Onion Subsidy
Onion Subsidy Agrowon
ताज्या बातम्या

NAFED Onion Payment : ‘नाफेड’ने थकविली कांद्याची देयके

मुकूंद पिंगळे

Onion Market Update गेल्या वर्षीच्या कांदा खरेदीला (Onion Procurement) वर्षे होत आले तरीही मजुरी, गोदाम, वाहतूक व आनुषंगिक खर्चाची देयके अद्यापही ‘नाफेड’ ने अदा केलेली नाहीत. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महासंघ व त्यांच्याशी संलग्न १५० हून अधिक शेतकरी उत्पादक कंपन्या आर्थिक विवंचनेत सापडल्याची गंभीर स्थिती आहे.

गेल्या रब्बी हंगामात केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या वतीने ‘भाव स्थिरीकरण योजनें’तर्गत राज्यात ३५१ कोटींची २ लाख ३८ हजार १९६ टन कांदा खरेदी झाली. नोडल एजन्सी म्हणून ‘नाफेड’ने २ लाख ३८ हजार १९६ टन रब्बी उन्हाळ कांदा खरेदी केला.

उपखरेदीदार म्हणून नाफेडने राज्यातील १७ ते १८ शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघांना हे काम दिले. तर महासंघांनी ही खरेदी शेतकरी उत्पादक कंपन्यांद्वारे पूर्ण केली होती.

दरम्यान, ‘नाफेड’च्या खरेदीचा कुठलाही फायदा होत नाही, असा आरोप शेतकरी व शेतकरी संघटनांकडून सातत्याने होत आहे. एकीकडे थकलेली देयके मिळण्यासाठी गेल्या सात ते आठ महिन्यांपासून सातत्याने दिल्ली दरबारी पाठपुरावा केला जात आहे.

मात्र सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक व त्यांच्याशी संलग्न शेतकरी उत्पादक कंपन्या हवालदिल झाल्या आहेत. केंद्राच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाने ‘नाफेड’ला वेळेत निधी न दिल्याने मोठी आर्थिक कोंडी होऊन शेतकरी कंपन्या कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहेत.

शेतकरी कंपन्यांना महासंघांकडून पैसे घेणे असल्याने त्यांच्याकडे सातत्याने तगादा लावला जात आहे. मात्र महासंघांकडेच व्यवहार पूर्ण करण्यासाठी भांडवल नसल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत.

त्यामुळे शेतकरी कंपन्यांनी खासगी, सावकारी व वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन व्यवहार यापूर्वी पूर्ण केले आहेत. मात्र आता हाती भांडवल नसल्याने त्यांची कोंडी वाढली आहे.

राज्यात प्रामुख्याने नाशिक, नगर, पुणे, धुळे व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतील १७ ते १८ शेतकरी उत्पादक कंपन्यांनी कांदा खरेदी केली. मात्र आता कांदा खरेदी करण्याची घोषणा झाली तर शेतकरी उत्पादक कंपन्या खरेदीबाबत काय निर्णय घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

५० कोटींवर रक्कम थकीत

शेतकरी उत्पादक कंपन्या या महासंघाकडे सातत्याने पैशासाठी तगादा लावत आहेत. मात्र महासंघ रकमा देऊ शकत नाही.

एकीकडे खरेदीचे करार केल्याप्रमाणे कांदा साठवणूकपश्चात अपेक्षित रिकव्हरी अनेक कंपन्यांनी देऊन चांगले काम केले. आता त्यांना केंद्र सरकारकडून अडचणीत का आणले जात आहे? असा आरोप होत आहे.

जवळपास ५० कोटी रुपयांवर रक्कम अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे ‘आमचे व्यवहार लवकर पूर्ण करा,’ या आशयाचे पत्रही केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री पियुष गोयल व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासह ‘नाफेड’चे कार्यकारी संचालक रितेश चौहान यांना पाठविण्यात आले आहे.

कांद्याला अपेक्षित दर नसल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेत तोडगा काढून पैसे देण्याची तातडीची गरज आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा केला आहे. त्वरित दिलासा द्यावा.
- रवींद्र अमृतकर,,प्रदेश कार्यकारिणी सदस्य, भाजप.
अनेकदा पत्रव्यवहार करून कांदा वेळेवर उचलला नव्हता. त्यामुळे कांद्याचे नुकसान सोसून रिकव्हरी दिली. तरीही आमच्याकडून भरपाई करून घेतली. तरीही चाळी भाडे, देखरेख, भरण्याची व निकासी करण्याची मजुरी व कमिशन मिळालेले नाही. त्यामुळे कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.
- प्रमोद निकम, अध्यक्ष, महाशिवराज्य एफपीसी फेडरेशन, मालेगाव, जि. नाशिक.
दोन वेळेस खासगीकर्ज घेऊन शेतकऱ्यांचे व चाळी मालकांचे भाडे दिले. आता पैसे व व्याज भरून थकलो आहोत. केंद्र सरकारने देयके लवकर द्यावी. घेतलेल्या कर्जापोटी व्याज भरले पाहिजे. तरच शेतकरी उत्पादक कंपन्या उभ्या राहतील.
- दादाभाऊ दाभाडे, अध्यक्ष, जय लक्ष्मीमाता शेतकरी उत्पडक कंपनी, माणिकपुंज, ता. नांदगाव, जि. नाशिक.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Research : अधिक ‘बी१’ जीवनसत्त्व असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

SCROLL FOR NEXT