Human Psychology : असह्य, सह्य आणि सुसह्य भावना

Article by Dr. Anand Nadkarni : सर्वसाधारणपणे आपण भावनांचे वर्गीकरण सकारात्मक (पॉझिटिव्ह) आणि नकारात्मक (निगेटिव्ह) असे करतो. मला भावना कशी वाटते, अनुभवायला येते त्यापरत्वे हे वर्गीकरण केलेले असते.
Human Psychology
Human Psychology Agrowon
Published on
Updated on

Human Feeling : मागील लेखात आपण ‘भावना’ म्हणजे काय आणि त्या कशा समजून घ्यायच्या ते पाहायला सुरुवात केली. भावनांचे वर्गीकरण कसे करायचे त्याबद्दल आज थोडं बोलूया.

सर्वसाधारणपणे आपण भावनांचे वर्गीकरण सकारात्मक (पॉझिटिव्ह) आणि नकारात्मक (निगेटिव्ह) असे करतो. मला भावना कशी वाटते, अनुभवायला येते त्यापरत्वे हे वर्गीकरण केलेले असते. सर्व सकारात्मक भावना हव्याशा वाटतात तर नकारात्मक भावना नकोशा वाटतात. आनंद, विश्‍वास, प्रेम या सकारात्मक भावना आणि निराशा, दु:ख आणि राग या नकारात्मक भावना.

पण आपण जर नीट तपासून पाहिले, तर काही प्रसंगी आपल्याला नकारात्मक भावनासुद्धा उपयोगी असू शकते. शिवाजी महाराजांना सुलतानी बादशाहीचा राग आला नसता, तर त्यांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली नसती. महात्मा गांधींना हरिजनांबद्दल वाईट वाटले नसते, तर त्यांना समान आणि माणुसकीची वागणूक मिळावी यासाठी त्यांनी चळवळ चालवली नसती.

Human Psychology
Human Psychology : इच्छाशक्ती टिकवायची युक्ती

अगदी आपल्याबाबत विचार केला तरी आपण वेळेवारी फवारणी, कापणी करतो, आळस झटकून कामाला लागतो ते आपल्याला परिणामांची काळजी वाटते म्हणून. एखाद्या मुलीला छेडणाऱ्या मुलाचा राग येतो आणि त्याला आपण ओरडतो. या उदाहरणातल्या राग आणि काळजी या भावना नकारात्मक म्हणाल का? नाही ना?

थोडक्यात, आपण सरधोपटपणे भावनांचे वर्गीकरण सकारात्मक-नकारात्मक करणे संपूर्णपणे समर्पक नाही. वाटायला त्रासदायक, अनुभवायला नकारात्मक अशी भावनादेखील उद्दिष्टांचा विचार करता सकारात्मक किंवा उपयुक्त असू शकते.

चला तर मग, भावनांचे जरा वेगळ्या पद्धतीने वर्गीकरण करूया.

एकच भावना आपल्याला वेगवेगळ्या तीव्रतेने अनुभवायला येते. समजा राग या भावनेचा विचार केला तर रागाची तीव्रता आणि कालावधी प्रसंगानुरूप बदलणार. माझ्यावर किंवा इतर कोणावर अन्याय होतो असे वाटते त्या वेळी जाणवणारा राग हा संताप असतो. किल्ली सापडत नसते त्यावेळी जाणवणारा राग म्हणजे चिडचिड. नको त्यावेळी पाहुणे टपकतात त्या वेळी जाणवणारा राग ही धुसफूस असते. म्हणजे राग ही एकच भावना असली तरी त्याची तीव्रता, वारंवारिता आणि कालावधी वेगवेगळा आहे. प्रसंग वेगळे म्हणून राग वेगळा.

कधी कधी तर एकाच प्रसंगात आपण असा अनुभव घेतो. असा एक प्रसंग आपण बघूया.

मुलगा आता मोठा झाला आहे. B.Sc. पूर्ण झालं आहे. वडील आता त्याने शेती हातात घेण्याची वाट बघत आहेत. पण मुलगा म्हणतो मी शहरात राहून MPSC ची तयारी करणार, मला नाही शेती करायची.

वडील थोडे निराश होतात पण शांत असतात. मग म्हणतात, “ठीक आहे, कर थोडे वर्ष प्रयत्न, मग बघू. तोपर्यंत मी आहेच.” त्यावर मुलगा म्हणतो, “मला हे बंधन नको.” मग वडिलांची थोडी चिडचिड होते. “बंधन नाही रे, प्रयत्न कर तू दोन-तीन वर्षं. पण नाही झाले त्यात काही, तर ये इकडे. तू नाही आलास तर मी काय कायम राबतच राहायचे का? मी कधी आराम करणार?”

मुलगा म्हणतो, “मला विचारून नाही घेतली कोणी शेती, माझी जबाबदारी नाही शेती!” मग वडिलांना संताप येतो! “माझ्या अपार मेहनतीची ही किंमत? लाज वाटायला हवी तुला! गरज नाही जा, एक रुपया नाही देणार तुला आता. सगळे मुलीच्या नावे करीन!”

या उदाहरणात वडिलांना जाणवणाऱ्या भावना - थोडी निराशा, मग शांतता. त्यानंतर चिडचिड आणि शेवटी संताप. शांतता ही सुसह्य भावना आहे त्यानंतर थोडी निराशा, चिडचिड या त्रासदायक, पण सह्य म्हणजे सहन करता येतील अशा भावना आहेत. मात्र त्यांना शेवटी आलेला संताप ही तीव्र आणि असह्य भावना आहे.

जेव्हा असह्य भावना जाणवते त्या वेळी त्या व्यक्तीकडून कसे वर्तन घडते?

