Human Psychology : भावनाओंको समझो

Article by Dr. Anand Nadkarni : शास्त्रज्ञांनी सर्वप्रथम बुद्ध्यांक शोधून काढण्याच्या चाचण्या विकसित केल्या. असा समज होता, की ज्याचा बुद्ध्यांक जास्त तो जीवनात यशस्वी असेल. मात्र वास्तव काही वेगळंच होतं.
Human Psychology
Human PsychologyAgrowon
Published on
Updated on

डॉ. आनंद नाडकर्णी

Human Feeling : मागील काही लेखांमध्ये आपण वेळेचं नियोजन किंवा इच्छाशक्ती निर्मितीक्षम कशी ठेवायची यावर बोललो. अडचणींचा मुकाबला कसा करायचा त्याच्या पायऱ्या समजून घेतल्या. यातल्या काही गोष्टी आपल्याला माहीत होत्या, तर काही नव्याने लक्षात आल्या. पण हे सगळं वापरताना येणारा एक समान अडथळा कुठला? आपल्याला “कळतं पण वळत नाही” असं का होतं? त्याचं कारण म्हणजे आपल्या भावना जरा गडबड उडवून देतात! खूप भीती किंवा तीव्र काळजी, राग किंवा हताशा अशा भावना आपल्याला हाताळायला लागतात.

आजच्या लेखात आपण आज या भावनांना अधिक खोलात जाऊन समजून घेऊया. आपण टेन्सोमीटर पाहिला तेव्हा या विषयाला थोडा स्पर्श केला खरा. अनेकविध भावना आपण अनुभवत असतो. मात्र त्यांच्याकडे बघण्याची वेगळी दृष्टी, सजगता हवी आणि आपण त्याबद्दल अधिक साक्षर होणं गरजेचं आहे. थोडं ‘और अच्छेसे भावनाओंको समझते है!’’

किती प्रकारच्या भावना असतात? तर इंग्रजीमध्ये चार मुख्य भावना सांगितल्या आहेत ः MAD (राग), SAD (दु;ख), BAD (वाईट वाटणं), GLAD (आनंद). आपल्या भावना या चार प्रकारांत मोडत असल्या, तरी या भावनांच्या विविध छटांचे वर्णन करणारे १५०० हून जास्त शब्द आहेत. आपण अनुभवतो ती भावना हा एक ठोकळेबाज अनुभव नसून त्या भावनेचा एक वर्णपट असतो. एखादा रंगपट किंवा इंद्रधनुष्यात एकाच वेळी अनेक प्रकारच्या छटा आपण अनुभवतो.

कर्ता शेतकरीचा एखादा एपिसोड बघत असताना किंवा आता हा लेख वाचत असताना तुमच्या मनात किती प्रकारच्या भावना येतात? तर कुतूहल, आदर, नवल, आपल्याला हे आधीच कळायला हवं होतं असा काहीसा खेद. म्हणजे एकाच वेळी एकाच प्रसंगात आपल्याला विविध भावना आणि त्याच्या छटा अनुभवता येतात. या छटा ओळखता येणं, भावनांचे नियमन करता येणं म्हणजे आपण आपल्या भावनांकावर (Emotional Quotient) काम करणं!

Human Psychology
Human Psychology : इच्छाशक्ती टिकवायची युक्ती

भावनांक म्हणजे काय? शास्त्रज्ञांनी सर्वप्रथम बुद्ध्यांक शोधून काढण्याच्या चाचण्या विकसित केल्या. असा समज होता, की ज्याचा बुद्ध्यांक जास्त तो जीवनात यशस्वी असेल. मात्र वास्तव काही वेगळंच होतं. बुद्ध्यांक आणि यश यांचा असा थेट परस्पर संबंध दिसत नव्हता. मग असं लक्षात येऊ लागलं, की बुद्ध्यांकाइतकाच महत्त्वाचा आहे भावनांक.

