Rural Life
Rural Life Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Life : गप्पा-गोष्टींची खंडित झालेली परंपरा

शेखर गायकवाड

गेल्या १०० वर्षांत आपल्या सर्वांत जवळच्या अशा गप्पा गोष्टीमध्ये सुद्धा केवढा बदल झाला आहे. मागच्या सर्व पिढ्यांचे बालपण हे गोष्टींनीच सुरू झाले होते. म्हणून आईकडून, आजी-आजोबांकडून (Grandfather) ऐकलेली लाकूडतोड्याची गोष्ट हीच आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील पहिली गोष्ट होती. अगदी अलीकडे म्हणजे १९८० पर्यंत घरातल्या म्हाताऱ्या माणसांकडून लहान मुले गोष्टी ऐकत असत.

ग्रामीण महाराष्ट्रातल्या वाडी वस्तीवर एखादे आजोबा असायचे आणि मुले झोपी जाईपर्यंत त्यांच्या गोष्टी ऐकत हुंकार देत बसायचे. गोष्टी सांगण्याची ही परंपरा अचानक खंडीत झाल्यासारखी जी वाटते ती मुख्यतः इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे! मुलाची शाळेतील भाषा आणि आईची भाषा यात अंतर पडले आहे. लहान मुले जेव्हापासून इंग्रजी शाळेत जायला लागली तेव्हापासून ही परंपरा खंडित झाली आहे.

गावाच्या पारावर, एस.टी. स्टॅण्डवर गप्पा-गोष्टी करणारे पूर्वी टोळकेच दिसत असे. या सगळ्या टोळक्यांमध्ये एकच वृत्तपत्र दिवसभर फिरत असे. आज मुंबईत काय घडले आणि दिल्लीत काय घडले याबद्दलच्या राजकीय गप्पा तासन् तास रंगत असत. मुंबईला कामाला असलेला गिरणी कामगार जरी एसटीने गावात उतरला तर त्याला चहा पाजून ‘काय म्हणते मुंबई? मंत्रालय काय म्हणते?’ असा प्रश्‍न विचारला जाई.

तो गोदीत काम करणारा कामगार वर्षभरात एकदाही मंत्रालयात फिरकला नसला तरी मुंबईला काय चालले आहे, याची बातमी तो स्वतः प्रत्येक राष्ट्रीय नेत्याला ओळखतो अशा थाटात सांगत असे. तो खरे बोलतो की खोटे बोलतो याची चौकशी करण्याच्या भानगडीत कोणीही पडत नसे. सालकरी गडी, जमीन मालक, ज्येष्ठ म्हातारे लोक हे सुद्धा गोष्टी वेल्हाळ असत. गप्पा-गोष्टी करताना त्या खऱ्या असल्याच पाहिजेत आणि खोट्या असल्या तर लगेच समोरच्याचा मुद्दा खोडला पाहिजे असा आजकाल सोशल ‍मीडियावर दिसत असलेला अट्टहास त्या काळी कुणी धरत नव्हता.

विद्यार्थी दशेत असताना आम्ही एकदा एका शेतकऱ्याच्या वस्तीवर गेलो होतो. तेव्हा त्यांच्याकडे एक फार मोठा शिकारी कुत्रा होता. तो अंगावर येईल अशी भीती वाटल्यामुळे आम्ही सगळे विद्यार्थी रस्त्यावरच उभे राहिलो होतो. तेवढ्यात तो शेतकरी घरातून बाहेर आला आणि आम्हाला म्हणाला, ‘घाबरु नका!’ त्यावर आम्ही त्याला तुमचा कुत्रा फार डेंजर दिसतो असे सांगितले. त्यावर तो शेतकरी म्हणाला, ‘‘भारताच्या मिलिटरीने दोनदा या कुत्र्याला मागितले होते, पण मी त्यांना नाही असे सांगितले!’’

