Nampur APMC Agrowon
ताज्या बातम्या

Nampur APMC : नामपूरला संतप्त शेतकऱ्यांचा ‘रास्तारोको’

Nampur Farmer Protest : ऐन बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूक काळात व्यापाऱ्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे आंदोलन करावे लागत असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

Team Agrowon

Nashik News : येथील बाजार समितीत सकाळ सत्राचे लिलाव आटोपल्यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता कांदा व्यापाऱ्यांनी दुपार सत्राच्या लिलावाकडे पाठ फिरवल्याने संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मालेगाव ताहराबाद रस्त्यालगत बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर बुधवारी (ता. १३) सायंकाळी सहा वाजता रास्ता रोको आंदोलन केले.

बाजार समितीचे माजी संचालक, भाजपचे युवानेते डॉ. दिकपाल गिरासे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे, सहायक निबंधक जितेंद्र शेळके, जायखेडा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. ऐन बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूक काळात व्यापाऱ्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे आंदोलन करावे लागत असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

काही प्रमाणात भाववाढ होत असताना व्यापारी शेतकऱ्यांची अडवणूक करीत असल्याची खदखद शेतकऱ्यांमध्ये आहे. व्यापाऱ्यांच्या एकाधिकारशाहीमुळे यापूर्वी अनेकदा आंदोलने झाली आहेत. आंदोलनानंतर बाजार समितीमधील सर्व व्यापाऱ्यांना बाजार समिती प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे सचिव संतोष गायकवाड यांनी सांगितले.

गेल्या अनेक महिन्यांपासून उन्हाळ कांदा मातीमोल भावाने विकला जात आहे. गेल्या आठवड्यात कांद्याचे दर वाढताच कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पाडल्याने शेतकऱ्यांची तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

व्यापाऱ्यांच्या शेतकरी विरोधी भूमिकेच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. शेतकरी एकजुटीचा विजय असो,'' जय जवान जय किसान''च्या घोषणांनी सारा परिसर दणाणला होता.

डॉ. गिरासे या वेळी म्हणाले, की कांद्याचा उत्पादनखर्चही भरून निघत नसून यंदा ८० टक्क्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा माल खराब झाल्याने कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. येथील बाजार समितीच्या जीवावर कोटीच्या कोटी उड्डाणे घेणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेही सोयरसुतक नाही. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी अडवणूक कदापी सहन केली जाणार नाही.

कांदा व्यापाऱ्यांची कृती कायदा, नियम व समितीच्या मंजूर उपविधीनुसार नाही. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ चा कलम ८ (१) मधील तरतुदीनुसार आगामी आर्थिक वर्षाकरिता दिलेला परवाना निलंबित का करण्यात येवू नये, अशा आशयाची नोटीस कांदा व्यापारी, अडते यांना बजावण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समिती कटिबद्ध आहे.
- संतोष गायकवाड, सचिव-नामपूर बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : सोयाबीन खरेदी १२ टक्के ओलाव्याच्या अटीनेच सुरू

Natural Farming : नैसर्गिक शेती राष्ट्रीय अभियानास मंजुरी

Sugarcane Crushing : सोलापुरातील ९ कारखान्यांत ३ लाख ४४ हजार टन गाळप

Sugarcane Harvesting Workers : ऊसतोडणी मजूर कारखान्यावर आल्याने परिसर गजबजला

Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी वाढली

SCROLL FOR NEXT