Pune News : राज्याच्या २८८ जागांसाठी ४ हजार १४० उमेदवारांचे भविष्य आज (ता.२०) मतपेटीत बंद होणार असून सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४ टक्के मतदान झाले आहे. राज्यात सर्वाधिक मतदान गडचिरोली येथे ३० टक्के मतदान झाले आहे. तर नांदेडमध्ये सर्वात कमी १३.६७ टक्के मतदान झाले आहे. दरम्यान अनेक ठिकाणी मशीन बंद पडल्यामुळे मतदारांचा खोळंबा झाला. तसेच यावेळी अनेक नेत्यांसह सेलिब्रेटींनी मतदानाचा हक्क बजावला.
यांनी बजावला मतदानाचा हक्क
भारतरत्न, तथा निवडणूक आयोगाचे ब्रँड आम्बेसिटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. तेंडुलकर यांनी मुंबईत मतदान करताना, सर्वांनी बाहेर पडून मोठ्या प्रमाणाता मतदान करा, मतदानाचा हक्क बजावा, असे आवाहन केले. यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मतदान केले. यानंतर मतदारांनी बाहेर पडत मतदान करावे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.
आजी-माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार एकनाथ शिंदे यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बाजावला. यावेळी त्यांनी, आज लोकशाहीचा उत्सव असून प्रत्येकाने मतदान केले पाहिजे. यामुळे देश मजबूत होईल. लोकांनी आमचे अडीच वर्षांचे काम पाहिले आहे, असे म्हटले आहे. तर उपमुख्यमंत्री आणि नागपूर दक्षिण-पश्चिमचे भाजपचे उमेदवार देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मी सर्वांना विनंती करू इच्छितो की लोकशाहीचा उत्सव सुरू असून यात सहभाग ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. ज्या लोकांना त्यांच्या सरकारकडून अपेक्षा आहेत. त्यांच्यासाठी मतदान करावे.
बारामतीमध्ये पवार विरूद्ध पवार
अख्या राज्याचे लक्ष सध्या बारामती विधानसभेकडे लागले आहे. येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरूद्ध शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांच्यात थेट लढत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्नीसह बारामतीत मतदानाचा अधिकार बजावला. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार यांनी देखील मतदानाचा हक्क बजावताना, बारामतीमधील जनता मला मोठ्या मताधिक्याने निवडून देईल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह युगेंद्र पवार यांनी काटेवाडी येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
सरसंघचालक भागवत यांचे मतदान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. तर मुंबईत अभिनेता अक्षय कुमार, राजकुमार राव, सुनील शेट्टी कार्तिक आर्यनने मतदान केले. तसेच लातूर येथील मतदान केंद्रावर अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसोझा यांनी देखील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केले.
मतदान प्रक्रिया थांबली
दरम्यान मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत बूथ क्रमांक २९२ येथील मशीन बंद पडले. यामुळे मतदान प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे. नवी मुंबई नेरुळमधील शिवाजीनगर मतदान केंद्राजवळ राऊटर आढळल्याने एकच खळबळ उडाली. तर नांदगाव मतदारसंघातील १६४ नंबर मतदान केंद्रावरील ईव्हीएम दोनदा पडलं बंद. यामुळे मतदारांना ताटकळत उभारावे लागले.
धुळे शहरात देखील दोन ठिकाणी मतदान यंत्रामध्ये बिघाड झाला. साक्री मतदारसंघातील जामदा आणि धुळे शहरातील विद्यावर्धिनी येथील मतदान केंद्रामध्ये बिघाड झाला. मतदान यंत्र बंद पडल्याने गोंधळ उडाला. यानंतर प्रशासनाने योग्य कारवाई करून मतदान पुन्हा सुरू केले.
मतदानादरम्यान राडा
नांदगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे यांच्या गटात तूफान राडा झाला. मतदानासाठी सुहास कांदे यांनी बोलावलेल्या मतदारांना समीर भुजबळांनी आडवल्याने नांदगाव-मनमाड रस्त्यावर मोठा राडा झाला.
मतदानावर बहिष्कार
कन्नड तालुक्याती रामनगर गावाने मतदानावर बहिष्कार टाकला आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदान केंद्रावर शुकशुकाट पसरला आहे. गावात पायभूत सुविधांसह स्मशानभूमी नसल्याच्या काराणाने मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.