India Maize Import : अमेरिका मका उत्पादनात जगात आघाडीवर आहे. पण अमेरिकेतील मका वापर कमी आहे. अमेरिकेच्या मक्याचा मुख्य ग्राहक चीन आहे. २०२०-२१ मध्ये अमेरिकेने ३१ टक्के मका चीनला निर्यात केला. परंतु त्यानंतर चीनने अमेरिकेतून मक्याची आयात कमी करत ब्राझीलमधून खरेदी वाढवली. चीनने २०२३-२४ मध्ये केवळ सहा टक्के मका अमेरिकेतून आयात केला. यंदाही चीन हेच धोरण राबवत आहे..दुसरीकडे यंदा अमेरिकेत मक्याचे उत्पादन विक्रमी पातळीवर पोहोचणार आहे. त्यामुळे अमेरिकेत मक्याचे भाव कमी उतरले. त्यामुळे तेथील मका उत्पादकांच्या लॉबीचा सरकारवर दबाव वाढत आहे. परिणामी, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनसोबत संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण केवळ चीनवर अवलंबून चालणार नाही, तर दुसरा पर्यायही असावा म्हणून भारतावर अमेरिकेचा मका घेण्यासाठी दबाव वाढवला जात आहे..Maize Pest Management: अशी रोखा मक्यावरील अमेरिकन लष्करी अळी.अमेरिकेचा मका हवा कशाला?देशात मक्याची टंचाई असेल म्हणजेच वापरापेक्षा देशातील उत्पादन कमी असेल तर आयात करणे समजू शकते. पण यंदा भारतातच मक्याचे उत्पादन गरजेपेक्षा अधिक होण्याची चिन्हे आहेत. देशात मागील पाच वर्षांपासून मक्याची लागवड आणि उत्पादन वाढत आहे. देशात २०२०-२१ मध्ये मक्याची लागवड जवळपास ९९ लाख हेक्टरवर झाली होती. ती २०२२४-२५ पर्यंत वाढून १२० लाख हेक्टरवर पोहोचली. या पाच वर्षांत मक्याचे उत्पादन ३३ टक्क्यांनी वाढून ४२३ लाख टनांपर्यंत पोहोचले. यंदा मक्याची लागवड आणि उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा अधिक होणार आहे. यंदाच्या खरिपात मक्याची लागवड जवळपास १३ टक्क्यांनी वाढली आहे. रब्बी आणि उन्हाळी हंगामातही मक्याची लागवड वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे चालू हंगामात मक्याचे उत्पादन जवळपास ५०० लाख टनांपर्यंत पोचण्याचा अंदाज काही कृषी शास्त्रज्ञांनी व्यक्त केला. तर बाजारातील अभ्यासकांच्या मते उत्पादन ४३० लाख टनांवर स्थिरावेल. देशातील मक्याचा वापर मागील वर्षभरात ४२८ लाख टन होता. चालू हंगामातही मक्याचा वापर याच पातळीला राहील किंवा काहीसा वाढू शकतो, असेही कृषी शास्त्रज्ञांचे मत आहे..भारतातील मक्याचा वापर आणि देशातील उत्पादन पाहता आयातीला जास्त वाव नाही. मागील वर्षभरात भारताने केवळ १० लाख टनांच्या आसपास मका आयात केला. त्यापैकी ६० टक्के आयात म्यानमारमधून झाली आणि उरलेली युक्रेनमधून. कारण भारतात केवळ नाॅन जीएम मका आयातीला परवानगी आहे. अमेरिकेत जीएम मका असतो. भारतात कापूस वगळता इतर जीएम पिकांना परवानगी नाही. भारत आपले हे धोरण कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.तसेही भारताची आयात मक्याची मागणी नगण्य आहे. कारण देशातील उत्पादन चांगले आहे. त्यामुळे भारताने मका आयात खुली केली तरी अमेरिकेला याचा फारसा फायदा होणार नाही. कारण भारत चीनप्रमाणे मक्याचा मोठा ग्राहक नाही. भविष्यात भारताची मक्याची गरज वाढेल पण दुसरीकडे देशातील हेक्टरी उत्पादकता वाढीसाठीही मोठी संधी आहे. त्यावर संशोधनात्मक पातळीवर काम सुरु असल्याचे कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले आहे. त्यामुळे भारताच्या मका बाजारपेठेकडून अमेरिकेला तसेही फारसे काही साध्य होण्याची शक्यता कमी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. पण अमेरिकेच्या मक्याला बाजारपेठ खुली केल्यानंतर देशातील मका उत्पादकांना भाव कमी मिळेल. हे जास्त धोकादायक आहे..भारताने इथेनाॅल निर्मितीसाठी मका घ्यावा, अशीही मागणीअमेरिका करत आहे. भारत ही मागणी मान्य करण्याच्या विचारात आहे, अशीही चर्चा सध्या सुरू आहे. पण देशातील मक्याचे वाढलेले उत्पादन आणि शेतकऱ्यांना मागील दोन वर्षांत मिळालेला दर, याचे श्रेय इथेनॉलला आहे. भारताने अमेरिकेची मागणी मान्य केल्यास इथेनाॅलसाठी देशातील मक्याचा वापर कमी होईल आणि दर पडतील. कारण देशात मक्याचा पुरवठा अतिरिक्त होईल. याची मोठी किंमत देशातील मका उत्पादकांना मोजावी लागेल. दुसरीकडे अमेरिकेचा जीएम मका आयात झाल्यानंतर भारताची नाॅन जीएम पिकांसाठीची ओळख संपुष्टात येईल. आयात मका इतर वापरासाठीही वळवला जाण्याचा धोका आहे. देशातील मका उत्पादन इथेनाॅल, पशुखाद्य आणि स्टार्च उद्योगाच्या गरजेपेक्षाही जास्त राहण्याची शक्यता असताना मक्याची आयात करणे चुकीचे ठरेल..Maize Cultivation : मका मळणीवर; काही भागांत कापणी सुरू.इथेनाॅल आयात खुली होईल?देशात सध्या इथेनाॅलची आयात केवळ औद्योगिक वापरासाठी होत आहे. त्यावरही १५० टक्के आयात शुल्क आणि १८ टक्के जीएसटी लागतो. तरीही अमेरिकेतून भारतात इथेनाॅल आयात वाढत असल्याचे दिसते. देशात इतर वापरासाठी इथेनाॅल आयातीवर बंधने आहेत. देशातील इथेनाॅलची गरज भागविण्यापुरती निर्मिती क्षमता उपलब्ध आहे. तसेच मका, इतर धान्य आणि मोलॅसीस उपलब्ध आहे.. त्याचे उत्पादनही दरवर्षी वाढत आहे. भारताने पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनाॅल मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य केले आहे. ई २० नावाने ओळखल्या जाणाऱ्या या धोरणामुळे कोट्यवधी डाॅलरची इंधन आयात कमी झाली. तसेच कार्बन उत्सर्जनही कमी झाले. पण दुसरीकडे इथेनाॅलचे मिश्रण वाढल्याने गाड्यांची कार्यक्षमता कमी होत असल्याची चर्चा सुरू झाली. इथेनाॅल मिश्रणाचे प्रमाण वाढविताना त्यासाठी सुसंगत इंजिनची निर्मितीही आवश्यक असते. .