कुठले वागणे / बोलणे आवडले नाही याबद्दल न बोलता पूर्ण व्यक्तीला दूषण दिले जाते. म्हणजे सगळे लक्ष वर्तनावरून व्यक्तीकडे जाते.

भावनेचे मनावर अधिराज्य होते. परिणामांची पर्वा केली जात नाही.

समोरच्या व्यक्तीला ‘संपूर्ण व्यक्ती’ दोषी / चूक / अयोग्य असे लेबल लावले जाते.

कोण चूक आणि त्या व्यक्तीला शिक्षा, धडा शिकवणे हे ध्येय होऊन जाते.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रश्‍नांची उकल करायला पर्यायांचा शोध, मांडणी, विचार होत नाही.

अवघड, अडचणीच्या प्रसंगी अगदी संपूर्ण शांत राहिले पाहिजे ही अपेक्षा करणे थोडे पुस्तकी आणि अवघड आहे. अशा प्रसंगी संताप ही भावना मदत न करणारी आहे. त्याने परिस्थितीवर तोडगा निघत नाही तर ती अधिक चिघळत जाताना दिसते आणि दुसरीकडे अगदी शांत राहणे अशक्य वाटते. पण चिडचिड ही भावना अशी आहे, की जी वास्तवाला जास्त अनुसरून आहे. चिडचिड होत असली तरी वडील तडजोडीला तयार होतील आणि ते मुलाची बाजू समजून घेऊन स्वतःचा मुद्दा मांडतील. या सह्य भावनेत पर्याय काढणे हे ध्येय दिसते. त्यामुळे आपल्याला चिडचिड ही भावना अनुभवायला जरी नकारात्मक असली, तरी ती भावना मदत करणारी दिसते आहे.

Human Psychology
Human Psychology : निर्णयाची जबाबदारी माझीच

आपल्याला असह्य भावना जाणवत असेल, तर प्रथम असह्य भावनानंकडून सह्य भावनांकडे यायला, भावनांचे नियोजन करायला हवे. स्वतःला असह्य भावनेकडून सह्य भावनेकडे आणण्यासाठी खालील मुद्दे विचारात घ्यायला हवेत :

१) उद्दिष्ट काय आणि प्राधान्य कशाला?

माझं नेमकं ध्येय काय आहे? (ध्येय मुलाला शेतीकडे वळविण्याचा प्रयत्न करणे हे आहे. वळवणारच असा हट्ट योग्य नाही.)

त्या ध्येयासाठी आता काय करायला हवे? (तर विसंवाद टाळून संवाद साधायचे प्रयत्न करायला हवेत.)

२) परिणाम आणि पर्याय

त्याच्या वागण्याचे परिणाम काय होणार आहेत? (परिणामांचा वास्तववादी विचार)

मला कायम काम करत राहावे लागेल. त्याला स्पर्धा परीक्षेत हवे तसे यश कदाचित मिळणार नाही.

त्यानंतर कोणते पर्याय उपलब्ध आहेत? (पर्यायांची मांडणी करणे.)

त्याने काही वर्षं प्रयत्न करणे, नाही झाले तर परत येणे. मी शक्य तोवर शेती करणे आणि मग योग्य पर्याय निवडणे.

३) वर्तनावर केंद्रित – व्यक्तीवर नाही

वर्तन पटत नाही / आवडत नाही

माझ्या मुलाने पूर्ण म्हणणे समजून घेतले नाही, त्याचे असे तुटक वागणे (वर्तन) मला आवडत नाही आहे. मुलगा वाईट असे म्हणणे म्हणजे त्या व्यक्तीवर लेबल लावणे, जे मला टाळायचे आहे.

व्यक्ती म्हणून जे नातं आहे त्याचे भान ठेवणे.

शेती की स्पर्धापरीक्षा या मुद्यापलीकडे जाऊन आमचे बाप-लेकाचे नाते आहे याचे भान ठेवणे.

४) ठपका (Blame) –

समस्या (Problem)

स्वत:ला किंवा दुसऱ्याला दोष देणे.

वर्तनावरून व्यक्तीवर गेलो, की आपण आपल्याला एका सापळ्यात अडकवतो, दोषारोपाकडे जायला लागतो. म्हणजे लेबलिंग सुरू होते. हा असा, ती तशी वगैरे.

समस्या नेमकेपणाने समजून घेणे महत्त्वाचे.

माझी मुलावर सत्ता नाही आहे. असलीच तर प्रेमाची आहे. पण तो एक स्वतंत्र व्यक्ती आहे. आणि या व्यक्तीचे माझ्या काही मुद्द्यांवर मतभेद आहेत.

आपली भावनांविषयी जाण वाढली (awareness), मी असह्य भावनेकडे जात आहे, पण मला परत सह्य भावनेकडे यायला हवे हे आपण ओळखले (acceptance) आणि वरच्या चार मुद्यांवर आपण लक्ष केंद्रित केले, तर त्या संतापाचे (असह्य भावना) रूपांतर त्रासलेपणा, चिडचिड (सह्य भावना) यात करू शकू.

सुसह्य भावना जाणवणे लगेच शक्य होणार नाही, पण संघर्ष आणि तिढा सुटलेला असेल. कारण सुसह्य भावना जाणविण्यासाठी संघर्षाची छाया पुसली जाऊन समेट होणे गरजेचे आहे.

संशोधन आणि शब्दांकन : डॉ. सुवर्णा बोबडे व शिल्पा जोशी

kartashetkari@gmail.com

आजच्या लेखाशी संबंधित भाग बघण्यासाठी लिंक –

https://www.youtube.com/watch?v=Fi70y9u3hw8&t=34s

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com