N D Mahanor Agrowon
ॲग्रो विशेष

Indrajit Bhalerao : जिवंत मैफिल एैकल्याचं समाधान !

Team Agrowon

N D Mahanor : पुढं २०१० मध्ये पुण्यात द. भि. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ऐनवेळी उद्‍घाटक म्हणून महानोरांना उभं करण्यात आलं. तसं तर पुढं उस्मानाबादच्या संमेलनावेळीही उद्‍घाटनात महानोर प्रमुख पाहुणे होतेच. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महानोर उभे राहत नव्हते. त्यामुळं त्यांना संमेलनाचा अध्यक्ष होता येत नव्हतं. त्या ऐवजी त्यांना असे बहुमान देऊन महामंडळानं त्यांचा सन्मानच केलेला होता.

खरं तर लोकांना महानोर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून हवे होते. पण त्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक गोष्टी करायला महानोर तयार नव्हते. रात्री होणाऱ्या कवी संमेलनाचे अध्यक्षही महानोरच होते. कविता वाचून जाताना त्यांनी सगळ्या कवींना शुभेच्छा दिल्या. पण माझ्याकडं मात्र पाहिलं देखील नाही. तिथं मी म्हटलेली माझी ‘शिक बाबा शिक’ ही कविता प्रचंड गाजली. दुसऱ्या दिवशी सगळीकडे हेडलाइन माझ्याच कवितेची होती. माझ्या कवितेला मिळालेला प्रतिसाद आणि वन्समोअर त्यांना आवडला नव्हता की काय?

२०१७ मध्ये महानोर ७५ वर्षांचे झाले. त्यांच्या अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. पहिलाच कार्यक्रम जालन्याच्या उर्मी या संस्थेचे जयराम खेडेकर यांनी पळसखेडला महानोरांच्या शेतातच आयोजित केला होता. या कार्यक्रमाला त्यांनी मलाही बोलावलेलं होतं. मग मी एकटा जाण्याऐवजी महाविद्यालयातल्या मराठीच्या सगळ्या विद्यार्थ्यांची सहल घेऊन महानोर यांच्या शेतावर गेलो. कार्यक्रम छान झाला. महानोरांची निवांत भेट झाली. आम्ही लवकर पोहोचल्यामुळं अजून लोकांची गर्दी झालेली नव्हती.

नुकत्याच झालेल्या त्यांच्या बायपासचे छातीवरचे टाके ही त्यांनी शर्ट उचलून दाखवले. खूप आतून बोलत होते. त्यांनी शेतात बांधलेलं अद्ययावत घरही दाखवलं. त्यांच्याकडे खूप मोठी माणसं येतात, त्यांच्यासाठी सर्व सुविधांनी युक्त असलेलं असं घर त्यांनी शेतात बांधलं होतं. माझ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत फोटो काढून घेतले. नंतर कार्यक्रम झाला. छोटाच पण सुटसुटीत. महानोर यांच्यावतीने सगळ्यांना जेवण देण्यात आलं. हळूहळू मळ्यात गर्दी व्हायला सुरुवात झाली होती. शरद पवार येणार असल्याचा निरोपही आला होता. पवार साहेब आल्यावर खूपच गर्दी होईल म्हणून आम्ही तिथून काढता पाय घेतला.

त्याच वर्षी महानोर परभणीला आमच्या विद्यार्थ्यांच्या शब्दसह्याद्री या साहित्यिक संस्थेच्या उपक्रमासाठी आले. ही संस्था दरवर्षी कवितेच्या क्षेत्रात कविता लेखनाशिवाय कवितेला बळ देणारे उपक्रम करणाऱ्या लोकांसाठी एक पुरस्कार देते. त्या वर्षी हा पुरस्कार कवितेच्या अनुवादासाठी म्हणून चंद्रकांत पाटील यांना द्यायचं निश्‍चित झालं. कुणाच्या हस्ते पुरस्कार द्यावा असा प्रश्‍न निघाला तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी ना. धों. महानोर यांचं नाव घेतलं. त्यांना आणण्याची जबाबदारी आसाराम लोमटे या माझ्या विद्यार्थ्यानं घेतली.

महानोर आले. ते आता थकलेले दिसू लागले होते. तरीही त्यांनी दीड तास कार्यक्रम रंगवला. ते एकदा बोलायला लागले, की त्यांच्या अंगात येतं आणि ते इतके एकरूप होतात की त्यांचं त्यांनाही लक्षात राहत नाही. फार दिवसांनंतर एवढी जिवंत मैफिल ऐकल्याचं समाधान परभणीकरांना लाभलं. त्या दिवशी रात्री शब्द सह्याद्रीचे सगळे जण मिळून आम्ही कृषी विद्यापीठाच्या अतिथिगृहात एकत्र जेवलो. महानोर रात्री तिथंच थांबले आणि सकाळी लवकर निघून गेले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT