Amaravati News : शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला आहे. वाढत असलेला आलेख थांबविण्यासाठी शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसोबत हमीदर व शेतीसोबत पूरक व्यवसाय उपलब्ध करून देण्यात येत असलेले अपयश यानिमित्ताने अधोरेखित होत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यात सुमारे ५४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.
पश्चिम विदर्भाला लागलेला शेतकरी आत्महत्याग्रस्त भागाचा कलंक पॅकेज व कर्जमाफी देऊनही मिटलेला नाही. कोरडवाहू पट्ट्यातील शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न व समस्यांकडे दुर्लक्ष असल्यानेच हा प्रश्न जटिल बनत असल्याचे वास्तव आहे. यंदा खरीप हंगामाच्या तोंडावर अमरावती जिल्ह्यात एप्रिल, मे व जून महिन्यात ५४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. नापिकी, कमी उत्पादन, बाजारात मिळणारा कमी दर व त्यामुळे वाढलेला कर्जाचा डोंगर, ही कारणे त्यामागे आहेत.
उत्पादनाची सरासरी व बाजारात हमीदराची हमी दोन्ही अनिश्चित असल्याने आत्महत्यांचा आलेख कमी होत नसल्याचे मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. आत्महत्या रोखण्यासाठी पुरेसे प्रयत्न कृषी विभागाकडून केल्या जात नसल्याचे चित्र समोर आले आहे. शेतपिकांच्या उत्पादनवाढीसाठी नावीन्यपूर्ण प्रयोग व संशोधन होत नसल्याने आजही पारंपरिक पिकांच्या भरवशावर शेतकरी आहे.
पठडीतील कार्यक्रम राबविण्यावर भर देत काही प्रयोगशील शेतकऱ्यांचा सत्कार करणे एवढ्यावरच समाधानी आहेत. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आढावा बैठकीत उत्पादनवाढीसाठी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना गावभेटी देत संवाद कार्यक्रम राबविण्याचे आदेश देण्याची वेळ आली. उत्पादनवाढीसाठी नावीन्यपूर्ण प्रयोग व हमीदर यावर ठोस कृतीसह अंमलबजावणी केल्यास आत्महत्यांचा आलेख कमी करता येणार आहे, हे यानिमित्ताने स्पष्ट होऊ लागले आहे.
उत्पादकता, हमीदर नाही
गत हंगामात जिल्ह्यात ६ लाख ६९ हजार हेक्टर क्षेत्रात खरिपाची पेरणी झाली. सोयाबीनच्या उत्पादनाची सरासरी २.३३ क्विंटल, कापसाची ५.६४ व तुरीची उत्पादकता ४.७० क्विंटल प्रति हेक्टर आली आहे.
या हंगामात सोयाबीनला बाजारात चार हजार, कापसाला ६५०० व तुरीला सहा हजारांवर दर मिळू शकलेला नाही. शासकीय खरेदी करण्यात आली असली तरी त्याचा लाभ पंचवीस टक्के शेतकऱ्यांना मिळाला. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना कमी दरात माल विकावा लागला. हमीदर मिळू शकला नसल्याने आर्थिक स्थिती सुधारू शकली नाही.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शासकीय निकषांप्रमाणे मदत दिली जाते. यावरच शासकीय कार्यक्रम संपतो. या कुटुंबांसह अन्य शेतकऱ्यांना रेशीम व्यवसाय, चारा उत्पादन, दुग्ध उत्पादन, वृक्षलागवड अशा पूरक व्यवसायांसाठी ठोस प्रयत्न होत नसल्याने पारंपरिक शेतीत अडकलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढू लागल्याचे वास्तव आहे.- जगदीश नरवाडे, अध्यक्ष, जन आंदोलन आधार संघर्ष समिती
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.