Farmer Suicide Agrowon
ताज्या बातम्या

Farmer Suicide : बीडमध्ये जूनमध्ये रोज एक शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्यांच्या कर्जबाजारीपणासह इतर प्रचलित कारणांत ‘कोविड’ संसर्गाचा विळखा हे देखील प्रमुख कारण असल्याचे जिल्हा रूग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मोमीन मुजाहेद यांचे मत आहे.

दत्ता देशमुख

बीड : आत्महत्यांचा टक्का (Farmer Suicide Ratio) वाढत असून जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचा (Farmer Suicide) आकडा चिंता वाढवीत आहे. रोज एक शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. जून महिन्याच्या ३० दिवसांत ३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. यंदाच्या जून पर्यंतच्या सहा महिन्यांतील १८१ दिवसांत १३८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा आत्महत्यांचा आकडा ५४ ने अधिक आहे.

शेतकरी आत्महत्यांच्या कर्जबाजारीपणासह इतर प्रचलित कारणांत ‘कोविड’ संसर्गाचा विळखा हे देखील प्रमुख कारण असल्याचे जिल्हा रूग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मोमीन मुजाहेद यांचे मत आहे. कोविड आजारावरील उपचाराचा खर्च, लॉकडाऊनमुळे आलेला एकलकोंडेपणा व त्यामुळे झालेली चिडचिड, विस्कटलेली आर्थिक घडी आणि बेरोजगारी ही आत्महत्यांची कारणे आहेत.

जिल्ह्यात कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ असे निसर्गचक्र आहे. त्यात पीक कर्जमाफीतील त्रुटी, पीक कर्जवाटपातील दिरंगाई, हमी भाव, उत्पादित मालासाठी बाजारपेठ नसणे या कारणांनी जिल्ह्यातील शेतकरी पिचलेला आहे. त्यातून कर्जबाजारीपणा व कर्ज फेडण्याच्या चिंतेतून शेतकरी आत्महत्यांच्या घटना घडतात. आता त्यात ‘कोविड’च्या मगरमिठीची भर पडली आहे.

यंदा जानेवारी ते जून या सहा महिन्यांतील १८१ दिवसांत तब्बल १३८ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. हाच आकडा मागच्या वर्षीच्या (२०२१) सहा महिन्यांत ८४ होता. म्हणजेच तुलनेने यंदा ५४ आत्महत्या अधिक झाल्याचे दिसते. विशेष म्हणजे जून महिन्याच्या ३० दिवसांत जिल्ह्यात ३० शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

‘‘पूर्वी जिल्ह्यातील शेतकरी व मजूर व अप्रशिक्षित सुशिक्षित बेरोजगार कामासाठी मुंबई - पुणेसह अन्य ठिकाणी जात. लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. त्यामुळे त्यांनी घेतलेले कर्ज फेडण्याचे किंवा भविष्यातील योजनांचे नियोजन पूर्णतः: विस्कटले. बाजारपेठेत अद्यापही उठाव आलेला नाही. आभासी जगणे वाढले आहे. परिणामी सामाजिक कार्यातील सहभाग, लोकांत मिसळणे कमी झाले. कोविड आजारावरील उपचाराचा खर्च, लॉकडाऊनमुळे एकलकोंडेपणामुळे स्वभावात चिडचिडेपणा येऊन सहनशीलता कमी झाली आहे,’’ असे डॉ.मुजाहेद यांनी सांगितले.

आत्महत्येची कारणे

- लॉकडाउनमुळे बेरोजगारी, कर्जबाजारीपणा

- ‘कोविड’ विळखा; उपचाराचा खर्च

- पीक कर्जमाफीतील त्रूटी

- पीक कर्जवाटपातील दिरंगाई

...अशी आहे आत्महत्त्यांची स्थिती

- जूनच्या ३० दिवसांत ३० शेतकरी आत्महत्या

- सहा महिन्यांत १३८ शेतकरी आत्महत्या

- गेल्या वर्षीच्या तुलनेत ५४ आत्महत्या अधिक

व्यायाम, छंद जोपासणे आदींसाठी वेळ काढायला हवा. समारंभ आणि आध्यात्मिक कार्यक्रमांत सहभागी व्हावे. स्वतः: किंवा कुटुंबातील व्यक्ती मानसिक तणावामुळे एकलकोंडेपणाने वागत असेल तर तत्काळ मानसोपचार तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. जिल्हा रग्णालयात शेतकऱ्यांसाठी प्रेरणा प्रकल्प, मानसिक आजार व उपचार या स्वतंत्र विभागात जावे.
डॉ. मोमीन मुजाहेद, मानसोपचार तज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय, बीड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT