Jalgaon News : हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत २०२२-२३ मध्ये जिल्ह्यातून सहभागी झालेल्या ५५ हजार केळी पीकविमाधारकांना लवकरच किंवा येत्या काही दिवसांत परतावे मिळणार आहेत. सुमारे ३८५ कोटी रुपये निधी या परताव्यांपोटी जिल्ह्यात वितरित केला जाईल, अशी माहिती जळगाव लोकसभा क्षेत्राचे खासदार उन्मेष पाटील यांनी दिली.
खासदार पाटील म्हणाले, की फळ पीकविमा योजनेत २०२२-२३ मध्ये जिल्ह्यातून ७७ हजारांवर शेतकऱ्यांनी ८१ हजार ८१० हेक्टर क्षेत्रासाठी विमा संरक्षण घेतले होते. या सहभागी शेतकऱ्यांनी केळी पीक लागवडीचा सातबारा उतारा, जिओ टॅगिंग केलेले छायाचित्र आदी कागदपत्रांसह प्रस्ताव दिले. यातील ५५ हजारांवर शेतकऱ्यांची पीक पडताळणी व जिओ टॅगिंग झाली.
उर्वरित सुमारे २७ हजार शेतकऱ्यांची पीक पडताळणी विमा कंपनीने वेळेत केली नाही. मे २०२३ ची मुदत पीक पडताळणीसाठी देऊनही पीक पडताळणी झाली नाही. ही पडताळणी योजनेत सहभागानंतर ४० ते ४५ दिवसांत करणे आवश्यक आहे.
परंतु विमा कंपनीने चुका केल्या. यातच योजनेत सहभागी शेतकऱ्यांच्या शेतात केळी आहे की नाही, याबाबत संशयकल्लोळ सुरू होता. चौकशी, एमआरसॅटच्या मदतीने पीक पडताळणी व ज्यांच्या पिकांची पडताळणी झाली आहे, त्यासंबंधी पुन्हा किंवा फेरपडताळणी, असा प्रकार सुरू होता.
कृषी विभाग व विमा कंपनीने चुका केल्या, आता शेतकऱ्यांना परताव्यांपासून कसे वंचित ठेवता येईल, असा प्रश्न कृषी आयुक्तालयातील वरिष्ठांकडे उपस्थित केले. यात कृषी आयुक्तालयातील मुख्य सांख्यिकी विभागाने जळगाव जिल्ह्यातील ५५ हजारांवर शेतकऱ्यांना लवकरच परतावे दिले जातील. ३८५ कोटी रुपये एवढा निधी त्यापोटी या शेतकऱ्यांना मिळेल.
तसेच उर्वरित २७ हजार शेतकऱ्यांना परतावे मिळण्यासंबंधी शेतकऱ्यांसोबत लवकरच कृषी विभाग, मंत्रालय स्तरावरील अधिकारी, विमा कंपनीच्या वरिष्ठांची भेट घेतली जाईल. ई-पीकपाहणीचा अहवाल ग्राह्य धरून विमाधारकांना परतावे दिले जावेत, अशी मागणी केली जाईल.
कृषी मंत्रालय स्तरावर याचा अहवाल प्राप्त होणार असून, तेथे केळी विमाधारकांना परताव्यांसाठी पाठपुरावा केला जाईल. तसेच जिल्ह्यातील सात तालुक्यांतील २७ महसूल मंडळांतील खरीप पीकविमाधारकांना लवकरच २५ टक्के अग्रिम परतावे मिळतील, असेही खासदार पाटील यांनी म्हटले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.