या आठवड्यात महाराष्ट्रावरील हवेचा दाब (Air Pressure) वाढणार आहे. जेव्हा तापमानात घट होते तेव्हा हवेच्या दाबात वाढ होते. सध्या महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब असून, उद्या तो १०१२ हेप्टापास्कलपर्यंत वाढेल, तर परवा त्यात आणखी वाढ होऊन तो १०१४ हेप्टापास्कलपर्यंत वाढणे शक्य आहे. दिनांक २८ डिसेंबर रोजी आणि त्यापुढे हवेचा दाब वाढत असल्यामुळे महाराष्ट्रात थंडीचे (Clod Weather) प्रमाण वाढत जाईल. तापमानात घट होईल.
थंडीचे प्रमाण वाढण्याचा फायदा गहू, हरभरा, मोहरी, जवस या पिकांना होईल, तसेच ऊस, द्राक्ष व फळपिकात साखरेचे प्रमाण वाढण्यास उपयुक्त ठरेल. हवामानाचा पिकांच्या वाढीवर व त्यांच्या प्रतीवर अनुकूल परिणाम होईल. अरबी समुद्राचे पृष्ठभागाचे तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील; ते सरासरी तापमानाच्या प्रमाणे असल्याने अरबी समुद्राच्या बाजूने स्थिर हवामान राहील.
बंगालच्या उपसागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान सध्या २७ अंश सेल्सिअस असून, ते पूर्वी ३० अंश सेल्सिअस होते. त्यामुळे हवामान बदल जाणवले. आता ते सरासरीच्या दरम्यान राहण्यामुळे या आठवड्यात हवामान बदल जाणवणार नाहीत. हवामान स्थिर राहील. हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमानही २७ अंश सेल्सिअस राहण्यामुळे हवामानात यापुढे स्थिरता येईल व मोठे हवामान बदल सध्या तरी जाणवणार नाहीत.
दिनांक २७ डिसेंबर रोजी वायव्य भारतावर १०१८ हेप्टापास्कल, तर सिक्कीमच्या बाजूस १०१४ हेप्टापास्कल, गुजरात व ईशान्य भारतावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढेल आणि वारे ईशान्य भारताकडून वाहण्यामुळे किमान तापमानात घट होऊन थंडीचे प्रमाण वाढण्यास सुरवात होईल. २८ डिसेंबर रोजी काश्मीरच्या पश्चिमेकडील भागावर १०२० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढेल आणि किमान तापमानात घसरण होऊन उत्तर भारतातील थंड वारे ईशान्येकडून वाहण्यामुळे थंडी वाढेल.
कोकण
सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस राहील, तर रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यात ते ३२ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात किमान तापमान २१ अंश सेल्सिअस आणि ठाणे जिल्ह्यात ते २० अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी व पालघर जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. ठाणे व पालघर जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील, तर रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६१ टक्के राहील. रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४१ ते ४७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते ३० टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
उत्तर महाराष्ट्र
नाशिक व जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील, तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यात ते ३२ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील. धुळे व नंदूरबार जिल्ह्यात ते १६ अंश सेल्सिअस राहील व जळगाव जिल्ह्यात ते १५ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धुळे व नंदूरबार जिल्ह्यात ३१ टक्के राहील, तर नाशिक व जळगाव जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १६ ते २१ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ कि.मी. व दिशा ईशान्येकडून राहील. सध्याचे हवामान कापूस वेचणीस अत्यंत उपयुक्त राहील.
मराठवाडा
उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना या सर्व जिल्ह्यांत कमाल तापमान समान म्हणजे ३२ अंश सेल्सिअस राहील, तर औरंगाबाद जिल्ह्यात ते ३० अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील, तर औरंगाबाद जिल्ह्यात ते १५ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील, तर नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. लातूर व नांदेड जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० टक्के राहील, तर उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात ४५ ते ४७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत अत्यंत कमी म्हणजे २३ ते २७ टक्के राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील व ते कापूस वेचणीच्या कामासाठी अत्यंत उपयुक्त राहील. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ११ कि.मी. राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ७ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयकडून राहिल्यामुळे किमान तापमान घसरण्याचा वेग कमी राहील.
पश्चिम विदर्भ
बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील, तर अकोला व अमरावती जिल्ह्यात किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. अमरावती जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५२ टक्के राहील, तर बुलडाणा, वाशीम व अकोला जिल्ह्यात ती ४३ ते ४७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २३ त २५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ कि.मी. राहील, तर वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. कापूस वेचणीस हवामान उत्तम राहील.
मध्य विदर्भ
नागपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील, वर्धा जिल्ह्यात ते ३१ अंश सेल्सिअस आणि यवतमाळ जिल्ह्यात ते ३२ अंश सेल्सिअस राहील. वर्धा व नागपूर जिल्ह्यात किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील, तर यवतमाळ जिल्ह्यात ते १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ४५ ते ५२ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते २३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा यवतमाळ जिल्ह्यात आग्नेयकडून व वर्धा व नागपूर जिल्ह्यात ईशान्येकडून राहील.
पूर्व विदर्भ
भंडारा जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील, तर चंद्रपूर जिल्ह्यात ते ३१ अंश व गोंदिया जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील आणि गडचिरोली जिल्ह्यात ते ३३ अंश सेल्सिअस राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ५१ ते ५६ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ५ कि.मी. राहील. गडचिरोली जिल्ह्यात वाऱ्याची दिशा आग्नेयकडून राहील. चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात वाऱ्याची दिशा आग्नेयकडून राहील.
दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र
पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. सातारा व सांगली जिल्ह्यात ते ३३ ते ३४ अंश सेल्सिअस राहील. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. सातारा जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात किमान तापमान १९ ते २० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४३ ते ४६ टक्के राहील. सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत अत्यंत कमी म्हणजे २३ ते २६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते १० कि.मी. राहील. कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यात वाऱ्याची दिशा आग्नेयकडून, तर पुणे व नगर जिल्ह्यात ईशान्येकडून राहील.
कृषी सल्ला
सुरू उसाच्या लागवडीसाठी जमिनीची पूर्वमशागत करावी.
घन लागवड केलेल्या आंबा बागांचे पुनरुज्जीवन करावे.
आंबा झाडांना मोहर निघण्याच्या अवस्थेत १ टक्का पोटॅशिDम नायट्रेटची पालवीवर फवारणी केल्यास मोहोर लवकर निघेल.
उन्हाळी भुईमुगाच्या लागवडीसाठी पूर्वमशागत करून पेरणीसाठी जमीन तयार करावी.
वेलवर्गीय भाजीपाला लागवडीसाठी जमिनीची मशागत करावी.
(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.