आमच्या ग्रुपमधील एक विद्यार्थी विद्यापीठात परत येईपर्यंत खरंच हा कुत्रा भारताच्या मिलिटरी ने मागितला होता का, असा प्रश्‍न विचारात होता. शिवाय त्या मित्राला आम्हाला सांगावे लागले, की ही ग्रामीण भागातील बोलण्याची पद्धत आहे. अशाच गप्पा नातेवाइकांबरोबर, मित्र भेटल्यावर, गोष्टी रंगत असत. त्यामुळे जीवनामध्ये एक प्रकारचा आनंद निर्माण होत असे. हसत खेळत माणसे एकमेकांच्या गुणांवर आणि अवगुणांवर टीका करीत असत.

समान वयाचे लोक आता भेटेनासे झाले आहेत. माणूस एकलकोंडा होत गेला आहे. त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येतात तो प्रथम एकलकोंडा राहायला लागतो व तसतसा तो एकांतवासात एकटाच विचार करीत बसतो. त्यानंतर आत्महत्येला परावृत्त होतो असे म्हणतात. गावात राहणारी माणसे शेतामध्ये, मळ्यामध्ये राहायला गेल्यावर स्वतंत्र बंगले बांधून राहू लागली आहेत. त्यामुळे बंगल्याचे दरवाजे उघडून आवर्जून एकमेकांशी संवाद होत नाही. माणसे कुठल्यातरी निमित्ताने एकमेकांच्या घरामध्ये न जाता रस्त्यावर येऊन तासन् तास बोलताना आपण पाहतो.

जी गंमत गप्पांची होती तीच गोष्टींची. पण गोष्टी या संस्कृती, इतिहास आणि मूल्ये यांना लोकांशी जोडणारा दुवा असतात. पूर्वीच्या काळी अनेक मोठमोठे विचारवंत सभांमधून व परिषदांमधून जनतेला समजून सांगतांना बोधकथांचा आधार घेत. विनोबा भावे हमखास गोष्टी सांगून संवाद साधत असत. अब्राहम लिंकन हे महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्यांवर संवाद साधताना समाजात घडलेल्या बोधकथा सांगत असत.

आजही गोष्ट म्हटली की लहान मुलांपासून आबाल वृद्धांपर्यंत सर्वांचे कान टवकारले जातात. इसापनीती, हितोपनिषद, अकबर बिरबलाच्या गोष्टी, या गोष्टीरूप वाङ्‍मयाने पिढ्यान् पिढ्या घडल्या आहेत. चिऊ-काऊच्या गोष्टी, चल रे भोपळ्या टुणुकटुणुक, बुडबुड घागरी, लहानपणापासून उंदीर, गरुड, घुबड यांच्या गोष्टी, थोडे मोठे झाल्यावर घोड्यावरील राजकुमार, नल-दमयंती, तहान-भूक लाडूच्या, राक्षसाच्या आणि चेटकिणीच्या गोष्टी ऐकत आपले कान तृप्त होत असत. नंतर बोधकथा आणि मग शौर्यकथा.

छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या कथा ऐकून स्फूर्ती मिळत असे. शाळेत जायला लागल्यावर टोपी विकणाऱ्या माणसाची व माकडांची गोष्ट, ससा-कासवाच्या शर्यतीची गोष्ट ऐकत मुले मोठी होत. हमखास रेल्वे स्टेशनवर चांदोबा घेऊनच मुले आई-वडिलांबरोबर प्रवासाला निघत.

दिवसभर खेळून दमलेली मुले आईच्या मांडीवर गोष्ट किंवा अंगाई गीत ऐकतच झोपी जात. दूरदर्शनवर देखील मराठीमध्ये गावाकडच्या गप्पा या मानसिंग पवार यांच्या कार्यक्रमामध्ये किंवा शांता शेळके आणि सरोजिनी बाबर यांच्या गोष्टीरूप संवादाच्या गोष्टी ग्रामीण महाराष्ट्रात अतिशय प्रसिद्ध झाल्या होत्या. गेल्या शतकामध्ये झालेल्या बदलामध्ये एकमेकांमधल्या गप्पा पण कमी झाल्या आणि गोष्टीही कमी झाल्या, असे निर्विवादपणे म्हणता येईल. ऑडिओ बुक्समुळे हा हरवलेला आनंद परत येईल का?

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT