नगर ः अतिवृष्टी, सततच्या पावसाने खरिपातील बहुतांश पिके वाया (Crop Damage) गेली. आता रब्बीवर (Rabi Season) मदार आहे. रब्बीतील पिके पाणी देण्याच्या स्थितीत असताना विजेचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. विजेची मागणी (Electricity Demand) वाढत असल्याने ऐन पाणी देण्याच्या काळातच वीज गायब होत आहे. त्यात वीजथकबाकी असलेल्या शेतकऱ्यांचे वीज तोडली (Power Connection Cut Off) जात आहे. त्यामुळे सध्या पाणी उशाला आणि कोरड घशाला अशीच स्थिती होऊ लागली आहे. वीज तोडू नये, नुकसानीच्या काळातील वीजबिल माफ करावे आणि दिवसा पूर्ण दाबाने वीज देण्याची मागणी होत आहे.
पावसामुळे यंदा रब्बीमधील ज्वारी, हरभरा, गहू पेरणीला उशीर झाला. आता ज्वारीचे पीक पाणी देण्याच्या स्थितीत असून कापसाच्या जागी हरभरा, गहू पेरण्याची लगबग सुरू आहे. मात्र केवळ वेळेत वीज नसल्याने पेरण्याला अडथळे येत आहेत. मुळात गेल्या वर्षभरापासून आर्थिक टंचाईत असलेल्या शेतकऱ्यांना वीजबिल भरणे शक्य झाले नाही.
मात्र वीजबिल थकलेल्या शेतकऱ्यांची वीज तोडण्याची मोहीमच महावितरणने हाती घेतली आहे. त्यामुळे जिल्हाभर वीजेचा प्रश्न गंभीर होत आहे. ज्या काळात वीज मिळते ती दिवसाएवजी रात्री असते. सध्या कडाक्याची थंडी असतानाही रात्री जागरण करून शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्याचा प्रयत्न करावा लागत आहे. नगर जिल्ह्यातील सर्वच भागात संघटना, स्थानिक नेते विजेसाठी आंदोलन करत आहेत.
‘बिल माफ झाले पाहिजे’
नगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात खरिपाची बहुतांश पिके वाया गेली आहेत. खरिपावर अवलंबून शेतकरी कर्ज घेतात. पीकच आले नसल्याने कर्ज भरण्याची चिंता असताना वीज बिल कोठून भरणार, रब्बीत पिकांना पाणी देण्याची गरज असताना त्याच काळात वीज कापली जात असेल, तर हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे.
शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विचार करून किमान या वर्षभरातील वीजबिल माफ करण्याची गरज आहे अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी केली आहे. याबाबत वीजमंत्र्यांना भेटून मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगर तालुक्यात वेळेवर वीज मिळत नसल्याने रब्बी पिकांना पाणी देता येईना. खरिपाची पिके गेली, आता रब्बीचा आधार असताना विजेअभावी पाणी मिळाले नाही तर त्याचा थेट फटका उत्पादनावर होणार आहे. वीज तोडू नका असे नेते सांगतात. मात्र प्रत्यक्षात वीजतोडायचे काम सुरूच आहे.संदेश कार्ले, नेते, नगर तालुका
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.