भावनांक माणसाला स्वत:ची आणि इतरांची जाण करून देतो, नातेसंबंध कसे ठेवायचे आहेत ते सांगतो, संवाद साधायला शिकवतो. या जाणिवा विकसित असलेल्या माणसाची कामं पट्कन होतात. त्याच्याशी इतर जण सहकार्य करतात. तो नेतृत्व करू शकतो, अनेकांना दिलासा देऊ शकतो.

भावनांक म्हणजे काय?

स्वत:च्या आणि दुसऱ्याच्या भावना समजून घेणे.

आपल्या भावनांचे नियोजन करणे.

आपल्या आणि दुसऱ्यांच्या भावनांचे समायोजन करणे.

या सगळ्याची मिळून भावनिक बुद्धिमत्ता (emotional intelligence) तयार होते. प्रत्येक भावनिक अनुभव गतिशील असल्यामुळे तो ऊर्जा तयार करतो. हा अनुभव सहा घटकांचा मिळून बनतो. आपण ज्याला शाळेतील हुशारी म्हणजे शैक्षणिक / टक्केवारीची हुशारी म्हणतो त्याला एक मर्यादित अर्थ असतो.

भावनिक बुद्धिमत्ता मात्र आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सर्व अंगांनी महत्त्वाची असते. त्याहून महत्त्वाचे म्हणजे स्वत:चा भावनांक कोणत्याही वयात विकसित करता येतो. बुद्ध्यांकाच्या विकासाला जशी एक मर्यादा असते तशी भावनांक विकासाला नाही. भावनांची जाण विकसित करायची तर त्याचे काय मार्ग आहेत?

निरीक्षण – परीक्षण

समोरील व्यक्तीचे निरीक्षण करणं. तिची देहबोली, चेहऱ्यावरचे हावभाव, डोळ्यातील भाव, हातवारे, स्वरांमधील चढ-उतार, वर्तन या सगळ्यांकडे लक्षपूर्वक बघणे.

स्वत:चंही निरीक्षण करणं. काव्य, लिखाण, नाटक, चित्रपट, वाचन उत्तम पुस्तक डोळ्यासमोर एक चित्र निर्माण करतं. त्याच्या जोडीला मनात कोणत्या भावना येत आहेत याचं भान विकसित करणं सहज शक्य असतं. नाटक, चित्रपट पाहताना देखील आपण असं करू शकतो. कोणत्याही कलेचा अनुभव म्हणजे आपला स्वत:चा भावनिक अनुभव समृद्ध करण्याची संधी म्हणून पाहता येतं. उदा. काव्यातील प्रत्येक शब्दामागे भावना असते.

संगीताची जादू

संगीत म्हणजे एका विशिष्ट पद्धतीने केलेलं भावनांचे प्रगटीकरण. शब्दांचे लौकिक अर्थ व त्यामागील भावार्थ उलगडून दाखवण्याचं काम संगीत करतं. काही वेळेस त्या शब्दांमधले नेमके भाव पोहोचवायचं काम संगीत करतं. एक उदाहरण घेऊ. प्रेम या एका भावनेचे विविध कंगोरे असतात.

जसे की वात्सल्य, मग ते पालक – मूल, व्यक्ती – निसर्ग, व्यक्ती – पाळीव प्राणी, नागरिक – देश, असं अनेक रूपात असेल. आणि त्या काव्यांच्या शब्दामागे दडलेला भावनांचा पिसारा संगीत खुलवून दाखवतं. भावनेने समृद्ध करत नाही असा एकही अनुभव नसतो. त्यामुळे प्रत्येक क्षण म्हणजे भावनिक जाण वाढवायची एक संधी असते.

भावनांक वाढवण्याचे एकूण तीन टप्पे आपल्याला करता येतील :

जाण आणि भान (Awareness)

स्वीकार (Acceptance)

पृथक्करण (Analysis)

जाण आणि भान (Awareness)

काही वेळा दिसणारी भावना आणि त्यामागे लपलेली भावना अशा दोन भावना माणूस अनुभवत असतो. कधी कधी तर या दोन्ही भावना अगदी परस्परविरुद्ध असतात.

