Pomegranate
Pomegranate Agrowon
ताज्या बातम्या

Pomegranate Export : नैसर्गिक आपत्तीमुळे डाळिंब निर्यातीत ‘खोडा’

सुदर्शन सुतार

सोलापूर ः सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे डाळिंबाच्या (Pomegranate) क्षेत्रवाढीवर या आधीच परिणाम झाला आहे. त्यात आता उत्पादनातील घटीसह गुणवत्तेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तसेच निर्यातीचा हंगामही साधारण दोन महिने पुढे जाईल, असे सध्याचे चित्र आहे. अर्थात, या सगळ्या अडथळ्यांची शर्यत पार करता करता स्वतःची आर्थिक घडी बसवण्यासाठी शेतकऱ्यांच्या मात्र नाकीनऊ येणार आहे.

देशातील एकूण डाळिंब उत्पादनात सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. एकट्या महाराष्ट्रात एक लाख ६६ हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंब विस्तारले आहे. निर्यातीतही महाराष्ट्राचीच आघाडी आहे. परंतु अलीकडच्या दोन-तीन वर्षांत डाळिंबावरील खोडकीड, तेलकट डाग आणि मरसारख्या रोगामुळे महाराष्ट्रातील सोलापूरसह सांगली, नाशिक, पुणे, नगर हा डाळिंब पट्टा काळवंडून गेला आहे.

सुमारे ४० टक्क्यांपर्यंत बागा गेल्या आहेत. नव्याने होणारी लागवड अगदीच बोटावर मोजण्याइतपत आहे. अनेक भागात शेतकऱ्यांनी बहार बदलले, पण रोगराईचे चित्र काही बदललेले नाही. त्यात यंदा सततच्या पावसाची भर पडली आहे. महाराष्ट्राबरोबरच राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातही थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती आहे.

युरोप बाजार हातचा जाणार

साधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत युरोप बाजार शेतकऱ्यांना उपलब्ध होतो, मार्चनंतर भारताला स्पर्धा करणाऱ्या स्पेन, इराण, इराकची डाळिंब बाजारात येतात. त्यामुळे त्या आधी भारतीय डाळिंब या बाजारात पोचावी, यासाठी महाराष्ट्रासह देशात मृग बहरात सर्वाधिक उत्पादन घेतले जाते.

या हंगामात देशात ३५-४० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर डाळिंब उत्पादन घेतले जाते. पण यंदा सततचा पाऊस आणि किडरोगामुळे त्यापैकी ५० टक्के क्षेत्रावरील डाळिंब उत्पादन आधीच घटले आहे. आता उरल्या-सुरल्या क्षेत्रावरील डाळिंबाला पुन्हा पावसाचा फटका बसला आहे. त्यात एकरी उत्पादकता, गुणवत्ता ही कमीच आहे. आणखी किमान महिना-दोन महिने तरी निर्यात पुढे जाणार आहे. त्यामुळे युरोप बाजार मिळेल का, या बाबत शंका आहे.

देशांतर्गत बाजाराची संधी

गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार डाळिंबाला युरोपिय बाजारपेठेची सर्वाधिक पसंती मिळते. दुसऱ्या प्रतीच्या डाळिंबाला बांगलादेशासह अरब देशांची बाजारपेठ मिळते. मागच्या हंगामात केवळ गुणवत्तेअभावी भारतीय डाळिंब अरब देशांमध्ये जेमतेम ३० ते ३५ हजार टनांपर्यंत डाळिंबाची विक्री झाली. यंदा ही पुन्हा तीच परिस्थिती आहे.

त्यामुळे यंदा किमान ५ ते १० हजार टनांपर्यंत तरी निर्यात होईल की नाही, या बाबत शंका आहे. तसेच देशातच सध्या डाळिंबाचे दर प्रतिकिलो १०० ते १५० रुपयांपेक्षाही अधिक आहेत. त्यामुळे देशांतर्गत बाजारात सर्वाधिक संधी आहे.

गेल्या दोन-तीन वर्षांपासून डाळिंबाच्या निर्यातीत अडथळे येत आहेत. यंदाही सततचा पाऊस आणि कीड-रोगांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अडचण झाली आहे. बहर बदलले, तरीही प्रश्न सुटत नाहीत. गुणवत्तेअभावी युरोपसारखी बाजारपेठ आपल्या हातून जात आहे, हे दुर्दैव आहे.

- प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघ, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT