होणे अपरिहार्य झाले आहे. बदल स्वीकारला तरच प्रगती - हा विचार रुजतोय. मात्र हा भौतिक बदल होत असताना मूल्ये व संस्कृती संवर्धनाबरोबरच बदलत चाललेली मानसिकता संतुलित करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

भविष्यातील विद्यार्थी व शिक्षणपद्धती

प्रत्येक पालकाला अपेक्षा असते, की आपला पाल्य हुशार असावा, त्याचा वर्गात पहिला क्रमांक यावा, त्याचे सर्वत्र कौतुक व्हावे. मात्र त्या मुलाच्या क्षमतेचा, बुद्धिमत्तेचा व त्याने आत्मसात केलेल्या कौशल्याचा पालक कधी विचार करतात का? व्यक्तिमत्त्व विकासाचे ‘शिक्षण’ हे माध्यम आहे. जगात तंत्रज्ञान व अन्य घडामोडींमुळे जग झपाट्याने बदलत आहे.

या जीवघेण्या स्पर्धेत विद्यार्थी टिकायला पाहिजे, म्हणून पालक चिंतित असतो. शिक्षणातून खऱ्या अर्थाने लोकशाही समजून घेणारे, जबाबदार, संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक तयार होणे अपेक्षित असते. अध्यापनातून विद्यार्थ्यांची क्षमता व कौशल्ये विकसित व्हावी. तसेच स्वयंअध्ययन करण्याची प्रेरणा व जागरूकता अभ्यासक्रमातून निर्माण करावी.

आतापर्यंत शिक्षकाच्या विविध प्रशिक्षणांतून शिकवायचे कसे, यावर भर देण्यात आला. मात्र विद्यार्थी शिकेल कसा, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. भविष्यात उत्तम दर्जाचे शिक्षण देऊन सशक्त समाज निर्माण करण्याची जबाबदारी ‘नवीन शैक्षणिक धोरणा’कडून अपेक्षित आहे.

आत्मनिर्भर करणारा अभ्यासक्रम

‘लोकल टू ग्लोबल’ विचार शिक्षणात रुजायला हवा, भविष्याकरिता सर्वांगीण व्यक्तिमत्त्व असलेला विद्यार्थी, अद्ययावत ज्ञानसंपन्न बालक व १०० टक्के क्षमतेचे उपयोजन कौशल्य शिक्षणातून विद्यार्थ्यांनी आत्मसात करायला हवे.

याकरिता अभ्यासक्रमात चिकित्सक विचार, सर्जनशील विचार, सहयोगी शिक्षण, संवादकौशल्य, आत्मविश्‍वास इत्यादी घटकांचा विचार व्हावा. माहितीचे किंवा अनुभवाचे वस्तुनिष्ठपणे विश्‍लेषण आणि परीक्षण करण्याची क्षमता म्हणजे चिकित्सक विचार होय. अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना चिकित्सक विचार करण्याची सवय लागायला हवी.

प्रत्येक व्यक्ती विचार करीत असतो. त्या विचारप्रक्रियेतून मी स्वतः शिकू शकतो ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. आपला विद्यार्थी केवळ शिक्षकांवर अवलंबून न राहावा. स्वतः विचार करून नवीन संकल्पना विद्यार्थ्यांना रुजविता येईल व वैचारिक विद्यार्थी ‘आत्मनिर्भर’ होईल असा अभ्यासक्रम हवा.

सर्जनशील विचार

नवीन काहीतरी करण्याची क्षमता किंवा बौद्धिक कुवत म्हणजे सर्जनशील विचार होय. प्रत्येक व्यक्तीला मेंदू आहे. त्याच्या मेंदूत नवनवीन कल्पना येतच असतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी लागावी म्हणून त्यांना आव्हान द्यावे.

आयुष्यात येणाऱ्या आव्हानांकडे संकट म्हणून न बघता संधी म्हणून पाहण्याची दृष्टी निर्माण करण्याचे कार्य शिक्षणातून व्हावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आव्हान देणे ही प्रक्रिया मानसशास्त्रीय घटकांशी संबंधित आहे. विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी समजण्यासाठी आव्हान दिले तर तो सर्जनशील विचार करून नवीन काहीतरी आत्मसात करतो.

