डॉ. शैलेश गावंडे, डॉ. दीपक नगराळे, डॉ. नीळकंठ हिरेमनी, डॉ. जी. टी. बेहरे, डॉ. वाय. जी. प्रसाद
Cotton Disease Management : जागतिक स्तरावर भारत हा कपाशीचा प्रमुख उत्पादक देश आहे. मात्र या पिकात शेतकऱ्यांना विविध कीटकांसह रोगांचाही सामना करावा लागतो. रोगांमध्ये प्रामुख्याने मूळकुज, मररोग, अल्टरनेरिया व कोरीनेस्पोरा पानावरील ठिपके, दहिया, जिवाणूजन्य करपा आणि उत्तर भारतात येणारा लीफ कर्ल विषाणूजन्य आदी रोगांचा समावेश होतो.
टीएसव्ही रोगाचा आढळ
टोबॅको स्ट्रीक व्हायरस (टीएसव्ही) हा विषाणूजन्य रोग अलीकडील काही वर्षांपासून देशातील कपाशी पट्ट्यांमध्ये अत्यंत नुकसानकारक म्हणून पुढे येत आहे. नेक्रॉसिस (वनस्पतीतील उती व पेशी मृत पावणे) सारखी लक्षणे ते निर्माण करतो. उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम दिसून येतो. रोगाच्या विषाणूचे संक्रमण कपाशीच्या चारही प्रजातींमध्ये आढळून आले आहे.
विशेषत्वाने सांगायचे तर भारताच्या मध्य आणि दक्षिण भागातील कापूस उत्पादक पट्यात रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात प्रादुर्भावग्रस्त कपाशीच्या झाडांमध्ये पिवळेपणा, पानांवर तांबडे ते जांभळट रंगाचे गोलाकार तसेच अनियमित आकारचे ‘नेक्रोटिक’ ठिपके, नवीन पात्या व बोंडे सुकणे तसेच झाडाची वाढ खुंटणे यासारखी लक्षणे दिसून आली आहेत.
प्रयोगशाळेतील तपासणीत नेक्रोसिस लक्षणाला कारणीभूत घटक हा ‘टीएसव्ही’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. टीएसव्ही रोगाला कारणीभूत विषाणूच्या संक्रमणामुळे दिसणारी लक्षणे अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे दिसणाऱ्या लक्षणांशी साधर्म्य साधत असल्याचे दिसून आले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होभ शकतो. त्यामुळे या रोगाची लक्षणे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
रोग संक्रमणास कारणीभूत घटक
या रोगाच्या विषाणूमध्ये (टीएसव्ही) विविध तणे उदा. गाजर गवतासारख्या प्रजातींमध्ये, लक्षणरहित संक्रमण स्थापित करण्याची लक्षणीय क्षमता आहे. संक्रमित झाडापासून निरोगी झाडांमध्ये या विषाणूचा प्रसार कसा होतो हे समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. संक्रमणाची तीव्रता अनेक महत्त्वपूर्ण घटकांवर अवलंबून असते.
यात संक्रमित परागकणांचे प्रमाण, गाजर गवताच्या झाडांची संख्या, फुलकिड्यांचे गुणोत्तर (संक्रमणाचे माध्यम म्हणून कार्यरत कीटक) आणि पिकात फुलकिड्यांची हालचाल यांचा त्यात प्रामुख्याने समावेश होतो. अनेक फुलकिड्यांच्या प्रजातींचे प्रौढ आणि पिलावस्था रोगाच्या संक्रमणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्या माध्यमातूनच गाजर गवतातील परागकणांद्वारे अप्रत्यक्षपणे फुलकिड्यांच्या साह्याने कपाशीत रोगाचा प्रादुर्भाव होतो. मात्र थेट संपर्क किंवा मातीद्वारे ह रोग प्रसारित होत नाही.
टीएसव्ही रोगाचे एकात्मिक नियंत्रण व्यवस्थापन
पीक फेरपालट रणनीतीचा अवलंब करावा. शेतातील रोगग्रस्त अवशेष व काडीकचरा वेचून नष्ट करावा.
शेतातील तसेच बांधांवरील तणांचे विशेषतः गाजर गवताचे फुलोरा अवस्थेआधी वेळेवर नियंत्रण करावे.
रोगाच्या दुय्यम प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी प्रादुर्भावग्रस्त पाने तसेच झाडे शेतातून काढून टाकून ती नष्ट करावीत.
भुईमूग, बाजरी आणि मका यासारख्या कमी कालावधीच्या गैर यजमान पिकांचा आंतरपीक म्हणून समावेश करावा.
फुलकिड्यांच्या निरीक्षणासाठी निळ्या चिकट सापळ्यांचा वापर हेक्टरी २०, तर नियंत्रण व्यवस्थापनासाठी १०० या प्रमाणात करावा.
लोखंडी पत्र्याला निळा रंग देऊन त्यावर एरंडीचे तेल पसरवून पर्यायी घरगुती व कमी खर्चाचे चिकट सापळे तयार करता येतात.
फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी आवश्यकतेनुसार पुढील कीटकनाशकांचा प्रति लिटर पाणी य प्रमाणात वापर करावा.
स्पिनेटोरम (११.७ एससी) ०.८ मिलि
फ्लोनिकॅमिड (५० डब्ल्यूजी) ०.४ ग्रॅम
डिनोटेफुरान (२० एसजी) ०.३ ग्रॅम
डायफन्थ्युरॉन (५० डब्ल्यूग्रॅम)
प्रोफेनोफॉस (५० ईसी ०.० मिलि
इमामेक्टीन बेन्झोओट (५ एसजी) ०.५ ग्रॅम
थायोमेथाक्झाम (२५ डब्ल्यूजी) ०.२५ ग्रॅम
डॉ. शैलेश गावंडे, ९४०१९९३६८५
(लेखक केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ (वनस्पती रोगशास्त्र) आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.