War Impact on Agriculture: पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे भारतातील शेती क्षेत्राला मोठा फटका बसत आहे. युद्धामुळे खतांची संभाव्य टंचाई आणि एल-निनोचे सावट यामुळे येणाऱ्या खरीप हंगामावर प्रश्नचिन्ह लागले आहे. शेतीमालाची पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे शेतीमालाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारातही अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे केंद्र सरकार आयातीला पायघड्या आणि निर्यातीला अडसर घालण्याच्या मानसिकतेत आहे. .थोडक्यात चोहोबाजूंनी शेतकऱ्यांची कोंडी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पण शेतीबाबत हे सगळे नकारात्मक चित्र असताना एकच चांगली गोष्ट घडताना दिसत आहे; ती म्हणजे युद्धामुळे कापसाला झळाळी येण्याची शक्यता. गेल्या काही दिवसांपासून कापसाचे दर वाढत आहेत. जवळपास संपूर्ण हंगामात हमीभावाच्या खाली असलेल्या कापसाने आता उसळी मारली आहे..Agriculture Input Crisis: पॅकेजिंग साहित्यटंचाईची खते, बियाण्यांना झळ.अकोट बाजारसमितीत तर कापसाचे भाव नऊ हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील प्रमुख बाजारांत मागील काही दिवसांपासून कापसाच्या भावात सुधारणा होत आहे. युद्धामुळे क्रुड तेलाचे दर वाढल्याने पॉलिस्टरसारख्या कृत्रिम धाग्याच्या किमती वाढल्या. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला. त्यामुळे कापसाला वाढलेली मागणी, रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे महाग झालेली आयात, आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा आणि देशात कापूस व सुताला मिळालेला उठाव यामुळे कापसाच्या भावात वाढ दिसून आली आहे..कृत्रिम धाग्यांच्या किमती पूर्णपणे पेट्रोकेमिकल्सवर अवलंबून आहेत. युद्धामुळे त्यांचा पुरवठा अनिश्चित झाल्याने पाॅलिस्टर आणि इतर मानवनिर्मित कापडाच्या किमती २५ ते ४० टक्के वाढल्या आहेत. तसेच कच्च्या तेलाच्या तुटवड्यामुळे अनेक देशांत उत्पादनही घटले. त्यामुळे कापड निर्मितीसाठी कापसाला उठाव वाढला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मागील महिनाभरात कापसाच्या भावात १५ टक्के वाढ दिसून आली. चीन, बांगलादेश आणि व्हिएतनाम या प्रमुख कापड उत्पादक देशांकडून भारतीय कापसाला मागणी वाढली आहे. भारताची सूत आणि रुईची निर्यात वाढत आहे. दुसरीकडे तेलाचे भाव वाढल्याने सरकीलाही चांगला उठाव आहे..Agriculture Challenges: शेतीतील आव्हानांसाठी कृती कार्यक्रम गरजेचा ः डॉ. राय .गेल्या काही वर्षांपासून कापसाचे पीक आतबट्ट्याचे ठरत होते. त्यामुळे महाराष्ट्रात गेल्या वर्षी कापसाचे लागवड क्षेत्र ४२ लाख हेक्टरवरून ३८.५ लाख हेक्टरवर घसरले होते. पण आता कापसाला चांगले दिवस येण्याची शक्यता दिसू लागल्याने आगामी खरिपात शेतकरी पुन्हा कापसाकडे मोर्चा वळवण्याची शक्यता दाट दिसते. त्यामुळे देशपातळीवर विचार केला तर कापसाचे क्षेत्र २० टक्क्यांपर्यंत वाढण्याची चिन्हे आहेत. .महाराष्ट्रातही लागवड वाढून आधीच्या ४२ लाख हेक्टरच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात एल-निनोबद्दल स्पष्टता आल्यानंतर लागवडीचे नेमके चित्र काय राहणार याचा अंदाज येईल. पण सध्याच्या प्राथमिक अनुमानानुसार येणाऱ्या खरिपात शेतकरी कापसाला पसंती देतील. एकंदर बाजाराच्या आघाडीवर असे सकारात्मक चित्र असताना कापसाची घटती उत्पादकता आणि त्याला कारणीभूत असणारी सरकारी धोरणे हा मात्र चिंतेचा विषय ठरला आहे. .देशात गेल्या २० वर्षांपासून जीएम कापसाच्या बाबतीत नवीन तंत्रज्ञान आलेले नाही. एचटीबीटी कापसाचा विषयही अनिर्णित आहे. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात आपण खूपच पिछाडीवर पडलो आहोत. सध्या केवळ उच्च घनता लागवड पद्धत वगळता संशोधन संस्था आणि विद्यापीठांकडे शेतकऱ्यांना सांगण्यासारखे काही नाही. त्यामुळे धोरणात्मक पातळीवर तातडीने निर्णय घेऊन कापसाची उत्पादकता वाढविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा पांढऱ्या सोन्याची शोकांतिका कायम राहण्याची भीती शेतकऱ्यांना छळत राहील..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.