Farmer Suicide
Farmer Suicide  Agrowon
ताज्या बातम्या

Farmer Suicide : शेतकरी तरुणांच्या आत्महत्यांनी समाजमन सुन्न

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
मारेगाव, जि. यवतमाळ : तालुक्यातील म्हैसदोडका येथील बोथले कुटुंबातील दोघे सख्खे भाऊ असलेल्या युवा शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmer Suicide) केली. शेतकरीपुत्र असलेल्या तरुणांच्या आत्महत्यांनी नवीनच सामाजिक प्रश्‍न निर्माण होत आहेत. त्यावर सामूहिकपणे विचारमंथनाची गरज आहे.

मारेगाव तालुक्यात गेल्या ऑगस्ट महिन्यांत सहा दिवसांत सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील सर्वच तरुण २८ ते ४७ या वयोगटातील आहेत. त्यात काही शेतकरी तर काही शेतकऱ्यांची मुले आहेत. शासनाच्या लेखी त्या आत्महत्या शेतकरी आत्महत्या म्हणून पात्र ठरतील किंवा ठरणार नाहीत, पण शेतकरीपुत्रांच्या आत्महत्यांनी नवीनच सामाजिक प्रश्‍न उपस्थित केले आहेत. याची दखल शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी घेतली. त्यांनी दिवसभर तालुक्यातील म्हैसदोडका, नरसाडा, रामेश्‍वर व गदाजी (बोरी) या गावांचा दौरा करून त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले. त्यांनी तालुक्यातील म्हैसदोडका येथील वासुदेव बोथले यांची भेट घेतली. वासुदेव बोथले यांच्या संतोष व सतीश या दोन तरुण मुलांनी एका पाठोपाठ आत्महत्या केली. त्यांच्याकडे सामायिक ५ एकर जमीन आहे. त्यांच्या वाट्याला दोन एकर जमीन आली आहे. बटईची पाच सात एकर जमीन ते कसतात. त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा गाडा चालतो. शेतीतून गुजराण होत नसल्याने त्यांचा मोठा मुलगा शंकर नागपूरला खासगी नोकरी करतो. तर संतोष हा गडचांदूर येथे खासगी काम करीत होता. सतीश गावातच सालगडी होता. पोटाची खळगी भरण्यासाठी मुलांनी रोजगार शोधले खरे परंतु कुटुंबाची वाताहत झाली. त्यात कोविडमध्ये रोजगार गेले. शेतात सतत नापिकी झाली. वडिलांना मदत करायची तर वडिलांनाच मदत मागण्याची वेळ आली. हे सहन न झाल्याने संतोषने आत्महत्या केली. त्या पाठोपाठ सतीशनेही केली. एकाच कुटुंबातील दोन तरुण मुलांनी आत्महत्या केल्याने बोथले कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मारेगाव तालुक्यात सहा दिवसांत सात आत्महत्या
(२६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट)
१ सतीश वासुदेव बोथले (वय २८) म्हैसदोडका
२ गजानन नारायण मुसळे (वय २८) नरसाडा
३ हरिदास सूर्यभान टोणपे (वय ४७) शिवणी (धाबे)
४ सचिन सुभाष बोडेकर (वय २८) रामेश्‍वर
५ कुंडलिक मारोती रुमारकर (वय ४३) गदाजी बोरी
६ तोताराम अंगद चिंचूरकर (वय ४५) दांडगाव
७ अविनाश जीवन मेश्राम (वय २८) वेगाव


अवैध धंदे जोरात, शासकीय योजनांचा बट्ट्योबळ
मारेगाव तालुक्यात १ जानेवारी ते १ सप्टेंबर २०२२ या आठ महिन्यांत ४१ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. येथील जनजीवन शेतीवर आधारित आहे. अनेक गावांत रोजगार हमीची कामे बंद आहेत. त्यामुळे शेतमजुरांना व शेतकऱ्यांना कामे नाहीत. शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मटका, दारू, जुगारामुळे तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. आदिवासीबहुल तालुका असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फारशे लक्ष नाही. नेतृत्वाचा अभाव असल्याने सामाजिक प्रश्‍नांची सोडवणूक होत नाही. यामुळे आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ही फारच चिंतेची बाब आहे.
-------
शेतकरी आत्महत्या भरपाईचे
निकष बदलणे गरजेचे
तालुक्यात सहा दिवसांत सात तरुणांच्या आत्महत्या झाल्याने समाजमन सुन्न झाले आहे. त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. यातील बहुतेक तरुणांच्या नावाने ७/१२ नसून त्यांचा वडिलोपार्जित जमिनीत वाटा आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येनंतर मिळणाऱ्या नुकसानभरपाईचा लाभ त्यांना मिळणार नाही. शेतकरीपुत्र हे सुद्धा शेतकरीच असून शेतीतील संकटांमुळेच त्यांच्यावरही आत्महत्येची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने शेतकरी आत्महत्येचे निकष बदलून अशा प्रकरणात उघड्यावर पडलेल्या कुटुंबांना दिलासा देणे गरजेचे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

Village Development : शेती प्रयोगशीलता अन ग्रामविकास...

Panchayat Development Index : पंचायत विकास निर्देशांक

Vegetable Market : कडक उन्हाचा पालेभाज्यांवर परिणाम, मार्केटमध्ये आंबेच आंबे

Agriculture Import : आयातीत कसली आत्मनिर्भरता?

SCROLL FOR NEXT