Milk Production
Milk Production Agrowon
ताज्या बातम्या

Dairy Business : दूध उत्पादक शेतकरी अडकले दुहेरी संकटात

सुर्यकांत नेटके

Dairy Business News : गेल्या तीन ते चार महिन्यांपासून टिकून असलेला गाईच्या दुधाचा (Cow Milk Rate) ३८ रुपयांचा दर गेल्या काही दिवसांपासून एक ते दोन रुपयांनी कमी झाला आहे. दुग्धजन्य पदार्थांची आयात (Dairy Product Import) होणार असल्याची चर्चा, देशांतर्गत दूध पावडर व बटरचे कमी झालेले दर आदींमुळे दुधाचे दर कमी झाल्याचे सांगितले जात आहे. त्यात उन्हामुळे दूध उत्पादन (Milk Production) घटले आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात अडकले आहेत.

राज्यातील बहुतांश शेतकरी दूध व्यवसायावर अवलंबून आहेत. राज्यात साधारण ७० सहकारी व ३०० पेक्षा खासगी दूध संघाद्वारे दोन ते सव्वादोन कोटी लिटर दुधाचे संकलन होते.

त्यातील ४० टक्के दुधाची पावडर, बटर व अन्य दुग्धजन्य पदार्थ तयार होतात. तर साठ टक्के दूध ग्राहकांना पाउचमधून विकले जाते. शिवाय राज्यात २५ लाख लिटरच्या जवळपास दुधाची थेट ग्राहकांना विक्री केली जात आहे.

कोरोनाच्या काळात मागणी घटल्याने दुधाचे दर कमालीचे खाली आले होते. अगदी अनेक भागांत १६ ते १७ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी केली जात होती. त्यानंतर दोन वर्षांत हळूहळू दूधदरात वाढ झाली.

गेल्या तीन महिन्यांपासून दुधाला प्रतिलिटर ३८ रुपये दर मिळाले. चांगला दर, चारा, पाण्याची उपलब्धता आदींमुळे दूध उत्पादनाकडे शेतकऱ्यांच्या कल वाढला. त्यामुळे सात ते दहा टक्के दूध उत्पादन वाढले. मात्र गेल्या काही दिवसांपासून दूधदर प्रतिलिटर एक ते दोन रुपयांनी कमी करण्यात आले आहेत.

दूध खरेदी धोरण पावडर, बटर खरेदीवर अवलंबून आहे. सरकार दूध पावडर, बटर व अन्य दुग्धजन्य पदार्थांची आयात करणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याचा दूध पावडर, बटर खरेदीदारांनी गैरफायदा घेतला.

त्याचा परिणाम म्हणून पावडरचे दर साधारण ३० रुपयांनी कमी झाले. परिणामी, दुधाचे दर कमी झाल्याचे सांगितले जात आहे. दुग्धजन्य पदार्थांच्या आयात धोरणाबाबत शासनाने भूमिका स्पष्ट करावी, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

उन्हाची तीव्रता अधिक आहे. उन्हामुळे दरवर्षीप्रमाणेच यंदाही दहा टक्के उत्पादन घटले आहे. पशुखाद्याच्या दरातही वाढ झाली आहे. त्यात दुधाचे दर कमी झाल्याने शेतकरी दुहेरी कोंडीत सापडला आहे. उन्हाळ्यात दरवर्षी दूध व दुग्धजन्य पदार्थांना मागणी असते. यंदा पहिल्यांदाच उत्पादन कमी आणि दरही कमी अशी स्थिती आहे.

दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीबाबत चर्चा सुरू असल्याने बटर, दूध पावडरीचे दर कमी झाले. त्यामुळे दुधाचा दर एक रुपयाने कमी झाला आहे. चारा, पाणी व ‘लम्पी स्कीन’चा राज्यातील दूध व्यवसायावर परिणाम नाही. उलट अलीकडच्या काळात ७ ते १० टक्के दूध उत्पादन वाढले आहे.
- प्रकाश कुतवळ, सचिव, दूध उत्पादक व प्रक्रियाकारक कल्याणकारी संघटना

दूधदर घटण्याची कारणे

- दूध पावडर, बटर आयातीची चर्चा

- बटर, पावडरचे दर कमी

- परिणामी, दूधदरातही घट

दूध उत्पादन घटण्याची कारणे

- कमी पाणी मिळणे, हिरव्या चाऱ्याची कमतरता, वातावरणातील बदल आणि वाढते तापमान

- शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी गायींची अधिक ऊर्जा खर्ची पडते

...असे करा उपाय

- जनावरांचा गोठा हवेशीर असावा

- तापमान नियंत्रित ठेवावे

- हिरव्या चाऱ्याचे प्रमाण अधिक ठेवावे

- जनावरांना मुबलक पाणी पिण्यासाठी द्यावे

- उन्हाच्या झळा न लागण्याची काळजी घ्यावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT