Kolhapur Weather Update : कोल्हापूर जिल्ह्यातील धरणक्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे परंतु अनेक तालुक्यात मागच्या २४ तासांपासून पावसाने दडी मारली आहे. दिवसभरात एक-दोन मोठ्या सरींचा अपवाद सोडला तर पावसाचा जोर झाल्याचे पहायला मिळालं. धरणक्षेत्रात मात्र पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे राधानगरी धरणातून १९ हजार ८३८ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. रात्री आठ वाजता राजाराम बंधाऱ्यावर नदीची पाणीपातळी २६ फूट ४ इंच इतकी नोंदवण्यात आली. जिल्ह्यातील २४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
मागच्या २४ तासांत जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक ७४.४ मिमी पाऊस पडला. धरणक्षेत्रातील पावसामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे काही ठिकाणी नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. जिल्ह्याच्या पश्चिम भागात काही ठिकाणी रोप लावणीचे काम सुरू झाले आहे. सोयाबीन, भुईमूग, भात यांची पेरणी काही ठिकाणी झाली असून, काही ठिकाणी पेरणीचे काम सुरू आहे.
राधानगरी धरणात २.९७ टीएमसी पाणीसाठ्याची नोंद झाली तर राधानगरी धरणातून १ हजार २०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, वारणा नदीवरील चिंचोली व माणगांव, भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे व सरकारी कोगे, कासारी नदीवरील यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व वालोली, घटप्रभा नदीवरील पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानडे-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी, तारेवाडी व हिरण्यकेशी नदीवरील साळगांव असे २४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा टीएमसीमध्ये
राधानगरी २.९७, तुळशी १.४७, वारणा १३.२६, दूधगंगा ५.८६, कासारी १.०१, कडवी १.३७, कुंभी ०.९६, पाटगाव १.८२, चिकोत्रा ०.५२, चित्री ०.७१, जंगमहट्टी ०.६१, घटप्रभा १.५६, जांबरे ०.७६, आंबेआहोळ ०.९१, सर्फनाला ०.१२ व कोदे लघु प्रकल्प ०.१२ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी फुटात, राजाराम २६.४, सुर्वे २५.४, रुई ५५, इचलकरंजी ५२, तेरवाड ४५.९, शिरोळ ३६, नृसिंहवाडी ३३, राजापूर २२.९ तर नजीकच्या सांगली १०.९ व अंकली १४.२ अशी आहे.
तुळशी धरण पाणलोट क्षेत्रात संततधार
तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असून, २४ तासांत २०२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून, ४१ टक्के धरण भरले आहे. तुळशी धरणाची पाणीपातळी ६०३.५४ मीटर असून, पाणीसाठा ३९.५५२ दलघमी झाली आहे.
२४ तासांत २०२ मिलीमीटर पाऊस झाला असून, आजअखेर एकूण पाऊस ७४६ मिलीमीटर इतकी नोंद झाली आहे. दरम्यान, तुळशी धरणाला समांतर असलेला केळोशी बुद्रुक येथील लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे.
वारणेचे पाणी पात्राबाहेर
चांदोली धरण क्षेत्रात होत असलेली मेघवृष्टी आणि या परिसरात मंगळवारी झालेल्या पावसामुळे वारणा नदी पात्रात पाण्याची वाढ झाल्यामुळे नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. पाणी पाहण्यासाठी चिकुर्डे बंधाऱ्यावर लोकांची गर्दी झाली होती.
चांदोली धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे, तर वारणा परिसरात सोमवार व मंगळवारी दमदार एन्ट्री केल्यामुळे शेतकऱ्यांनी उर्वरित पेरण्या उरकल्या. धरण क्षेत्रात जोराचा पाऊस झाल्यामुळे वारणेच्या पातळीत कमालीची वाढ झाली. चिकुर्डे बंधाऱ्याला बुधवारी दिवसभर नदीचे पाणी घासून सुरू आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.