Indrajit Bhalerao : काही कमवायचं नसेल तर गमवल्याचं दु:ख होत नाही - भालेराव

Article by Indrajit Bhalerao : महानोरांचे सुरुवातीपासूनचे जिवलग मित्र, शिवशेजारी, वाकोदचे भवरलालजी जैन हे पुढं जागतिक दर्जाचे उद्योगपती झाले. त्यांचा आणि माझाही सूर योगायोगानं फार छान जुळला.
Na. Dho. Mahanor
Na. Dho. MahanorAgrowon

N D Mahanor : महानोरांचे सुरुवातीपासूनचे जिवलग मित्र, शिवशेजारी, वाकोदचे भवरलालजी जैन हे पुढं जागतिक दर्जाचे उद्योगपती झाले. त्यांचा आणि माझाही सूर योगायोगानं फार छान जुळला. जळगाव विद्यापीठाच्या युवक महोत्सवाच्या पुरस्कार वितरणासाठी मी गेलो तेव्हा आलेल्या बातम्या वाचून त्यांनी त्यांचे सांस्कृतिक सचिव विनोद रापतवार यांना विचारलं, की या कवीला आपणाला भेटता येईल का?

रापतवार मला आधीपासून ओळखत होते. त्यांनी माझ्याशी लगेच संपर्क साधला. एवढा मोठा माणूस भेटू इच्छितो म्हटल्यावर मलाही आनंद वाटला. आपणच त्यांच्याकडे जाऊयात, त्यानिमित्तानं जैन हिल्सही पाहता येईल, त्यांनी तिथं केलेले प्रयोग पाहता येतील, म्हणून मीच त्यांच्या भेटीला गेलो. तिथं माझं खूप चांगलं आगत-स्वागत झालं. भवरलालजींशी छान गप्पा झाल्या.

त्यांचे आणि माझे छान सूर जुळून आले. पुढं जळगावला गेल्यानंतर आणखी एकदोनदा त्यांच्या माझ्या भेटी झाल्या. पत्रव्यवहारही झाला. एकदा भेटींत फार अंतर पडल्यावर त्यांनी पत्रात लिहिलं, मृगाच्या पावसासारखी मी तुमची वाट पाहतो आहे. या माणसाचं शेतीप्रेम आणि औद्योगिक पातळीवर शेतीसाठी केलेलं काम पाहून त्यांना शब्दात गुंफावं असं मला वाटलं. तशी एक रचना मी केली.

Na. Dho. Mahanor
Indrajit Bhalerao : महानोरांची 'वही' वेगळी का ठरली?

एका पत्रासोबत त्यांना सहज पाठवून दिली. अर्थातच त्यांना ती आवडली. पुन्हा भेट झाल्यानंतर ते म्हणाले, असं काही लिहिल्यानंतर तुम्हाला अपराधी वाटत नाही ना? मला प्रश्‍न पडला, हे असं का विचारतायेत? माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्‍नचिन्ह त्यांच्या लक्षात आलं असावं. त्यांनी मला सांगितलं, ‘‘नाही, आमच्या महानोरांनीही अशाच माझ्यावर चार ओळी लिहिल्या होत्या. पण त्यांना नंतर कायम अपराधी वाटत राहिलं.

ते म्हणतात, माझे मित्र त्यावरून मला सतत बोलत राहतात. तसं काही तुम्हाला वाटत नाही ना?’’ मला तसं काही वाटण्याचं कारणच नव्हतं. मला ज्यांच्याविषयी लिहावं वाटलं त्या सर्वांवर मी आतापर्यंत उत्स्फूर्तपणे लिहीत आलेलो आहे, उत्कटपणे लिहीत आलेलो आहे. त्यामुळे झालेलं नुकसानही आनंदानं सहन करत आलेलो आहे. कुठेच काही कमवायचं नसेल तर काही गमावल्याचं दुःख होण्याचं कारणच नाही.

Na. Dho. Mahanor
Indrajit Bhalerao : महानोर शेतीत का रमले ?

पुढं परभणीला अस्मितादर्श मेळावा झाला तेव्हा गंगाधर पानतावणे सरांनी आवर्जून महानोरांना समारोपाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं. महानोरांनी वामनदादा कर्डकांपासून अनेक दलित कवींच्या आठवणी सांगत, त्यांच्या कविता सादर करत, अस्मितादर्श मेळाव्याच्या समारोपाला शोभेल असं छान भाषण केलं. त्याआधी गेस्ट हाउसवर ते आले तेव्हा नुकत्याच जालन्याला नेमाडे यांच्या कार्यक्रमावर झालेल्या हल्ल्याचा विषय निघाला. तेव्हा रंगनाथ पठारे आणि सुमतीबाईंनी महानोरांना फोन करून गृहमंत्र्यांना नेमाडेंना संरक्षण द्यायला सांगितलं. त्या वेळी आर. आर. पाटील गृहमंत्री होते.

ते माझ्याकडे अनेकदा येऊन गेल्याचा संदर्भही वृत्तपत्रातून आलेला होता. महानोरांना ते माहीत असावं. त्यांना कदाचित ते आतून आवडलं नसावं. त्यामुळे माझ्याकडे तिरकस पाहत महानोर म्हणाले, ‘‘आजकालचे गृहमंत्री आपण फोन केला तर फोन उचलतात कुठं! त्यामुळं मी काही नेमाडेंना संरक्षण देऊ शकलो नाही.’’ खरं तर आर. आर. पाटलांनी महानोरांचा नेहमीच गौरव केलेला होता.

सांगलीला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राष्ट्रपतीच्या शेजारी आर. आर. पाटलांसाठी ठेवलेल्या खुर्चीवर स्वतः न बसता महानोरांना हाताला धरून बसवून ते समोर बसले होते. आबांचा सज्जनपणा सगळ्या महाराष्ट्राला माहीत होता. पण का कोणास ठाऊक महानोर त्यांच्यावर शंका घेत होते. खरंतर आबा सामान्य माणसाचा फोनदेखील घेतात हे जगजाहीर होतं. ते केवळ मी तिथे असल्यामुळे असे काही सूचक बोलत होते, की काय कुणास ठाऊक?

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com