Kolhapur News कोल्हापूर : सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या पाटगाव परिसरातील मध जागतिक स्तरावर नेण्यासाठी पाटगाव (ता. भुदरगड) हे ‘मधाचे गाव’ (Honey Village) म्हणून विकसित करण्यात येत आहे.
जिल्ह्याच्या पश्चिमेकडे असणाऱ्या निसर्गसंपदेमुळे पाटगाव परिसरातील मधाचा दर्जा उत्कृष्ट आहे. या परिसरातील मधपाळांना थेट मधविक्री (Honey Sell) करता यावी यासाठी प्रशासनाने हे गाव मधाचे गाव म्हणून विकसित करण्याचे निश्चित केले.
पाटगावसह अन्य वाड्यावस्त्यांतील मधपाळांना एकत्र करून मध संकलन (Honey Collection) व विक्रीसाठी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यात येत आहे. सर्टिफाइड शेतकऱ्यांची ही कंपनी परिसरातील मधाचा गोडवा जगभर पसरवणार आहे.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा नियोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पाटगावमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
यामध्ये मधपाळांना प्रशिक्षण देणे, त्यांना सेंद्रिय मधाबाबतचे सर्टिफिकेट देणे, मध विक्रीसाठी व्यासपीठ निर्माण करून देणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. पाटगाव परिसरातील शिवडाव, अंतुर्ली, मठगाव, भारमलवाडी, डेळे, चांदमवाडी मनी, तळी भटवाडी या वाड्यावर त्यातील शेतकरी पाटगावअंतर्गत एकत्र येत आहेत.
दोन हजार पेट्यांद्वारे मध संकलन
सध्या पाटगाव परिसरात सुमारे २०० मधपाळ मध संकलन करीत आहेत. यामध्ये सेंद्रिय मध उत्पादन करणारे मधपाळ ४२ आहेत. या परिसरात सुमारे २००० पेट्यांद्वारे मधाचे संकलन केले जाते. परिसरातून वर्षाला आठ ते दहा टन मध तयार होतो.
हा मध उत्कृष्ट असूनही वैयक्तिकरित्या त्याची विक्री होत असल्याने शेतकऱ्यांना त्याची अपेक्षित किंमत मिळत नाही. यामुळे परिश्रम करूनही तोट्यात मधाची विक्री करावी लागते.
या भागातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळी ओळख मिळावी यासाठी पाटगावच्या मधाचे ब्रँडिंग करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. या प्रकल्पाला शासनाची नुकतीच मंजुरी मिळाली आहे.
त्यानंतर आता हे गाव मधाचे उत्पादन करणारे गाव म्हणून प्रसिद्धीस आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी वेगवान प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांची प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येत आहेत.
...असे सुरू आहेत प्रयत्न
गावातील नोंदणीकृत मधपाळाचा एकत्रित मध संकलन करणे. भेट देणाऱ्या पर्यटकांना मधाची अद्ययावत माहिती उपलब्ध करून देणे. पर्यटकांना मधाची शुद्धता व गुणवत्ता दाखवण्यासाठी लाईव्ह डेमो करून दाखवणे.
सामायिक सुविधा केंद्र उभारणे, माझा तपासणीकरिता प्रयोगशाळा प्रोसेसिंग व पॅकेजिंग सुविधा ब्रॅण्डिंग करून स्थानिक पातळीवर विक्री केंद्र उभारणे. गाव जागतिक स्तरावर येण्यासाठी आकर्षक रस्ते व दिशादर्शक फलक लावणे.
मध आणि मधाचे उपयोग व उत्पादने, साहित्य, पुस्तके, सीडी विक्रीसाठी उपलब्ध करून देणे. गावातील प्रत्येक घरावर मधाची माहिती असणारे रेखाटन करणे. सेल्फी पॉईंट उभारून मधाबाबत जागृती वाढवणे. हनी बी ब्रीड सेंटर उभारणे.
भुदरगड तालुक्यात अतिशय उत्कृष्ट दर्जाचा मध तयार होतो. उत्पादन करणाऱ्या कष्टाळू उत्पादकांना व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी आम्ही मधाचे गाव ही संकल्पना सुरू केली आहे.
शासनाचे विविध विभाग यांना एकत्र आणून आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. महात्मा गांधी नॅशनल फेलो संदेश जोशी यांच्या सहकार्याने गावात मधा बाबत नावीन्यपूर्ण योजना राबवण्याचा प्रयत्न सुरू आहेत.
- डी. डी. कुरुंदवाडे, जिल्हा खादी व ग्रामोद्योग अधिकारी, कोल्हापूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.