Indrajit Bhalerao : महानोर आणि ग्रेस यांच्या मुलाखतीचा किस्सा

Article by Indrajit Bhalerao : या दोघा कवींची प्रकृती भिन्न आहे हे खरेच. महानोर खूप सामान्य माणसांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि ग्रेस फक्त एका विशिष्ट रसिक वर्गालाच माहीत आहेत.
N D Mahanor
N D MahanorAgrowon
Published on
Updated on

N D Mahanor : महानोर आणि ग्रेस हे एकाच वेळी उदयाला आलेले दोन मराठी कवी. एकाच वर्षी, एकाच प्रकाशकानं त्यांचे पहिले कवितासंग्रह प्रकाशित केले. दोघांना सोबतच पुरस्कार मिळाले आणि मान्यताही. आम्हा परभणीकरांना हे दोन्ही कवी एकत्रित अनुभवण्याचा योग २००१ च्या दरम्यान आला. बी. रघुनाथ स्मारकाच्या उद्‍घाटनासाठी परभणीकरांनी या दोघांना बोलावलं होतं.

उद्‍घाटनाच्या दुसऱ्या दिवशी या दोघांचे कार्यक्रम परभणीच्या नटराज रंग मंदिरात आयोजित करण्यात आलेले होते. सुरुवातीला ग्रेस यांची प्रकट मुलाखत झाली आणि नंतर महानोर यांचं प्रकट कवितावाचन झालं. ग्रेस यांचा हटखोर, तुसडा स्वभाव परभणीकरांनी अनुभवला, तर त्याचवेळी महानोरांचा मोकळाढाकळा आणि सामान्य माणसांत मिसळणारा आपुलकीचा स्वभावदेखील अनुभवला.

या दोघा कवींची प्रकृती भिन्न आहे हे खरेच. महानोर खूप सामान्य माणसांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि ग्रेस फक्त एका विशिष्ट रसिक वर्गालाच माहीत आहेत. त्यामुळं या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसादही विषम होता. ग्रेस यांची मुलाखत कोणाला फारशी आवडली नाही. पण महानोर यांनी सगळ्यांना झपाटून टाकलं.

ग्रेस यांची कविता सामान्य माणसापर्यंत गेली नाही या पाठीमागं ग्रेसच असावेत अशी शंका त्या अनुभवाने आम्हा परभणीकरांनी आली. आपली कविता लोकांपर्यंत पोहोचू नये अशी तजवीज स्वतः ग्रेसच करतात की काय, असा प्रश्‍न त्या दिवशी आम्हाला पडला.

N D Mahanor
Indrajit Bhalerao : महानोरांनी भालेरावांना लिहीलेलं पत्र !

दरम्यान, ईटीव्ही या चॅनेलनं बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा एक लाइव्ह कार्यक्रम जळगावला ठेवला होता. त्या कार्यक्रमात माझी प्रकट मुलाखत ठेवण्यात आली होती. खरं तर तो अधिकार महानोरांचा होता. पण तरीही जळगावात मुक्कामी असलेले महानोर आवर्जून त्या कार्यक्रमाला आले. समोर बसले.

सोबत नातवाला घेऊन आले होते. ‘तुझ्या मराठीच्या पुस्तकात ज्यांची बाप कविता तुला अभ्यासाला आहे, तेच हे इंद्रजित भालेराव’ असा त्यांनी नातवाला माझा परिचय करून दिला. याला तुझी कविता फार आवडते, हा सारखा म्हणत राहतो, असंही महानोर मला म्हणाले. महानोर उपस्थित राहिले आणि त्यांनी नातवाला माझा असा परिचय करून दिला या दोन्ही गोष्टींचा मला अर्थातच आनंद वाटला.

N D Mahanor
Indrajit Bhalerao : महानोर रोमॅंटिक कवी होते ?

त्यानंतर बहिणाबाई चौधरींच्या कवितांवर आधारित ‘खानदेशचा मळा आणि मराठवाड्याचा गळा’ हा आमच्या परभणीच्या कलावंतांनी बसवलेला कार्यक्रम भवरलालजी जैन यांनी वाकोदला बहिणाबाईंच्या जयंतीच्या दिवशी ठेवला. त्या वेळी कार्यक्रमाआधी आम्ही मुद्दाम पळसखेडला महानोर यांच्या शेतावर जाऊन आलो. या कार्यक्रमाचे संगीतकार प्रा. डाॅ. अशोक जोंधळे आणि मुख्य गायिका आशाताई जोंधळे सोबत होत्या.

महानोर यांनी तिथं आमचं आगत-स्वागत, सत्कार, फराळ-पाणी केलं. खूप प्रेमानं गप्पाटप्पा मारल्या. शेतात नव्यानं बांधलेलं अद्ययावत घर आणि त्यांना मिळालेल्या सन्मानपत्रांचं संग्रहालयही दाखवलं. आमच्या सोबत आवर्जून वाकोदला येऊन संपूर्ण कार्यक्रम ऐकला. सूत्रसंचालन मी करत होतो. महानोर मनःपूर्वक दाद देत होते. हातवारे करत गाण्याला पसंती देत होते. मी आवर्जून उल्लेख केला, की महानोरांचे केवळ हातच नाचतायत, कारण या वयात ते शरीरानं नाचू शकत नाहीत म्हणून. त्यावर महानोरही हसले. उपस्थित जनसमुदायही हसला. खूप छान असा तो कार्यक्रम झाला.

त्यानंतर जैन इरिगेशनचे पुरस्कार जाहीर झाले. त्यात बालकवी पुरस्कार मला मिळाला. महानोर त्या ट्रस्टवर होते. पण आजारी असल्यामुळं ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. त्यावेळी ना. धों. महानोर यांच्या नावाचा पुरस्कार अनिल अवचट यांना आणि बहिणाबाई चौधरी यांच्या नावाचा पुरस्कार बंगळुरच्या लेखिका सानिया यांना मिळालेला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com