Parbhani News : परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्ज मागणीसाठी http://parbhani. gov.in/croploan या संकेतस्थळावर सोमवार (ता. १५)पासून अर्ज नोंदणी सुरू करण्यात येत आहे.
पीककर्ज अर्ज स्वीकारण्याची अखेरची ता. ३० जून राहील. पीककर्ज घेण्यासाठी इच्छुक सर्व शेतकऱ्यांनी या ऑनलाइन नोंदणी प्रणालीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे.
पीककर्जासाठी बँकेकडे होणारी गर्दी आणि शेतकऱ्यांच्या वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तसेच पीककर्जासाठी प्राप्त होणाऱ्या अर्जाचे प्रभावीपणे नियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा अग्रणी बँक आणि राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र यांच्या मार्फत एक संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
ही प्रणाली http://parbhani.gov.in/croploan या संकेतस्थळावर कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांची प्राथमिक माहिती नोंदवून घेऊन ती माहिती संबंधित बँकेला ऑनलाइन प्रणालीतून प्राप्त होणार आहे.
ही माहिती तपासून याच प्रणालीमार्फत कर्जासाठी पात्र-अपात्र असल्याची माहिती आणि अपात्र असल्यास अपात्रतेचे कारण शेतकऱ्यास त्यांच्या लॉगिनमध्ये प्राप्त होणार आहे.
परभणी जिल्ह्यातील सर्व बँक शाखा या प्रणालीस जोडल्या गेलेल्या असून, संबंधित बँक शाखेस स्वतंत्र लॉगिन उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांशी बँकेद्वारे संपर्क साधण्यात येणार आहे.
कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेत भेट द्यावयाची आहे. प्रत्यक्ष भेटीत कागदपत्रांची पूर्तता करून याच प्रणालीद्वारे कर्ज वितरित केल्याची माहिती १५ दिवसांच्या आत बँकेमार्फत अद्ययावत करण्यात येणार आहे.
जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी आणि अग्रणी बँक यांना स्वतंत्र लॉगिनद्वारे जिल्ह्यातील कर्जाच्या नोंदणीची आणि बँकांनी केलेल्या कार्यवाहीची एकत्रित आकडेवारी उपलब्ध होणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.