
१. केंद्र सरकारने २४,००० कोटींच्या ‘पीएम धनधान्य कृषी योजना’ला मंजुरी दिली.
२. ३६ कृषी योजना एकत्र करून एकात्मिक अंमलबजावणी केली जाईल.
३. १०० कमी उत्पादकता असलेल्या जिल्ह्यांवर विशेष लक्ष.
४. बी-बियाणे, खते, उपकरणे यासाठी शेतकऱ्यांना थेट अर्थसहाय्य.
५. सिंचन, साठवण व हवामान आधारीत शेतीस प्रोत्साहन.
New Delhi News: पीएम धनधान्य कृषी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. ज्यामुळे देशातील १.७ कोटी शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेची घोषणा केली होती आणि आता केंद्र सरकारने २००५ पासून पुढील ६ वर्षांसाठी या योजनेस मंजुरी दिली आहे.
केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेसाठी दरवर्षी २४ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, यामध्ये सध्याच्या ३६ विविध कृषी योजनांचा समावेश करण्यात आला आहे. देशातील कृषी क्षेत्राचा सर्वांगीण विकास करणे हा पीएम धन धान्य कृषी योजनेचा मुख्य उद्देश असून यात पिकांच्या कापणीनंतरची साठवण क्षमता वाढवणे, पेरणीच्या सुविधांमध्ये सुधारणा करणे आणि एकंदरीत शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे यावर भर दिला जाईल.
या योजनेअंतर्गत देशभरातील ज्या जिल्ह्यांची सध्याची कृषी उत्पादकता कमी आहे अशा १०० जिल्ह्यांची निवड केली जाईल. त्या जिल्ह्यांमध्ये शेतीच्या विकासासाठी चालू असलेल्या ३६ योजना एकत्रित करून प्रभावीपणे राबवल्या जातील. ही योजना राज्य सरकारच्या सहकार्याने कार्यान्वित केली जाईल, असे मंत्री वैष्णव यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना कसा मिळणार लाभ
या योजनेमुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारे प्रत्यक्ष लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेली विविध अवजारे, बी-बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत पुरवली जाईल. तसेच ट्रॅक्टर, कृषी पंप यांसारख्या उपकरणांसाठीही अर्थसाह्य मिळेल.
उत्पादन व कार्यक्षमता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल.
पिकांची साठवणूक आणि सिंचन व्यवस्थेत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाईल. पंचायत आणि ब्लॉक स्तरावर कार्यक्षम साठवणूक आणि गोदाम व्यवस्था विकसित केली जाईल, ज्यामुळे काढणीपश्चात होणारे नुकसान कमी होण्यात मदत होईल.
शेतकऱ्यांना उच्च गुणवत्ता असलेले बी-बियाणे आणि खतांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित केला जाईल.
कृषी क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवण्यावर भर दिला जाईल, विशेषतः ग्रामीण भागातील महिला शेतकऱ्यांना या क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.
उत्पादकता वाढवण्यासाठी हवामान-विशिष्ट शेती, पाण्याची कार्यक्षमता आणि अचूक शेतीचा अवलंब करण्यास प्रेरणा दिली जाईल.
१. PM धनधान्य कृषी योजना काय आहे?
ही योजना कृषी क्षेत्रासाठी ३६ योजनांचा एकत्रित कार्यक्रम असून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी आहे.
२. शेतकऱ्यांना कोणते फायदे मिळतील?
बी-बियाणे, खते, यंत्रसामुग्री, सिंचन व साठवण सुविधांसाठी अर्थसहाय्य मिळेल.
३. या योजनेचा कालावधी किती आहे?
२००५ पासून पुढील ६ वर्षांसाठी ही योजना लागू राहणार आहे.
४. कोणत्या जिल्ह्यांना प्राधान्य दिले जाईल?
१०० अशा जिल्ह्यांची निवड केली जाईल जिथे कृषी उत्पादकता कमी आहे.
५. या योजनेसाठी निधी किती मंजूर केला आहे?
दरवर्षी २४,००० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.