pomegranate Market  Agrowon
ताज्या बातम्या

Pomegranate Disease : यंदा तेलकट डाग रोगाने सुरुवातीलाच पसरले हातपाय

Pomegranate Market : साधारणत: जून ते जुलैदरम्यान येणारा तेलकट डाग रोग यंदा अनुकूल वातावरणामुळे सुरुवातीलाच आला आहे.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhaji Nagar News : साधारणत: जून ते जुलैदरम्यान येणारा तेलकट डाग रोग यंदा अनुकूल वातावरणामुळे सुरुवातीलाच आला आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादकांचा केवळ उत्पादन खर्चच वाढला नसून काहींना आपल्या बागा सोडून देण्याची वेळ आली आहे.

व्यवस्थापनातील काटेकोरपणा जपूनही अनेक डाळिंब उत्पादकांना वातावरणाच्या प्रतिकूलतेमुळे हतबल होण्याची वेळ आली आहे. वेळेआधीच किमान ८० ते ९० टक्‍के बागांमध्ये कमी अधिक प्रमाणात हातपाय पसरलेला तेलकट डाग रोग नियोजित वेळी अनुकूलता कायम राहिल्यास काय करेल याची भीती डाळिंब उत्पादकांच्या मनात घर करून गेली आहे.

यंदा अतिपावसाने खरीप व रब्बी पिके हातची गेली. ना हिवाळा जाणवला ना एप्रिल अखेरपर्यंत उन्हाळा. अधूनमधून अवकाळी पावसाने विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी अनुकूल स्थिती ठेवली. त्याचा सर्वांत मोठा फटका डाळिंब उत्पादकांना बसतो आहे. वातावरणातील आर्द्रता तेलकट डाग रोगाला हातपाय पसरायला पोषक ठरली.

बागनिहाय त्याचा प्रादुर्भाव १० टक्क्‍यांपासून ५० ते ६० टक्‍क्‍यांपर्यंत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही तो नियंत्रणात न आल्याने काही शेतकऱ्यांना आपली बाग सोडून देण्याची वेळ आल्याची माहितीही शेतकऱ्यांनी दिली.

डाळिंब पक्‍वतेच्या अवस्थेत येण्यापूर्वीच आलेला हा रोग पक्‍व होण्याच्या अवस्थेत त्याला वातावरण पोषक राहिल्यास काही हाती पडू देईल की नाही याची चिंता डाळिंब उत्पादकांना लागली आहे.

‘पिनहोल बोरर’ही वाढला

एकीकडे तेलकट डाग रोगाचे आक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले असताना ‘पिन होल बोरर’चाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. खासकरून करमाड परिसर व जालना जिल्ह्यातील वाकळूनी शिवारातील डाळिंब बागांना या किडीने आपल्या कवेत घेतल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. वाकूळणी येथील काही शेतकऱ्यांच्या बागाच या किडीने संपविल्याची माहिती डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी दिली.

दुपटीने वाढला खर्च

प्रतिकूल हवामानाने शेतकऱ्यांचे व्यवस्थापन बिघडविले आहे. जिथे हवामान पोषक राहील नेमकं त्याच वेळी हवामानाची प्रतिकूलता डाळिंबाच्या मुळावर उठली आहे. त्यामुळे किमान दीड लाख रुपये एकरी होणारा खर्च आताच्या अडीच लाखांपर्यंत वाढल्याचे शेतकरी सांगतात. एप्रिल-मेमध्ये जिथे ७ ते ८ फवारण्या कराव्या लागायच्या तिथे आताच त्याहून अधिक फवारण्या करण्याची वेळ शेतकऱ्यांना आली आहे.

वातावरणाच्या प्रतिकूलतेमुळे यंदा तेलकट डाग रोगाने फेब्रुवारीपासूनच हातपाय पसरणे सुरू केले आहे. खते व कीडनाशकांचे दर वाढल्याने उत्पादन खर्च दीड लाखाहून दोन ते अडीच लाखावर गेला आहे.
- बद्रीनाथ नलावडे, तुपेवाडी, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर
केवळ तेलकट डाग रोगच नाही तर ‘पिनहोल बोरर’ही मोठ्या प्रमाणात पसरला आहे. माझ्या जुन्या बागेतील ५० ते ६०, तर नव्या बागेतील ७ ते ८ झाडे या किडीमुळे गेली आहेत. त्याला अटकाव करण्याचा आमच्या परीने प्रयत्न सुरू आहे. तज्ज्ञांनी प्रत्यक्ष बागेवर येऊन याविषयी मार्गदर्शन करणे आवश्‍यक आहे.
- नंदकिशोर साळुंके, डाळिंब उत्पादक, गोलटगाव, ता. जि. छत्रपती संभाजीनगर
माझ्या दोन एकर बागेतील ७०० पैकी ५०० झाडे दोन वर्षांत ‘पिन होल बोरर’ मुळे गेली. गावातील काही शेतकऱ्यांच्या संपूर्ण बागा पिनहोल बोरर ग्रस्त आहेत. ज्या सुटल्या त्यांना तेलकट डाग रोगाने यंदा सुरुवातीपासूनच पछाडले आहे.
- गणेश गिरी,डाळिंब उत्पादक, वाकूळणी, जि. जालना
डागांवरून हा तेलकट डागांचा प्रादुर्भाव असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होते आहे. शिवाय फळांची स्थिती पाहता नुकसान पातळी ओलांडल्याचेही लक्षात येते.
- डॉ. दिलीप हिंगोले, वनस्पती रोगशास्त्रज्ञ, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bank Note Exchange: जिल्हा बँकांच्या नोटाबदलीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पडून

PM DhanDhanaya Yojana: ‘पीएम धनधान्य कृषी योजने’ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Maize Production: जागतिक पातळीवर विक्रमी मका उत्पादन?

Maharashtra Rain Alert: विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा

Crop Insurance Scam: विमा कंपन्यांकडून अधिकाऱ्यांना घोटाळ्यासाठी कमिशन; एसआयटी चौकशीची आमदार धसांनी केली मागणी

SCROLL FOR NEXT