Pune APMC
Pune APMC  Agrowon
ताज्या बातम्या

Pune APMC : पुणे बाजार समितीमध्ये मासळी बाजाराचा घाट

Team Agrowon

Pune News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मासळी आणि चिकनचा बाजार सुरू करण्याचा घाट संचालक मंडळाने घातला आहे. यासाठी काही संचालकांनी मासळी विक्रेत्यांना हाताशी धरून ‘अर्थपूर्ण’ व्यवहार केल्याची चर्चा बाजार आवारात आहे.

चिकन आणि मासळीच्या बाजाराला अडते, व्यापारी आणि जैन संघटनांनी विरोध केला आहे. या निर्णयाच्या विरोधात आज (ता. ११) बाजार समितीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

बाजार समितीच्या शिवनेरी रस्त्यालगत असलेल्या मोक्याच्या भूखंडावर प्रशासकीय राजवटीमध्ये अडते असोसिएशनच्या काही पदाधिकाऱ्यांनी डाळिंब यार्ड उभारण्याच्या नावाखाली भूखंड हडप करण्याचा डाव आखला होता.

यामध्ये देखील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक व्यवहाराची चर्चा झाल्यानंतर आणि माध्यमांनी भूखंड गिळंकृत करण्याचा हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर, पणन संचालकांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. यानंतर हे प्रकरण थंड झाले.

दरम्यान, प्रशासकीय राजवट संपल्यानंतर आलेल्या संचालक मंडळाने आता बाजार समिती कायद्यातील नियमन असलेल्या चिकन, मासळीचा आधार घेत या भूखंडावर मासळी बाजार उभारण्याचा घाट घातला आहे.

या निर्णयाला स्थानिक आमदार माधुरी मिसाळ यांनी देखील विरोध केला आहे. त्यांनी या निर्णयाबाबत अधिकाऱ्यांची एका संचालकासमोरच कान उघडणी केल्याचे समजते. तर या एका संचालकांना देखील मासळी बाजार होऊ देऊ नका, अशी तंबी दिली आहे.

स्थानिक रहिवासी, नागरिक, अडते, व्यापारी यांचा मासळी बाजाराला विरोध असताना संचालक मंडळ मासळी बाजार उभारण्यावर ठाम असल्याचे कळते. संचालक मंडळाच्या या निर्णयाच्या विरोधात विविध संघटनांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे देखील गाऱ्हाणे मांडले आहे. यामुळे आता संचालक मंडळाला निर्णय मागे घ्यावा लागू शकतो, अशी स्थिती आहे.

‘दारू विक्रीला पण परवानगी देतील’

लोकनेते अण्णासाहेब मगर यांनी दूरदृष्टी ठेवून मोठ्या कष्टाने कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापन करून मार्केटयार्ड इथे शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेला भाजीपाला, फळे आणि इतर कृषी मालाच्या खरेदी-विक्रीला प्रोत्साहन दिले. यामध्ये जैन व्यापारी बांधवांचे योगदान मोठे आहे.

आज मासे, चिकन-मटण विक्रीला परवानगी देत आहेत. उद्या दारू विक्रीला सुद्धा परवानगी देतील. या सगळ्या गोष्टीला आत्ताच रोखले पाहिजे. मार्केटयार्डात चिकन, मटण, मासे विक्रीस आमचा विरोध आहे. या विरोधात शहर काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tomato Rate : मागणीमुळे टोमॅटो दरातील वाढ टिकून

Egg Rate : अंडी दर प्रतिशेकडा ५३० रुपयांच्या पार

Maharashtra Rain : कोकण, घाटमाथ्यावर मध्यम पावसाची हजेरी

Maharashtra Rain Alert : कोकणात मुसळधारेचा इशारा

Onion Kharif Sowing : कांद्याचा पुरेसा स्टाॅक, लागवडीत २८ टक्के वाढ? कांद्याचे भाव नियंत्रणात राहतील असा सरकारचा विश्वास

SCROLL FOR NEXT