अशोक निंबाळकर ः सकाळ वृत्तसेवा
Nagar News : कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसी आरक्षण मिळते. परंतु अनेकांच्या कुणबी नोंदी सापडूनही त्यांना पूरक पुरावे जोडता येत नाहीत. विशेषतः मराठवाड्यातील दप्तर निजाम राजवटीत विखुरले आहे. त्यातील उर्दू, मोडीतील कागदपत्रे पडताळताना सरकारी अधिकारी कुणबी प्रकरणे प्रलंबित ठेवतात. परिणामी बहुतांश समाजबांधव प्रमाणपत्र मिळविण्याच्या वाटेला जात नसल्याची स्थिती आहे.
मराठा समाजाला आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. सरकारने मराठवाड्यातील सर्व मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे. निजाम राजवटीत मराठ्यांना आरक्षण होते. तशी नोंद असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, कुणबी नोंदीचे पुरावे शोधताना संबंधितांची दमछाक होते.
निजामाची बहुतांश कागदपत्रे ही हैदराबादच्या संग्रहालयात आहेत. गावचे दप्तर हे तहसील कार्यालयात आहे. त्या कागदपत्रांची उकल करणारी यंत्रणा नाही. वंशावळ जुळल्याशिवाय अधिकारी प्रकरणे निकाली काढीत नाहीत. सामान्य माणूस कोणत्या तरी एजंटाच्या कच्छपी लागून लाखो रुपये गमावून बसतात. एकच नोंद ग्राह्य धरण्याबाबत अध्यादेश निघाल्याशिवाय कोंडी फुटणार नाही.
रेकॉर्ड तिथेच, गावांची अदलाबदल
निजाम राजवटीत महसूल पुराव्यांवर बहुतांश कुणबी, मराठा बांधवांच्या रेकॉर्डवर कास्तकर ही नोंद आहे. ही नोंद कुणबी बांधवांना अडचणीची ठरते. त्या राजवटीत न्याय-निवाड्यावेळी जातीचे उल्लेख करण्याची प्रथा नव्हती.
मराठवाड्यातील काही तालुके पश्चिम महाराष्ट्रात आले. नगरमधील काही तालुके, गावे मराठवाड्यात समाविष्ट केले. त्या रेकॉर्डचीही अदलाबदल झाली नाही. ती कुणबी दाखल्याची प्रकरणे नेमकी कोठे दाखल करायची याबाबतही संदिग्धता आहे. यातून प्रकरणे प्रलंबित राहतात.
नेमकी अडचण काय ?
कुणबी दाखल्यासाठी शाळेचे रेकॉर्ड, महसूल पुरावे, कोर्टाचे निकाल, शासन निर्णय ग्राह्य धरले जातात. मराठवाडावगळता उर्वरित महाराष्ट्रात ब्रिटिश राजवट होती. तिथे कोर्टाचे निकाल, महसूल नोंदी, जन्म मृत्यूच्या नोंदी करताना जातीचा उल्लेख केला जायचा.
मराठवाड्यात मात्र जन्म-मृत्यूच्या नोंदीवेळी जातीचा उल्लेख आढळत नाही. केवळ घराच्या नोंदीत जातीचा उल्लेख आहे. ही कागदपत्रे उर्दू आणि मोडीतील आहेत. निजाम संस्थान बरखास्त झाल्यानंतर दप्तराची फारशी दखल घेतली नाही. ते अपडेट नाही. त्यामुळेही पुरावे शोधताना अडचणी येतात.
कुणबी प्रमाणपत्रासाठी दोन पुरावे महत्त्वाचे असतात. शाळेच्या दाखल्यात कुणबी उल्लेख आढळला तरी त्याची महसुली पुराव्याशी तसेच वंशावळीशी पडताळणी करावी लागते. ती सापडली नाही तर प्रमाणपत्र मिळत नाही. काहींना तर नेमकी कागदपत्रे कोठे शोधायची हेही माहिती नसते. त्यामुळे त्यांची फसवणूक होऊ शकते. ‘मोडी किरण’ पुस्तकातून ही संदिग्धता दूर करण्याचा प्रयत्न केला.- डॉ. संतोष यादव, मोडी अभ्यासक, नगर.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.