आत्मविश्‍वास निर्माण करणारे व्यासपीठ

मानवी आयुष्याचा प्रवास हा सहयोगातूनच पूर्ण होतो. एकमेकांच्या सहकार्याशिवाय कोणतेही कार्य पूर्णत्वास जात नाही. शिकण्याची प्रक्रिया जरी ‘स्व’स्तरावरील असली तरी शिकणे मात्र अवतीभवतीच्या अनुभवातून होत असते. विद्यार्थी शाळेतील मित्रांकडून जे सहजतेने शिकू शकतात, ते शिक्षकाकडून शिकायला वेळ लागतो.

कारण समवयस्क व्यक्तीकडून शिकताना मनावरील दडपण कमी होते. म्हणून ज्ञानरचनावाद पद्धतीप्रमाणे गटात शिकणे व जोडीदाराकडून शिकणे सोपे व सहज असते. यातून सहकार्याची भावना व संघभावना निर्माण होण्यास मदत होते. व्यक्त होण्यासाठी संवादकौशल्य आजची गरज आहे.

एका व्यक्तीद्वारे इतर व्यक्तींकडे किंवा समूहाकडे माहितीचे संप्रेषण किंवा प्रक्षेपण होणे म्हणजे संवाद होय. आपल्या मनातील भावना व विचार व्यक्त करण्याचे माध्यम संवाद आहे. आधुनिक जगात ज्यांचे संवादकौशल्य उत्तम असते तो इतरांवर प्रभाव पाडू शकतो. शिक्षणातून विद्यार्थ्यांना संवादाच्या संधी उपलब्ध होऊन कौशल्यात वाढ होणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेतून अनेक प्रश्‍न निर्माण होतात. या प्रश्‍नांची उत्तरे संवादातून सापडायला हवीत. कुतूहलातून निर्माण झालेल्या शंकेचे समाधान शिक्षणातून अपेक्षित आहे. शिक्षण हे आत्मविश्‍वास निर्माण करणारे व्यासपीठ आहे.

‘माणूस’पण जपणारे शिक्षण

जगात देशाची मान उंचावण्यासाठी आत्मविश्‍वास निर्माण करणारे उपयुक्त शिक्षण विद्यार्थ्यांना देणे आवश्यक आहे. आपले विद्यार्थी यात मागे पडतात. मनात जी भीती आहे ती शिक्षणातून दूर व्हायला हवी. संगणक किंवा तंत्रज्ञान वापरण्यात मनात भीती असेल तर अभ्यासक्रमात याचा समावेश केल्यानेच ती दूर होईल.

मानवी वेदनेचे दुःख जाणून घेण्याची क्षमताही महत्त्वाची आहे. इतरांच्या भावनेचा आदर करणे अभिप्रेत आहे. शिक्षणातून विद्यार्थ्यात ‘करुणा’ गुणही विकसित व्हावा. आपणच त्या ठिकाणी आहोत, ही दूरदृष्टी धारणा शिक्षणप्रक्रियेत निर्माण व्हावी. शिक्षणातून विद्यार्थी केवळ ज्ञानी होऊन चालणार नाही, तर ‘माणूस’पणाची जपवणूक करणारा होईल याची आशा आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नवीन अभ्यासक्रमाची निर्मिती करताना या सर्व गोष्टींचा अंतर्भाव झाला तर गुणवंत, ज्ञानवंत, तद्वतच कार्यकुशल विद्यार्थी तयार होतील. त्यांच्या ज्ञानाचा फायदा देश व समाजासाठी होईल. शिक्षणातून हा व्यापक हेतू साध्य झाल्यास आपल्या देशाची गणना प्रगत देशांत होईल, हे निश्‍चित!

(लेखक शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Global Development Trust : ग्लोबल विकास ट्रस्टच्या कृषिकूलचे उद्घाटन

Agriculture University Promotion : कृषी विद्यापीठातील पदोन्नतीचे आदेश न काढणे कायदेशीर : आनंदकर

Agriculture University Rating : महात्मा फुले कृषी विद्यापीठाला ‘ए’ ग्रेड उत्कृष्ट मानांकन

Agriculture Department : ‘महसूल’ पाठोपाठ यंत्रणा असलेला कृषी विभाग विस्कळित

Soybean Rate : सोयाबीनच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांत संताप

SCROLL FOR NEXT