अकोला ः कृषी विद्यापीठे म्हणजे ‘पांढरा हत्ती पोसणे’ अशा स्वरूपाचा नकारात्मक सूर बऱ्याचदा व्यासपीठांवरून उमटत असतो. मात्र, याच कृषी विद्यापीठांनी (Agriculture University) केलेल्या चांगल्या कामाचे कौतुकही समाज खुल्या मनाने करतो. मागील काही हंगामात फुले संगम (Phule Sangam), फुले किमया (Phule Kimaya) असे विविध सोयाबीन वाण (Soybean Verity) गावोगावी चर्चेत आलेले आहेत. या वाणांमुळे अनेकांना चांगली उत्पादकता मिळते आहे. यामुळेच वाण पैदासकाराप्रति कृतज्ञता म्हणून चिखली तालुक्यात सवणा येथे शास्त्रज्ञांचा सन्मान कार्यक्रम घेण्यात आला.
विदर्भ शेती विकास संस्था (चिखली) तसेच सवणा येथील शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाचे रविवारी (ता. २७) आयोजन केले होते. या वेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठा (राहुरी)चे सोयाबीन पैदासकार डॉ. मिलिंद देशमुख यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला बुलडाणा कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अनिल तारू यांची उपस्थिती होती.
डॉ. देशमुख यांचे सोयाबीन पीक वाण विकसित करण्यासाठी असलेले योगदान खऱ्या अर्थाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात एक आर्थिक क्रांती घडवून आणणारे असल्याचे बोलले जाते. सोयाबीन पिकाच्या जास्त उत्पादन देणाऱ्या फुले संगम, फुले किमया आणि फुले दूर्वा या वाणांची त्यांनी निर्मिती केली. कसबे डिग्रस येथील कृषी संशोधन केंद्रातून हे वाण प्रसारित झाले आहेत. या सर्व जातींचा आता विदर्भातही वापर होत असून सोयाबीन उत्पादनात २० ते ४० टक्क्यांदरम्यान वाढ झालेली आहे. त्यामुळे या हेतूने सत्कार घेण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना डॉ. देशमुख म्हणाले, जमिनीच्या प्रकारानुसार वाण निवड करावी. बीज प्रक्रिया महत्वाची आहे. शिवाय बदलत्या हवामानानुसार नियोजन करावे. कीड तसेच रोग असताना योग्य वेळी व्यवस्थापन करणे याबाबी उत्पादन वाढीसाठी आवश्यक आहेत. शेतकऱ्याने होणारा खर्च कमी करून उत्पादनात वाढ कशी करता येईल यादृष्टीने लक्ष द्यायला हवे.
येत्या काळात बदलत्या हवामानामध्ये तग धरू शकणारे, चांगले उत्पादन देणारे वाण तसेच सोयाबीनचे खाद्य पदार्थ म्हणून वापरता येतील असे नवीन वाण प्रसारित करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, असेही ते म्हणाले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख हे राहुल कृषी विद्यापीठात संशोधक संचालक असताना बीज उत्पादन व शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत केलेल्या करारांचा शेतकरी व विद्यापीठाला फायदा झाला होता. आता त्यांचा विदर्भातील शेतकऱ्यांनाही नक्कीच फायदा होईल, असेही डॉ. देशमुख म्हणाले.
कार्यक्रमाला सेवानिवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बी. आर. पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक, जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी भागवत खरात, तालुका कृषी अधिकारी श्री. येवले, डॉ. अनंत इंगळे, मंडळ कृषी अधिकारी अनंता अंभोरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला बुलडाणा जिल्ह्यासह वाशीम, यवतमाळ, जालना, अमरावती जिल्ह्यांतील शेतकरीसुद्धा उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.