Nanded News : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. यात जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना अंतर्गत शासनाकडून मंजूर ७४९ कोटी रुपयांच्या वार्षिक आराखड्याला जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली.
नांदेड जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी (ता. २७) डॉ. शंकरराव चव्हाण, नियोजन भवनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे तसेच जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्यांसह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
सुरवातीला मागील नियोजन समितीच्या बैठकीच्या इतिवृत्ताच्या अनुपालनास मान्यता देण्यात आली. तसेच सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी गेल्या मार्च महिन्यात झालेल्या खर्चाला बैठकीमध्ये मान्यता घेतली गेली. गेल्या वर्षीच्या वार्षिक नियोजनात जिल्ह्यातील विविध विकास कामावर जिल्हा वार्षिक योजनेतून ६५९ कोटी खर्च झाले आहे. ९९.९९ टक्के अशी ही खर्चाची आकडेवारी आहे.
जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना अशा एकत्रित जिल्हा वार्षिक योजनेच्या २०२४- २५ आर्थिक तरतुदीच्या विनियोजनाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. २०२४-२५ या वर्षासाठी ७४९ कोटीची तरतूद मंजूर असून त्यापैकी शासनाकडून २३१ कोटी निधी प्राप्त झाला आहे.
जुलै अखेरपर्यंत वितरित झालेला निधी व झालेला खर्च याबाबतचा आढावा आज घेण्यात आला. या बैठकीत आतापर्यंत जिल्ह्यात झालेले पावसाचे प्रमाण, धरणातील पाणीसाठा, जिल्ह्यातील रस्त्याच्या कामांची सद्यःस्थिती, तसेच अर्धवट रस्त्यांच्या कामांना निधी उपलब्ध करुन मिळण्याबाबत, हर घर जल योजनेत घराघरांत पाणी पोहोचण्याबाबत सुरवातीला चर्चा झाली.
त्यानंतर बैठकीमध्ये लोकप्रतिनिधींनी काही प्रमुख समस्यांवर सभागृहात उपस्थित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च होण्याची कार्यवाही यंत्रणांनी करावी. निवडणूक आचारसंहितेपूर्वी विकास कामे मार्गी लागतील यांची दक्षताही घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जिल्ह्यात सौरऊर्जा निर्मितीवरही भर द्यावा, शेतकऱ्यांना खताचा तुटवडा भासणार नाही यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.