Akola News : हैदराबाद येथे १० व ११ जुलैला झालेल्या ९८ व्या वार्षिक कार्यशाळेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ज्वारी संशोधन केंद्राला ‘ज्वारी संशोधनात केलेल्या भरीव उत्कृष्ट संशोधनाबद्दल उत्कृष्ट संशोधन केंद्र’ म्हणून राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले आहे. जस्त, लोह व प्रथिने अधिक प्रमाणात असणारा पिवळ्या ज्वारीचा एसपीव्ही २६२० हा वाण राष्ट्रीय पातळीवर प्रसारणासाठी मंजूर करण्यात आला आहे.
जागतिक हवामान बदलाच्या या काळात अनिश्चित पाऊसमान, बाजार भावासह वन्य प्राण्यांचा प्रकोप आणि अनेक कारणांमुळे ज्वारीसह इतर तृणधान्य पिकांचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. मात्र आता बाजारामध्ये ज्वारी पिकाला मिळणारा अधिकचा दर, विविध मूल्यवर्धित उपपदार्थ आणि महत्त्वाचे म्हणजे पशुधनासाठी लागणारा कडबा पाहता ज्वारी पिकाकडे लक्ष वेधणे काळाची गरज आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनात आणि संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांच्या नेतृत्वात या कृषी विद्यापीठात संशोधन कार्य वेगाने पुढे नेले जात आहे. या ज्वारी संशोधन केंद्राला हा सन्मान तब्बल तिसऱ्यांदा मिळाला आहे. यापूर्वी सन २०१३ व सन २०२१ ला सुद्धा गौरविण्यात आले आहे.
या संशोधन केंद्रावरून आतापर्यंत १६ ज्वारीच्या वाणांची निर्मिती करण्यात आलेली आहे. यापैकी सहा वाण हे राष्ट्रीय पातळीवर प्रसारित करण्यात आले आहेत. सोबतच या केंद्राची ज्वारीचे २० जनुके हे राष्ट्रीय पादप आनुवंशिक संशोधन ब्युरो येथे नोंदणीकृत आहेत.
या संशोधन केंद्राने नुकतेच वाशीम कृषी संशोधन केंद्रात अति प्राचीन व दुर्मीळ असलेल्या ज्वारीच्या २५ हजारांहून अधिक जनुकांची लागवड करून त्यांचे उत्तम संगोपन करीत अतिशय अवघड आणि देशातील पहिलाच प्रयत्न विद्यापीठाने नुकताच साधला होता.
...असा आहे ज्वारीचा नवीन वाण
ज्वारीमधील पोषण मूल्य वृद्धीचा कार्यक्रम महत्त्वपूर्ण असून, या केंद्राने त्यामध्ये भरीव कामगिरी केलेली असून, त्याचा परिपाक म्हणून जस्त, लोह व प्रथिने अधिक प्रमाणात असणारा पिवळ्या ज्वारीचा हा नवीन वाण एसपीव्ही २६२० हा राष्ट्रीय पातळीवर प्रसारणासाठी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये ३१.६ पीपीएम लोह, २४.४ पीपीएम जस्त व ११.९ टक्के प्रथिने आहेत. राष्ट्रीय पातळीवरील ज्वारीमधील पोषण मूल्यवृद्धीसाठीचा अकोला विद्यापीठाचा हा वाण दबदबा निर्माण करेल हे निश्चित.
कृषी विद्यापीठाच्या ज्वारी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. रामेश्वर घोराडे यांच्या नेतृत्वात ज्वारीच्या पीक वाणांची काळसुसंगत निर्मिती केली आहे. नव्यानेच राष्ट्रीय स्तरावर प्रसारित उच्च पोषणयुक्त ज्वारी पीकवाण देशपातळीवर सर्वाधिक लोकप्रिय होईल याबद्दल विश्वास आहे.- डॉ. शरद गडाख, कुलगुरू, पंदेकृवि, अकोला
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.