Rural Life Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Social Structure: गाव आणि शहराच्या मधोमध हरवलेली माणसं

सुन्या तरी मी म्हणायचो रे, आमचा ह्येव दाद्या दुकान बंद करून येताना सोपं सोडून त्या आडवाटानं झक मारत का यायचा. तरी दोन तीनदा म्या हटकलं होतं बरं का! पण दाद्या म्हणला, काही नाही आपलं असंच तिकडच्या उधाऱ्या वसूल करायला जात असतोय.

Dhananjay Sanap

लेखक: धनंजय सानप

संत्या म्हणला, या गावातली माणसं लैच दलिंदर वाणाची हाईत. माणसंनं इथं राहणं म्हणजे नरकात सडल्यागतय. हातातल्या तांब्यातलं पाणी तोंडात घेऊन चूळ भरत संत्या बोलत होता. तांब्या टेबलवर ठेवून हॉटेलवाल्या गण्याला संत्या म्हणला, दोन कटिंग भर! आणि पुढं बोलायला लागला. तिकडं पुण्या मुंबईत आयघातली असती तर जिंदगीचा इचका व्हायची येळ आली नसती. एकतर आमच्या दाद्यानं अशी पोरगी पळून न्यायची होती तर मला तर सांगायचं व्हतं. नाही का! पण त्याला काही तसला शहाणपणा सुचला नाही.

सुन्या तरी मी म्हणायचो रे, आमचा ह्येव दाद्या दुकान बंद करून येताना सोपं सोडून त्या आडवाटानं झक मारत का यायचा. तरी दोन तीनदा म्या हटकलं होतं बरं का! पण दाद्या म्हणला, काही नाही आपलं असंच तिकडच्या उधाऱ्या वसूल करायला जात असतोय. म्या बी म्हणून डाऊट घेतला नाही. मला कुठं माहीत होतं, याच्या अशा उधाऱ्या होत्या. संत्याचं बोलणं सुरूच होतं. तोवर गण्या चहा घेऊन आला. चहाचे ग्लास टेबलवर टेकीत गण्या बोलला, संत्या, पण पोरगीबी लई बारुळी होती. तिनंच डाव टाकला असणारे. तुमचा दाद्या तसा लाईनीतला माणूस होता. काय सुन्या खरंय का नाही? गण्याच्या बोलण्यावर सुन्यानं नुसतं हं केलं. आणि संत्या काहीतरी बोलणार तेवढ्यात गण्याला बाहेरून कुणीतरी आवाज दिला.

सुन्यानं चहाचा ग्लास हातात घेतला आणि संत्या बोलायला लागला, सुन्या तुला काय वाटतंय मॅटर मिटून घ्यायच्या टायमाला साध्यात मिटलं काय? तुला खरं सांगू का, वस्तीतल्या लोकांनी लईच कावधळ उडवलं राव. बरं दाद्या गेला सुटून आम्हीच अडकलो. पोरीचा बाप केस करतो म्हणला होता. पण सुभद्रा आत्यानं मध्यस्थी करून मिटवलं म्हणून बरं. त्यात पोरगी जातीतली होती ते एक बरं झालं. नाहीतर बाराच्या भावात गेलं असतं. तरीपण बांबू लागलाच. दुकान गेलं उधारीत.

दादया गेल्या आणि उधारीच बुडाली. त्यात बाप आणि माय अजून सदम्यातून बाहेर आले नाहीत. त्यांचा जीव अजून दाद्यातय. अन् दाद्या तिकडं मज्या हज्या करत असणारे. इथं मी नुसतं सुपाऱ्या गोळा करून करून पार खारकागत झालोय. लग्न लावून द्यायला तयार झालतो रे, पण त्या पोरीच्या म्हाताऱ्यानं पोरगी गावात आली की, तिचं मूडकंचं उडवतो म्हणलतं. पुढं दोन एक महिने कुऱ्हाड घेऊन फिरत होतं. येडभोकाचं!

संत्या एकदम भकाभका होतं नव्हतं सगळं काही सांगत होता. सुन्या नुसतं ऐकून घेत होता. ग्लासातला चहा संपला होता. अजून एखादा चहा सांगावा असं सुन्याला वाटत होतं. एका चहात त्याची तलफ भागायची नाही. अजून एखादा चहा सांगावा तर संत्या अजून बोलत बसणार म्हणून सुन्यानं तलफ आवरली. तसंही सुन्याला काही संत्याच्या बोलण्याचा कटाळा आलेला नव्हता. पण त्येव अशा स्पीडनं गोष्टी सांगायचा की, सुन्याला त्यातलं बरेच संदर्भ माहीत नसयाचे. हा फक्त संत्याच्या दादयाचं तेवढं मॅटर त्याला माहित होतं. त्याची चर्चाच तशी झालेली.

संत्या म्हणाला, ह्या टेम्पो कशीतरी लक्ष्मी टिकून ठेवली बघ. नाहीतर पार धुरळा व्हायचा टाईम आलता. बोलता बोलता मध्येच संत्यानं ब्रेक घेतला आणि मोबाईल काढून उगाच टाईम बघितला. अन् सुन्याला म्हणाला, बरं ऐक मी ममताईत जाऊन येतो. आबाच्या विहिरीवरचं जनरेटर बिघडलंय. त्येव म्हणत होता, त्याचं जनरेटर श्याम्याकड खोलफिटिंगला आणून टाकायचंय. टेम्पोतले साउंड अजून बशीले नाहीत.