परंतु भारतात असे कुठलेही धोरण नसल्याचे इथेनाॅल मिश्रणाला विरोध करणाऱ्या गटाचे म्हणणे आहे. बायोडिझेलचे धोरण राबविणाऱ्या अमेरिका, ब्राझील तसेच इतर देशांमध्ये हे धोरण राबवले गेले. त्यामुळे या देशांमध्ये जैवइंधन वापराचे प्रमाण जास्त आहे. आपल्याकडे तशी स्थिती नाही. त्यामुळे इथेनाॅल उद्योगाने ई २७ धोरण जाहीर करण्याची मागणी केली असली तरी लगेच इथेनाॅल मिश्रणाचे प्रमाण वाढविण्याचा सरकार विचार करण्याची शक्यता कमीच आहे. म्हणजेच देशात इथेनाॅलची मागणी ई २० उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता सध्या तरी कमीच दिसते. त्यामुळे भारत सरकार अमेरिकेतून मक्याऐवजी इथेनाॅलची आयात करणार असल्याच्या चर्चेलाही ठोस आधार दिसत नाही.भारताने अमेरिकेतून स्वस्त इथेनाॅल आयात केल्यास देशातील मका, तांदूळ तसेच मोलॅसिसपासून निर्मित इथेनाॅलचे काय करायचे, हा प्रश्न निर्माण होईल. आयातीमुळे देशातील इथेनॉलचे दर पडतील. कारण अमेरिकेतून आयात तेव्हाच शक्य होईल जेव्हा भाव कमी असतील. मग देशातील महाग इथेनाॅल कोणत्या तेल विपणन कंपन्या विकत घेतील? सरकारने मक्यापासून निर्मित इथेनाॅलचे दर जवळपास ७१.८६ रुपये प्रतिलिटर निश्चित केलेले आहेत. तसेच तांदळापासून निर्मित इथेनाॅल ६०.३२ रुपये, थेट उसाचा रस आणि साखरेपासून निर्मित इथेनाॅल ६५.६१ रुपये, बी हेव्ही मोलॅसीस इथेनाॅल ६०.७३ रुपये आणि सी हेव्ही मोलॅसीसचा दर ५७.९७ रुपये आहे. सरकारने इथेनाॅलचे दर ठरवून दिल्यामुळे देशातील उत्पादन वाढत आहे. पण अमेरिकेतून आयात होणाऱ्या इथेनाॅलचा वापर औद्योगिक क्षेत्राच्या व्यतिरिक्त इंधनात करायचा विचार केला तर देशातील इथेनाॅल उद्योगाला मोठा फटका बसेल. त्यामुळे सरकार जास्तीत जास्त औद्योगिक वापरासाठीच्या इथेनाॅल आयातीवरील शुल्क कमी करू शकते. पण सरसकट इथेनाॅल क्षेत्र खुले करणार नाही, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे..भारताचा मेक्सिको व्हायला नको ःअमेरिकेच्या मक्याने मेक्सिकोतील मका उत्पादक शेतकऱ्यांना देशोधडीला लावल्याचा इतिहास ताजा आहे. मेक्सिकोने १९९० मध्ये अमेरिकेसोबत मुक्त व्यापार करार केला होता. त्यानंतर मेक्सिकोत अमेरिकेतून मका आयात वाढायला सुरुवात झाली. अमेरिकेचा मका स्वस्त असल्याने मेक्सिकोतील लाखो शेतकरी मक्यापासून दूर गेले. हे मका उत्पादक शेतकरी नंतर अमेरिकेच्याच कंपन्यांमध्ये कामगार म्हणून काम करू लागले. तेव्हापासून आजपर्यंत मेक्सिकोतील मका उत्पादनाला कायमची उतरती कळा लागली. कारण अमेरिका स्वस्त मका देते आणि मेक्सिकोतील शेतकऱ्यांना जास्त भाव हवा आहे. या कात्रीतून मेक्सिको अद्यापही सुटला नाही. इच्छा नसूनही मेक्सिकोला दरवर्षी अमेरिकेतून २४० ते २५० लाख टनांच्या आसपास मका आयात करावा लागतो..अमेरिकेचा स्वस्त शेतीमाल एखाद्या देशातील पीकपद्धती कशी संपवू शकते, याचे हे बोलके उदाहरण आहे. भारतालाही खाद्यतेलाच्या बाबतीत असा अनुभव आला आहे. स्वस्त खाद्यतेलाच्या मोहापायी भारताला आज खाद्यतेल पुरवणाऱ्या देशांच्या इशाऱ्यावर चालावे लागते. हा अनुभव आणि मेक्सिकोच्या उदाहरणावरून धडा घेत भारत सरकार अमेरिकेच्या मक्याला आपली बाजारपेठ खुली करणार नाही, ही शक्यता अधिक दिसते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.