उदाहरणार्थ, मुलं परीक्षेच्या वेळी अभ्यास न करता खेळत असतात. आई हे बघते आणि रागावते. यात दिसणारी भावना म्हणजे राग आणि लपलेली भावना म्हणजे मुलांच्या अभ्यासाबद्दलची काळजी, त्यांच्याविषयी असलेले प्रेम.

Human Psychology
Orange Rate : संत्रा निर्यात अनुदानाची घोषणा फडणवीसांची घोषणा म्हणजे लबाडाचे आवतण ?

कधी कधी आपण असेही बघतो, की पिकाला भाव नाही म्हणून शेतकरी त्यावर रोटाव्हेटर फिरवून टाकतो. अशा प्रसंगीसुद्धा वर दिसणारी भावना राग असते आणि दडलेली भावना दुःख, चिंता, निराशा अशी असते. आपले संत अनेक वेळा विठ्ठलाबरोबर भांडायचेसुद्धा, कधी आर्त होऊन त्याची याचना करायचे तर कधी त्यांना प्रेमाचा उमाळा यायचा. माझी व्यक्त होणारी किंवा दिसणारी भावना कोणती आहे आणि दडलेली/लपलेली भावना कोणती आहे हे ओळखायला, त्याचे निरीक्षण करायला आपल्याला शिकले पाहिजे. या निरीक्षणाचा उपयोग आपल्याला भावनांची जाण आणि भान वाढविण्यासाठी करून घ्यायचा आहे. हा भावनांक वाढविण्याचा पहिला टप्पा होय.

स्वीकार (Acceptance)

भावनेचा स्वीकार म्हणजे जी भावना आपण अनुभवतो आहे आणि जी व्यक्त करतो आहे त्याची जबाबदारी माझी आहे. सहसा आपण चांगल्या भावनांचा स्वीकार करायला नेहमीच तयार असतो. जसे की - मी हसतमुख आनंदी स्वभावाचा आहे, मी अडचणीला अगदी धीराने सामोरे जातो, मैत्री या भावनेला जागणारा माझ्यासारखा दुसरा कोणी नाही!

मात्र निगेटिव्ह/दुःखद भावनांच्या बाबतीत आपण अशी जबाबदारी घेत नाही. उदाहरणार्थ - ही गल्लीतली माणसं अशी आहेत ना की ती भडकवतात, याने टेंशन दिलं, बँकेचा मॅनेजर संताप देतो, बायको दु:ख देते, मुलं काळजी/चिंता देतात. म्हणजे दुःखद भावनांचा दोष बायको, मुलं, वरिष्ठ यांचा! पण खरं म्हणजे भावना माझ्या अंतरंगात, मनात निर्माण होते, माझ्या विचारांतून ती येते. त्यामुळे भावनांची संपूर्ण जबाबदारी माझी आहे. माझ्या सुखावह आणि त्रासदायक अशा दोन्ही भावनांची पूर्ण जबाबदारी माझी हा विचार म्हणजे माझ्या भावनांचा स्वीकार.

पृथक्करण – Analysis

स्वीकारानंतरचा टप्पा म्हणजे पृथक्करण. या टप्प्यात आपण भावनांचे वर्गीकरण करतो. सर्वसाधारणपणे आपण भावनांचे वर्गीकरण सकारात्मक (Positive) आणि नकारात्मक (Negative) असं करतो. मात्र असे भावनांचे वर्गीकरण संपूर्णपणे समर्पक नाही. जीवनाकडे बघता नकारात्मक भावना टाळता येणे शक्य नाही. त्या आपल्याला जाणवणार आहेतच. भावनांचे नेमके पृथक्करण आणि वर्गीकरण कसे करायचे, ते आपण पुढच्या लेखात पाहू.

संशोधन आणि शब्दांकन :

डॉ. सुवर्णा बोबडे व शिल्पा जोशी, kartashetkari@gmail.com

(आजच्या लेखाशी संबंधित भाग बघण्यासाठी लिंक

https://www.youtube.com/watch?v=Fi70y9u3hw8)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com