Maharashtra Dam Water Update : पावसाचा जोर कमी झाल्याने संभाव्य पूरपरिस्थितीचा धोका टळला. तात्पुरते स्थलांतरित झालेले नागरिक पुन्हा आपल्या घरी परतले. धरणांतील विसर्ग सुरू असल्याने नद्यांची पाणीपातळी संथगतीने वाढत आहे. शुक्रवारी (ता. २८) दुपारपर्यंत कोयना धरणातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
महाबळेश्वर व पाटण तालुक्यांत चांगला पाऊस असल्याने कोयना धरणांतून पाण्याचा विसर्ग अद्याप कायम असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. वारणा धरणांतूनही ६६९० क्युसेक पाण्याचा विसर्ग कायम आहे. अलमट्टीतून १ लाख ७५ लाख हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग कायम होता. शुक्रवारी दिवसभरात आणि गुरुवारी दुपारपासून सुरू असलेला विसर्ग कायम होता.
अलमट्टीतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने याचा सकारात्मक परिणाम कृष्णा नदीची पातळी स्थिर राहण्यावर झाला आहे. शुक्रवारी (ता. २८) कृष्णा नदीची पाणीपातळी आयर्विन पुलाजवळ १८ फूट इतकी होती. दोन दिवसांपूर्वी ती १८.६ फूट होती. गुरुवारी सायंकाळपासून ती १८ फुटावर स्थिर झाली.
कृष्णा नदीच्या उपनद्यांच्या पाण्यात संथ गतीने वाढ होत असली तरी याचा फारसा परिणाम कृष्णा नदीचे पाणी वेगाने वाढण्यावर झाला नाही. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने व धरणामधूनही पाणी सोडताना नियोजन असल्याने गतीने पाणी वाढत नसल्याचे चित्र आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी (ता. २७) कोल्हापूर येथे बैठक घेऊन पूरस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले.
नागरिकांना विनाकारण भीती घालू नये, असे आवाहन अधिकाऱ्यांना केल्यानंतर प्रशासनाकडूनही पाणी वाढण्याबाबत सातत्याने वर्तविण्यात येणारे अंदाज थांबविण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात पूर्वेकडील तालुक्यांमध्ये दिवसभरात अधूनमधून सूर्यदर्शनही झाले. सांगली जिल्ह्यात शिराळा वगळता अन्य तालुक्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतली. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, पाटण तालुका वगळता अन्य तालुक्यांत पावसाचा जोर ओसरला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.