तव्हरक जाऊन येतो. आबा दिलदार माणूसय. तेवढाच चहा पाण्याचा खर्च निघण. रातच्याला कॉल कर. खळ्यावर भेटू म्हणत संत्यानं चहाचं बिल दिलं आणि डोक्याला उपरनं बांधत मोटरसायकलवर जाऊन बसला. उन्हानं तापलेल्या सीटचा चटका टिरिला बसला तशी संत्यानं तोंडातून शिवी बाहेर फेकली. झटक्यात किक मारली. सुसाट वेगानं काही क्षणात संत्या सुन्याच्या डोळ्यासमोरून गायब झाला. सुन्या मात्र अजूनही हॉटेलात बसून मोबाईलमध्ये गाणी लावून बसला होता.

उन्हाळ्याचे दिवस असल्यानं सिमेंटच्या रस्त्यावर झळा दिसत होत्या. या धावत्या उन्हाळ झळातून चाळीसच्या स्पीडनं दोघेही डीजेची सुपारी घ्यायला गेले होते. तसं लगीनसराईत संत्याच्या डीजेचं शेड्युल पॅक होतं. आज डीजेच्या दोन सुपाऱ्या भेटल्या होत्या. एक होती कडेगावच्या चेअरमनच्या पोराच्या लग्नाची आणि दुसरी होती बाळासाहेब अण्णाच्या पुतण्याच्या लग्नाची.

खरंतर सुन्याला यातलं काहीच माहीत नव्हतं. दुपारी त्येव घरात उकडतंय म्हणून पाराजवळच्या वडाच्या झाडाखाली येऊन बसला होता गाणी ऐकत. तिथं संत्या भेटला. त्यानं सुन्याला येणार का सोबत म्हणून विचारलं होतं. सुन्यालाही काही काम नव्हतं म्हणून तो सोबत याला तयार झालेला. तिथून पुढं जाऊन येईस्तोवर संत्याची कॅसेट सुरूच होती.

संत्याचा भाऊ पळून गेल्यापासून संत्याची परिस्थिती लईच बेक्कार झाली होती. पण संत्या खमक्या होता. मोडल पण वाकणार नाही असा. त्याचा भाऊ किराणा दुकानावर आणि संत्या टेम्पोवर भाडं हाणायचा. संत्या अभ्यासात जेमतेम होता. बारावीतच शिक्षणाला त्यानं रामराम ठोकला. पुढं काही दिवस शेतात रोजंदारी केली. पण संत्याला ते काही जमलं नाही. म्हणून बापाच्या आणि भावाच्या मागं लागून टेम्पो घेतला. ४०७ टाटाचा.

संत्या स्वभावानं मोकळा असल्यानं गावातलं प्रत्येक भाडं संत्याकड असायचं. मग ते आठवडी बाजार असो नाहीतर कंदुरीचा कार्यक्रम माणसापासून ते जनावरापर्यंत सगळं काही टेम्पोत ऍडजस्ट व्हायचं. पण हळूहळू गावात दोन तीन टेम्पो झाले. आणि त्यात डिझेलचे भाव वाढले आणि संत्याचं गणित बसलं. म्हणून मग संत्यानं टेम्पोत साउंड थाटून डीजे केला. गावातल्या लग्नात बाहेर गावातून डीजे आणला जायचा.

लोकं डीजेला पैसेही चांगलेच द्यायचे. म्हणजे तीन चार तासाचे दहा हजार तर कुठंच जात नव्हते. म्हणून संत्यानं बरोबर डाव साधला होता. डीजे सिस्टम विकत घ्यायला त्याला आबानं मदत केलेली. मदत म्हणजे उसनवारी नाही. पाच टक्क्यांनी पैसे दिलेले. ते संत्यानं पहिल्याच सिझनमध्ये फेडले होते. हे सगळं संत्यानं दिवाळी वेळेलाच सुन्याला सांगितलेलं. संत्याला पैसा कसा मिळवायचा हे चांगलं कळतं, याची कल्पना सुन्याला तेव्हाच आलेली. पण आज त्याच्यासोबतच्या फेरफटक्यानं अजून जास्त क्लियर झालेलं.

सुन्या पाच दिवसांपूर्वी गावाकड आला होता. औरंगाबादला राहून त्येव स्पर्धा परीक्षाची तयारी करत होता. सुन्या अभ्यासात हुशार होता पण परीक्षा काही पास होत नव्हता. त्यात स्पर्धा प्रचंड वाढलेली. त्याचे तीन चार वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. पण फ्रस्ट्रेशनशिवाय दुसरं काहीच हाती येत नव्हतं. म्हणून शेवटी स्पर्धा परीक्षेला अलविदा करत त्यानं गाव गाठलं होतं. सुट्टीचं निमित्त असलं तरी त्येव आता कायमचा गावातच राहणार होता. त्यानं अजून तरी त्याबद्दल संत्याला सांगितलं नव्हतं. मागच्या चार पाच दिवसात गावात आल्यापासून आलेली उदासीनता संत्याच्या आजच्या सहवासात हळूहळू विरळ होत चालली होती. पण सुन्या अजूनही हॉटेलात बसून होता. कारण त्याची चहाची तलफ भागली नव्हती. त्यानं गण्याला आवाज दिला, अन् एक फुल चहा मागवला.

क्रमश:

#गोतावळा_१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT