Sangli News : गेल्या दोन ते तीन वर्षांत वाढलेला उत्पादन खर्च, अतिवृष्टी, फुलोरावस्थेत पडणारा परतीचा पाऊस, वाढती मजुरी, आटोक्यात न येणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. परिणामी, गेल्या वर्षभरात राज्यात अंदाजे ३० हजार एकर क्षेत्रांवरील बागा काढून टाकल्या असल्याचा प्राथमिक अंदाज द्राक्ष बागायतदार संघाने व्यक्त केला आहे.
गेल्या पाच ते सहा वर्षांपूर्वी द्राक्षाला पोषक वातावरण होते. पुरेसा पाऊस आणि अपेक्षित दर यामुळे राज्यातील द्राक्ष बागांच्या क्षेत्रात वाढ झाली होती. दर वर्षी सुमारे ४० ते ५० हजार एकरांवर नव्या द्राक्षाची लागवड होत असल्याने द्राक्षाच्या क्षेत्रात वाढ झाली. त्यामुळे राज्यात अंदाजे साडेचार लाख एकर द्राक्षाचे क्षेत्र विस्तारले आहे.
कोरोनापूर्वी द्राक्षाला चांगले दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र कोरोना काळात ऐन हंगामात विक्रीची व्यवस्था कोलमडली. त्यातूनही शेतकऱ्यांनी द्राक्षाची विक्री केली. परंतु अपेक्षित दर मिळाला नसल्याने आर्थिक फटकाही शेतकऱ्यांना बसला. मात्र शेतकरी खचला नाही. त्यातूनही शेतकरी आर्थिक संकटातून सावरण्यासाठी पुन्हा जोमाने उभारला.
दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून अतिवृष्टी, परतीचा पाऊस आणि मॉन्सूनोत्तर पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे अगोदर आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याची स्थिती ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशी झाली आहे. गेल्या वर्षभरात फळ छाटणी वेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे छाटणीचे नियोजन विस्कळीत झाले.
तसेच द्राक्ष फुलोरावस्था, काढणीच्या वेळेस पाऊस आणि सातत्याने बदलणारे वातावरण या साऱ्यामुळे द्राक्षावर डाऊनी, करपा रोगांचा प्रादुर्भाव व आणि जिवाणूजन्य, बुरशीजन्य करप्यामुळे काढणीला आलेल्या द्राक्षाचे नुकसान झाले. परिणामी बागा वाचवण्यासाठी अतिरिक्त खर्चही करावा लागला आहे.
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नैसर्गिक संकट, रोगाचा प्रादुर्भाव यांसह विविध कारणांमुळे आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. बागांसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेडही करणे कठीण बनले आहे. परिणामी, बहुतांश शेतकऱ्यांनी द्राक्षाचे क्षेत्र कमी करण्याकडे वळाले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जुन्या बागांसह नव्या बागांवर कुऱ्हाड चालवली असून, ते द्राक्ष बागेऐवजी आंबा, पेरू, सीताफळ अशा फळ लागवडीकडे वळले आहेत. गेल्या वर्षभरात ३० हजार एकरांवरील द्राक्षाचे क्षेत्र काढले असल्याचा अंदाज द्राक्ष संघाने व्यक्त केला आहे.
दर वर्षी वाढतोय उत्पादन खर्च
द्राक्ष पीक अतिसंवेदशनशील आणि जोखमीचे. त्यामुळे बदलत्या वातावरणामुळे द्राक्षावर रोगाचा प्रादुर्भाव लगेच होतो. त्यामुळे कीड-रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी फवारणी करतो. अर्थात, उत्पादन खर्च वाढला होता. दोन वर्षांपूर्वी अंदाजे प्रति चार किलोसाठी ८० रुपये असा उत्पादन खर्च होता.
तोच खर्च गेल्या वर्षी ९० रुपयांपर्यंत गेला. या वर्षी उत्पादन खर्च १० रुपयांनी वाढला असून, १०० रुपये प्रति चार किलो इतका झाला आहे. द्राक्षाला मिळणारा दर आणि उत्पादन खर्च याचा ताळमेळ लागत नाही. त्यामुळे घातलेले पैसेही हाती पडत नसल्याने शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला आहे.
द्राक्ष लागवडीसाठी ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका
राज्यातील द्राक्ष बागेवर नैसर्गिक आपत्तीमुळे जरी कुऱ्हाड चालवली असली तरी, शेतकरी द्राक्ष लागवड करण्यासाठी इच्छुक आहेत. द्राक्षाचे पेटेंट आणि नॉन पेटेंट वाण आले आहेत. परंतु या वाणांची लागवड करण्यासाठी बागेचे संपूर्ण स्ट्रक्चर बदलण्यासाठी खर्च आहे. त्यामुळे सध्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना तेवढा खर्च करणे अवघड आहे. तसेच प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरून ठेवणाऱ्या वाणांची गरज आहे. त्यामुळे द्राक्षामध्ये नवीन पेटेंट आणि नॉन पेटेंटच्या वाणाची प्रतीक्षा ते करत आहे. एक-दोन वर्षे थांबून पुन्हा नवीन द्राक्ष लागवडीसाठी ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका शेतकरी घेऊ लागला आहे.
...ही आहेत कारणे
* बदलत्या हवामानाचा फटका
* उत्पादन खर्चात वाढ
* द्राक्षाच्या दरातील चढ-उतार
* रोगाच्या प्रादुर्भावामुळे नुकसान वाढले
* द्राक्ष व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक
* अति पावसाचा फटका
* घड जिरणे
गेली पंधरा वर्षे सहा एकर द्राक्ष पिकवतोय. मात्र गेल्या तीन वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेमुळे द्राक्षाचे नुकसान होत आहे. त्यातच खर्चही वाढला असल्याने ताळमेळ लागत नाही. यंदाही बागेचे नुकसान झाले, त्यामुळे तीन एकर बाग काढण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. तीन एकरांत बाग आहे. यंदा दर कसे राहतात त्यावर उर्वरित बाग काढायची की ठेवायची हे ठरवणार आहे.अनिल पाटील, एरंडोली, ता. मिरज
राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवरील संकट कमी होताना दिसत नाही. तसेच अतिरिक्त होणारा खर्च या साऱ्यामुळे गणिते बिघडू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी द्राक्षबागा काढू लागल्या आहेत, हे वास्तव आहे. राज्यात किती बागा काढल्या आहेत, याचा आढावा घेतला जाणार आहे. एका बाजूला शेतकरी एक-दोन वर्षे थांबून पुन्हा नव्याने पेटेंट, नॉन पेटेंट द्राक्षाची लागवड करतील अशी आशा आहे.कैलास भोसले, अध्यक्ष, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.