Pune News : कांद्याचे अधिक उत्पादन झाल्यामुळे शेतकऱ्यांना कमी दर मिळून मोठे नुकसान होते. हे होऊ नये, म्हणून शेतकरी कांदा चाळ उभारणीवर भर देण्यात येत आहे. राज्यात २०२२-२३ या आर्थिक वर्षात शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अनुदानातून तब्बल दहा हजार ५५३ कांदा चाळी उभारल्या आहेत. त्यामुळे जवळपास दोन लाख ५१ हजार टन कांद्याची साठवणूक क्षमता तयार झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
शेतकरी कांद्याची दरवर्षी जून-जुलैमध्ये, लेट खरीप कांद्याची सप्टेंबर-ऑक्टोबर, तर उन्हाळी कांद्याची जानेवारी-फेब्रुवारीत लागवड करतात. काही शेतकरी खरीप, लेट खरीप आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामांत कांद्याची लागवड करतात.
एकाच वेळेस हा कांदा बाजारात आला तर शेतकऱ्यांना कमी दर मिळतो. त्यामुळे मोठे नुकसान होते. ते होऊ नये म्हणून त्याची साठवणूक करून त्यानंतर हळूहळू कांदा विक्रीस आणणे आवश्यक असते.
त्यासाठी कांदा चाळी महत्त्वाच्या ठरतात. २५ टन क्षमतेची एक कांदा चाळ उभारणीस जवळपास दोन ते तीन लाख रुपये खर्च येतो. परंतु कृषी विभागाकडून ५० टक्के (२५ टनांसाठी ८७ हजार ५०० रुपये) अनुदान दिले जाते.
कृषी विभागाने जवळपास दहा हजार ५५३ कांदा चाळीसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियानातून कांदा चाळीसाठी अनुदान दिले आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत तब्बल ९३ हजार ७१९ कांदा चाळी उभारल्या गेल्या आहेत.
त्याची कांदा साठवणूक क्षमता २१ लाख ९९ हजार टन झाली आहे. याशिवाय शेतकरी कंपन्यांनाही राज्य शासनामार्फत थेट एक हजार टन कांदा साठवणुकीसाठी अनुदान दिले आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.
मात्र मागील दोन महिन्यांत वादळी पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पावसाने भिजलेला कांदा साठवणूक करणे अशक्य असले तरी न भिजलेल्या कांद्याची साठवणूक केली आहे. त्यादृष्टिने अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळी उभ्या केल्या आहेत, अशी माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे.
यंदा साडेपाच लाख हेक्टरवर लागवड
राज्यात खरीप, लेट खरीप आणि रब्बी कांद्याचे सरासरी सात लाख २२ हजार ९१९ हेक्टरच्या दरम्यान क्षेत्र आहे. त्यापैकी खरीप आणि लेट खरीप कांद्याची एक ते दोन लाखांच्या दरम्यान लागवड दरवर्षी होते. रब्बी हंगामाचे सरासरी पाच लाखांच्या दरम्यान क्षेत्र आहे. त्यापैकी चालू वर्षी जवळपास साडे पाच लाख हेक्टरवर लागवड झाल्याची स्थिती होती. उत्पादित कांद्याच्या साठवणुकीसाठी शेतकरी कांदा चाळ उभारणीवर भर देत आहेत.
थोडक्यात महत्त्वाचे...
- २५ टन क्षमतेची एक कांदा चाळ उभारणीस दोन ते तीन लाख रुपये खर्च
- कृषी विभागाकडून ५० टक्के (२५ टनांसाठी ८७ हजार ५०० रुपये) अनुदान
- राज्यात आतापर्यंत तब्बल ९३ हजार ७१९ कांदा चाळी तयार
- कांदा साठवणूक क्षमता पोचली २१ लाख ९९ हजार टनांवर
दरवर्षी कांद्याची सुमारे चार ते पाच एकरावर लागवड करतो. उत्पादित कांद्याला कमी दर मिळत असल्यास त्याची साठवणूक करतो. त्यासाठी कृषी विभागाच्या अनुदानातून ५० टन कांद्याची चाळ आठ वर्षांपूर्वी उभारली होती. त्याचा फायदा आजही होत आहे.- ईश्वर वाघ, कांदा उत्पादक, पारगाव, ता. दौंड
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.