Nagpur News कृषी महाविद्यालयाच्या (Agriculture College) इमारतीसाठी लवकरच निधी देऊ, असे आश्वासन देणाऱ्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना मागे फिरताच शब्दांचा विसर पडला.
परिणामी तब्बल १६६ वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन इमारतीत कृषी शिक्षणाचे (Agriculture Education) धडे गिरविणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. या इमारतीसाठी ८० कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे.
नागपुरी हिवाळी अधिवेशनकाळात कृषिमंत्र्यांच्या हस्ते डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गतच्या शास्त्रज्ञ निवासाचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी त्यांनी मोडकळीस आलेल्या कृषी महाविद्यालयांच्या इमारतींसाठी लवकरच निधी देण्याची घोषणा केली होती.
परंतु, तीन महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही त्यांनी या संदर्भाने चकार शब्दही काढला नाही. परिणामी कृषी शाखेच्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
सध्याचे कृषी महाविद्यालय ज्या इमारतीत आहे, ती इमारत व्हिक्टोरिया राणीसाठी महल म्हणून ब्रिटिश कालावधीत १६६ वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. १९०६ मध्ये या ठिकाणी कृषी महाविद्यालय सुरु करण्यात आले. त्याला देखील आज ११७ वर्ष झाली आहेत.
जागतिक वारसा म्हणून या इमारतीची नोंद असल्याने त्यात कोणत्याही सुधारणा करावयाच्या असल्यास पुरातत्त्व खात्याची परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर देखील फार काही बदल इमारतीत करता येत नाहीत.
परिणामी ही इमारत पूर्णतः मोडकळीस आली असून कधीही कोसळण्याची भीती आहे. मात्र असे घडल्यास येथे शिक्षण घेणाऱ्या ११०० विद्यार्थ्यांच्या जिवाचे काय? असा प्रश्न आहे.
इमारतीची अवस्था पाहता ती कधीही कोसळू शकते. त्यामुळेच दोन वर्षांपूर्वी नव्या इमारतीसाठी ५० कोटी रुपयांचा निधी मागण्यात आला होता. परंतु, त्याची तरतूद करण्यात आली नाही. आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी पाहणी करीत नव्या इमारतीसाठी ८० कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला आहे.
गुजरातमधील मोरबी येथे झुलता पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेकांना जीव गमवावा लागला होता. तोवर त्या पुलाच्या देखभाल, दुरुस्तीची दखल घेतली गेली नाही. कृषी महाविद्यालयाबाबतीत देखील प्रशासन अशाच दुर्घटनेच्या प्रतीक्षेत आहे का? कारण पावसाळ्यात संपूर्ण इमारतीला गळती लागते. इमारतीची दुरवस्था झाली आहे.
- विद्यार्थी, कृषी महाविद्याल, नागपूर.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.