Indian Agriculture
Indian Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Indian Agriculture : उत्तम शेतीबरोबरच उभारली थेट ग्राहकांपर्यंत विक्री व्यवस्था

Team Agrowon

बाळासाहेब पाटील

वानगाव रेल्वे स्थानकापासून दोन-तीन किलोमीटरच्या अंतरावर खडखडा हे गाव. येथे दोन ठिकाणी बाबरेकर यांच्या दोन वाड्या (फळबागा) आहेत. एका बागेत चिकू फळबागेसह टुमदार घर, तर दुसऱ्या बागेत रोपवाटिका, आंबा बाब आणि औषधी वनस्पतींची लागवड अशी रचना आहे.

पती राजेश यांच्या साहाय्याने रूपाली यांनी आपली शेती फुलविली आहे. पूर्वी एकत्र कुटुंब असताना त्या विमा एजंट म्हणून काम करत. त्या कामातून उत्कृष्ट संभाषण कौशल्यासोबतच तालुक्यातील अनेक सधन, नोकरदारांशी परिचय झाला.

रूपाली यांनी काही काळानंतर हे काम बंद केले असले तरी विमा किंवा अन्य काही क्षेत्रातही कंपन्या साखळी पद्धतीने कशा काम करतात, याचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. तीच पद्धत आपल्या शेती उत्पादनांच्या विक्रीत राबविण्याचे ठरविले.

१५ एकर शेतीमध्ये पाच एकर चिकू (काळी पत्ती), १० एकर केसर, हापूस आणि आम्रपाली आंबा बागेसह वेलवर्गीय भाजीपाला, मिरची, टोमॅटो, वांगी असा भाजीपाला त्या घेतात.

सोबतच केळी, ताड, नारळ, वेलवर्गीय भाज्या, मोह, तुती यांसह अनेक औषधी वनस्पतींची लागवड केली आहे. सर्व बागेला ठिबक सिंचनाने पाणी दिले जाते. सिंचनासाठी विहीर आणि बोअरवेल आहे.

विक्री व्यवस्था केली उभी

कोविड काळात शेतीमालाच्या विक्रीची समस्या उभी राहिली. रूपाली यांनी आपल्या पाहुण्यांच्या किंवा मित्रमंडळीच्या माध्यमातून बोईसर, विरार, मुंबई, पुणे येथील मोठ्या हाउसिंग सोसायट्यांशी व डहाणू येथील काही सोसायट्यांशी भाजीपाला विक्रीसंदर्भात संपर्क साधला.

या पाहुण्यांच्या माध्यमातून फळे आणि भाज्यांची एकत्रित पाकिट पुरवायला सुरुवात केली. हळूहळू प्रतिसाद मिळत गेला. हे तर अनेक शेतकऱ्यांनी त्या काळात केले होते. मात्र कोरोना संपल्यानंतरही त्यांनी या लोकांच्या संपर्कात राहून आपल्या मालाची विक्री सुरू ठेवली हे त्यांचे विशेष.

आजही पाहुण्यांकडून येणाऱ्या चिकू, आंबा, ताज्या भाज्यांच्या ऑर्डरप्रमाणे पुरवठा केला जातो. ठाणे, विले पार्ले, विरार, पालघर, बोरिवली, मुलुंड आदी ठिकाणी बाबरेकर यांचा शेतीमाल पोहोचत आहे.

नोकरदारांची मागणी

‘आत्मा’अंतर्गत कोसबाड येथे प्रशिक्षण घेऊन अळंबी उत्पादन घेतले. मात्र हे उत्पादन विकायचे कुठे असा प्रश्‍न पडला. पुन्हा कंबर करून त्या कामाला लागल्या. त्यांनी उत्पादनाच्या ८५ बॅगा तयार केल्या.

मुंबई आणि उपनगरातील शिक्षिका डहाणू आणि परिसरात प्रशिक्षणासाठी येत असत. त्यांच्या बैठकांच्या ठिकाणी ही अळंबी व भाजीपाला विक्रीचे प्रयत्न केले. शेतीमालासोबतच रूपाली या प्रक्रियायुक्त पदार्थांचीही निर्मिती करतात.

उदा. केळीचे पीठ, चिकू चिप्स, वेगवेगळी लोणची, मुरांबे, तांदूळ पीठ, घावन पीठ यांचाही एक ग्राहक वर्ग तयार झाला आहे. मागणीनुसार शहरी ग्राहकांपर्यंत पोस्ट आणि कुरिअरद्वारे पाठवतात.

नर्सरीतून ६ लाखांचे उत्पादन

उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा अशा तीनही ऋतूंत शेतीतून आपल्याला उत्पन्न मिळाले पाहिजे, असे नियोजन रूपाली यांनी केले आहे. पावसाळ्यात अतिपावसाममुळे भाजीपाला आणि अन्य पिकांचे उत्पादन घेता येत नाही.

अशा वेळी उत्पन्न सुरू राहिले पाहिजे, या उद्देशाने २००६ मध्ये फळपिकांसह औषधी वनस्पतींची रोपवाटिका सुरू केली. आता त्यातून वर्षाला ६ लाखांपर्यंत उत्पन्न मिळते, असे रूपाली सांगतात.

आंब्याची झाडे हेच निवृत्तिवेतन

रूपाली आणि राजेश बाबरेकर या दांपत्याचा मुलगा डॉक्टर आहे. तर मुलगी बी. एस्सी. (ॲग्री) असून, एका हॉर्टिकल्चर कंपनीत कार्यरत आहे. शेतीच्या उत्पन्नातूनच मुलांना उच्च शिक्षण देऊ शकलो.

मात्र म्हातारपणी आपला मुलांवर भार पडू नये आणि शेतकऱ्याला स्वतःचे एक निवृत्ती वेतन मिळत राहावे, या उद्देशाने त्यांनी आंब्याची ३६५ झाडे लावली आहेत. एका झाडापासून किमान २ हजार रुपये मिळाले तरी म्हातारपणात चांगला आधार मिळेल, ही अपेक्षा. गेल्या वर्षी आंबा बागेतून चांगले उत्पन्न मिळाले, पण या वर्षी वातावरणाने दगा दिल्याने फारसा आंबा नाही.

अनेक पुरस्कारांनी सन्मानित

रूपाली यांना पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, जिल्हा आणि तालुका पातळीवर प्रगतिशील शेतकरी सन्मान पुरस्कार, नाशिक येथील कृषीथॉन पुरस्कार, वानगाव महिला मंडळाचा पुरस्कार आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

संपर्क - रूपाली बाबरेकर, ९२२६८७१२४६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT