Emotions Agrowon
ॲग्रो विशेष

Human Psychology : भावनांची इमारत

Team Agrowon

डॉ. आनंद नाडकर्णी

Human Feeling : आपल्या मनाला आणि भावनांना समजून घेण्याच्या प्रवासात आपण आतापर्यंत भावनांचे वर्गीकरण, नियोजन आणि भावनांक वाढविण्याचे टप्पे याबद्दल जाणून घेतले. आज हा प्रवास थोडा अजून पुढे नेऊया. मेंदूत भावना नेमक्या कशा तयार होतात, आपण वेगवेगळ्या भावना अनुभवायला शिकतो की त्या जन्मजात असतात याबद्दल आपण जाणून घेऊ.

मेंदूच्या पेशीची काही कार्ये अमूर्त असतात; ज्याला आपण मन म्हणतो. मेंदूच्या पेशीच्या कार्याबरोबरीने त्यात काही रासायनिक घटनासुद्धा घडत असतात. मेंदूमधील या रसायनांना जीवरसायने (Neurochemicals) असे म्हणतात. आपल्याला जाणविणाऱ्या भावनांचा उगम दोन प्रकारचा असू शकतो : जीवरसायने (Neurochemicals) किंवा मेंदूची उत्क्रांती.

चित्र १ मधला सुरकुतलेला मोठा भाग म्हणजे मोठा मेंदू आणि त्याच्या खाली असलेला भाग हा लहान मेंदू आहे. लहान मेंदूमधून खाली पाठीचा कणा दिसत आहे. मेंदूची वाढ कण्याकडून कवटीकडे अशा दिशेने झाली. मेंदूची खालील भागातील केंद्रे सगळ्यात सुरुवातीला म्हणजे १०० ते १५० हजार वर्षांपूर्वी तयार झाली.

मानवाची उत्क्रांती झाली तेव्हा परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी किंवा सामना करण्यासाठी माणसाच्या शारीरिक रचना आणि त्यात बदल होत गेले. ज्या काळात मनुष्य अंगावर कपडे घालत नव्हता, एक संरक्षक थर म्हणून आदिमानवाच्या अंगावर भरपूर केस होते. नंतर माणूस प्रगत होत गेला, नवे शोध लावत गेला. अंगावर वस्त्र घालू लागला तसतशी त्वचेवरची लव कमी होत गेली आणि हळूहळू त्वचा गुळगुळीत झाली. हे झाले बाह्य-अवयवात झालेल्या बदलाचे उदाहरण. असेच काही बदल मेंदूमध्येही होत गेले.

आदिम काळातील माणसासमोर सतत जीवशास्त्रीय धोके असायचे. वन्य श्‍वापदांचे हल्ले, वणवा लागणे, पूर, टोळीयुद्ध अशी संकटे म्हणजे जिवावर बेतणारे प्रसंग त्याच्या आयुष्यात सतत यायचे. अशा परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी त्याच्याकडे कोणकोणते पर्याय होते?

लढा (Fight) : या पर्यायातून संताप/ राग या भावनेची निर्मिती झाली.

पळा (Flight) : या पर्यायातून भीती या भावनेची निर्मिती झाली.

लपा (Freeze) : या पर्यायातून नैराश्याची भावना निर्माण झाली.

संकटाचा मुकाबला करता येणे शक्य असेल तर लढा. ते शक्य नसेल तर स्वत:च्या जिवाचा बचाव करण्यासाठी पळून जा. एकटेच असाल, लढणे किंवा पळणे शक्य नसेल, फायद्याचे नसेल तर लपून बसा.

या पर्यायांचा वापर आदिमानव त्याच्या अस्तित्वाचे, जिवाचे संरक्षण होईल अशा प्रकारे करून घेत होता. मानवाला या पर्यायांची सवय झाली तसे त्याला हे समजले, की या पर्यायांच्या वापरासाठी ऊर्जा लागते. आधीच्या भागातील चर्चेत आपण हे पाहिले होते, की भावनेत ऊर्जा असते. या पर्यायातूनच ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी भावनेची निर्मिती झाली. या तीनही भावना असह्य भावना आहेत आणि त्यांची निर्मिती १००-१५० हजार वर्षांपूर्वी झालेली आहे. मेंदूचा खालील केंद्रांचा जो भाग आहे तिथे या भावनांचे केंद्र असते. (चित्र २)

मनुष्याने या तीन पर्यायांतून निवडलेला पर्याय वापरून जर संकटावर मात केली, तर त्याला सुटकेचा आनंद व्हायचा, ज्यामुळे त्याचा आत्मविश्‍वास वाढायचा. ही भावना सुखद भावना होती. ती भावना व्यक्त करायला त्या वेळच्या मानवाला भाषा येत नव्हती. मग जिंकल्यावर, संकटावर मात केल्यावर तो एक जोरदार आरोळी ठोकत असे. ही जगातील सर्वांत पहिली अतिसह्य भावना आहे आणि आजही त्याचा आपल्याला अनुभव येतो. ज्या वेळी आपण एखादा महत्त्वाचा सामना जिंकतो त्या वेळी आपण “याऽऽऽऽऽय!” असे ओरडतो.

काही वेळा मात्र माणसाला त्या संकटाचा मुकाबला करणं जमायचं नाही. त्या संकटात जीवच गेला तर त्याची कहाणी तिथेच संपायची. मात्र त्या हानीतून जर मनुष्य जगला तर त्याला खंत (Guilt) ही भावना जाणवत असे. संताप, भीती, नैराश्य, खंत या असह्य भावनांना आपण दुःखद आदिम भावना म्हणतो. जिंकल्याचा / सुटकेचा आनंद ही अतिसह्य आदिम भावना आहे.

कालांतराने टोळी संस्कृती संपून कृषी संस्कृती आली आणि नंतर नागरी संस्कृती आली. या आदिम भावना माणसाच्या मेंदूत असतानाच मेंदूची पुढे वाढ होत गेली. कृषी संस्कृती किंवा त्याच्या थोडे आधीपासूनच मोठा मेंदू विकसित व्हायला सुरुवात झाली. मेंदूच्या या भागात ज्या भावना निर्माण होतात त्यांना प्रगत भावना म्हणतात. या प्रगत भावना आपण मागील लेखात सह्य आणि सुसह्य भावना अशा प्रकारे समजून घेतल्या आहेत.

मत्सर, द्वेष, काळजी, चिडचिड ही झाली प्रगत भावनांची काही उदाहरणे. प्रगत भावना निर्माण होण्याचे कारण मोठ्या मेंदूची वाढ हे आहे. मोठा मेंदू आपला वैचारिक मेंदू आहे. मोठया मेंदूच्या वाढीमुळे मानवाची विचारशक्ती जागृत झाली. प्रगत भावनांचा प्रवास हा ५०-६० हजार वर्षांपूर्वी चालू झाला आणि तो अजूनही चालूच आहे.

प्रगत भावनांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या रसायनांनी चेतवलेल्या नसतात; तर त्या विचारांवर आधारित असतात. या भावना प्रगतीकडे नेणाऱ्या, सहकारासाठी योग्य भावना असतात. त्या आपल्याला ‘मी’ कडून ‘आम्ही’कडे जायला, स्वहित आणि परहित यांची सांगड घालायला मदत करतात.

मेंदूच्या वाढीची वाटचाल पुढे चालूच राहिली. मागच्या ७-८ हजार वर्षांत अगदी पुढचा म्हणजे आपल्या कपाळामागचा मेंदूचा भाग वाढू लागला. तिथे निर्माण होणाऱ्या भावना या अधिकच नव्या. त्यांना उन्नत भावना म्हणतात. माणसाचे रूपांतर अधिक चांगल्या माणसामध्ये करणाऱ्या या भावना असतात. या भावनांना आपण सर्वसाधारण भाषेत माणुसकी म्हणतो. या भावनांसाठी ‘जगणे’ नुसते जिवंत राहणे नसून मनुष्यहिताचे संवर्धन करणे आहे.

थोडक्यात आपण उत्क्रांतीसोबत माणसाच्या बदलत जाणाऱ्या, समावेश होत गेलेल्या भावना पहिल्या तर त्या अशा आहेतः

आदिम भावना : केवळ जीव वाचवा, जगा. (उदा. : संताप, भीती, नैराश्य)

प्रगत भावना : एकमेकांच्या सहकार्याने जगा आणि इतरांना जगू द्या. (उदा. : ममता, समाधान, काळजी, मत्सर, नाराजी)

उन्नत भावना : स्वतःचा विकास करा, सोबत दुसऱ्याचाही विकास करा. (उदा. : दया, क्षमा, आस्था)

यापैकी प्रगत आणि उन्नत भावनेतील फरक परत एकदा बघूया. प्रगत भावनांच्यापाठी असणारा विचार म्हणजे जे माझे, माझ्यासोबत आहेत, ज्यांची मला मदत होते आहे, त्या सगळ्यांचे माझ्याकडून शुभचिंतन आणि भले करेन. तर उन्नत भावना शिकवते, की प्रत्येक व्यक्ती, मग ती माझ्या जवळची किंवा माझ्या विचारांची असो वा नसो; प्रत्येक माणसाचे भले होऊ दे. उन्नत भावनांच्या मागे असणारी ‘माझे लोक’ याची व्याख्या विस्तारित असते आणि मी आणि इतर यातील फरक संपतो. सर्व जीव एकरूप आहेत या विचाराकडे नेणाऱ्या त्या उन्नत भावना असतात.

आज प्रत्येक माणसाला या तीनही प्रकारांतील भावना अनुभवायला येतात. त्यांचे चित्ररूप एका इमारतीच्या स्वरूपात बघूया. भावना अपार्टमेंटच्या अगदी वरती आणि तळाशी आहेत त्या आदिम भावना, ज्या असह्य किंवा अतिसह्य भावना असतात. मधले मजले म्हणजे प्रगत भावना – सह्य आणि सुसह्य भावना. आपली प्रगती व्हायला, नेता आणि उद्योजक व्हायला, इतरांशी जोडून घ्यायला मदत करणाऱ्या भावना म्हणजे सह्य आणि सुसह्य भावना. आता यापुढे आपण आपल्या भावना ओळखू, तेव्हा भावना अपार्टमेंटच्या नक्की कुठल्या मजल्यावर आहोत, हे आता तपासायला लागूया.

(लेखक प्रथितयश मानसोपचारतज्ज्ञ आणि आयपीएच संस्थेचे संस्थापक आहेत.)

(संशोधन आणि शब्दांकन : डॉ. सुवर्णा बोबडे व शिल्पा जोशी)

kartashetkari@gmail.com

आजच्या लेखाशी संबंधित भाग बघण्यासाठी लिंक –

https://www.youtube.com/watch?v=Fi70y9u3hw8&t=61s

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT