Moong Grower Farmers : देशभरात मान्सून लांबणीचा मोठा फटका सर्वच स्तरातील लोकांना बसत आहे. मान्सून लांबणीमुळे सर्वाधीक नुकसान शेतकऱ्यांचे झाल्याचे दिसून येत आहे. पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. यामुळे अनेक राज्यात पेरणीअभावी शेती रिकामी दिसण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान देशात मूग उत्पादनात राजस्थाननंतर कर्नाटकचा नंबर लागतो. परंतु यंदा पावसाअभावी कर्नाटकातील शेतकऱ्यांकडून पेरणी झाली नसल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
कर्नाटकातील शेतकऱ्यांनी सध्याच्या खरीप पीक हंगामात मुगाची पेरणी केली नाही. राज्याच्या उत्तरेकडील मुख्य उत्पादक प्रदेशांमध्ये मान्सूनची प्रगती झाली नसल्याने हे चित्र दिसत आहे. यामुळे खरीप हंगामात कर्नाटकातील मूग उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
राज्यातील पावसावर अवलंबून असलेल्या भागात प्रामुख्याने उत्तरेकडील गदग, धारवाड, यादगीर या जिल्ह्यांमध्ये मुगाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. ही पेरणी साधारणपणे १५ मे ते १५ जून दरम्यान केली जाते. परंतु यंदा या पेरण्या अद्यापही झाल्या नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
कर्नाटक कृषी विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, या खरीप हंगामात २२ जूनपर्यंत केवळ ०.६६ लाख हेक्टरवर मूग पेरणी झाली आहे. ही पेरणी मागील वर्षी २.५३ लाख हेक्टरवर होती. या खरीप हंगामात राज्याचे ३.९९ लाख हेक्टरवर मूग पिकवण्याचे उद्दिष्ट होते.
राज्यातील सर्वात मोठा उत्पादक जिल्हा म्हणून गदगची ओळख आहे. या जिल्ह्यातील हुलकोटी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख एल जी हिरेगौदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत पावसाअभावी मूग पेरणीचा हंगाम शेतकऱ्यांनी गमावला आहे. ज्या भागात सिंचनाची सोय आहे त्या भागातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. परंतु ज्या भागात अद्यापही पाऊस नाही त्या क्षेत्रावर पेरण्या होऊ शकल्या नाहीत.
कर्नाटकात या वर्षी आतापर्यंत मान्सूनच्या पावसा अभावी ६६ टक्के नुकसान झाल्याची माहिती आहे. तर उत्तर कर्नाटकात हेच प्रमाण ६८ टक्के आहे. मान्सूनपूर्व पावसानेही साथ न दिल्याने गदग जिल्ह्यात ३९ टक्के नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. तर उत्तर कर्नाटकातील लगतच्या भागातही हीच परिस्थिती आहे.
आगामी काळात जुलैच्या मध्यापर्यंत पाऊस पडल्यास शेतकऱ्यांना भुईमूग, मिरची किंवा कांदा यांसारख्या इतर पिकांची पेरणी करण्यास चांगली असल्याचे कृषी तज्ञाकडून माहिती देण्यात आली.
व्यापारी सूत्रांच्या माहितीनुसार, मुगाची पेरणी लांबल्याने पिकांची वाढण्याची क्षमता कमी होते यामुळे उत्पादन चांगले होत नाही. तसेच पेरणीच्या मोठ्या तुटवड्यामुळे मुगाच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात मुगाच्या किंमती तब्बल १० टक्क्यांनी वाढल्याची माहिती व्यापारी सुत्रांनी दिली.
मूग उत्पादनाला मोठा फटका बसणार
खरीप कडधान्यांची पेरणी करण्यासाठी शेतकरी पावसाच्या आगमनाची वाट पाहत आहेत. तथापि, पावसाचे वेळेवर आगमन न झाल्याने, राज्यातील शेतकरी मूग पेरणीपासून मुकले असल्याची माहिती कलबुर्गी येथील कर्नाटक प्रदेश रेड ग्राम उत्पादक संघाचे अध्यक्ष बसवराज इंगिन म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.