Maghi Vari  Agrowon
ताज्या बातम्या

Maghi Vari : ‘माझा भाव तुझे चरणी, तुझे रुप माझे नयनी’

Team Agrowon

पंढरपूर, जि. सोलापूर ः ‘माझा भाव तुझे चरणी, तुझे रुप माझे नयनी’ या अभंगाप्रमाणे माघी वारीच्या (Maghi vari) आनंद सोहळ्यात सहभागासाठी दाखल झालेले वारकरी बुधवारी (ता.१) श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शन (Vitthal_Rukamini Temple) आणि चंद्रभागेतील स्नानाने तृप्त झाले.

तसेच टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने या आनंद सोहळ्यातील क्षण डोळ्यांत साठवत भक्तिमध्ये एकरुप झाले. या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे पाच लाखापर्यंत वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत.

आषाढी-कार्तिकीप्रमाणे माघी वारीही महत्त्वाची मानली जाते. राज्याच्या विविध भागातून मंगळवारी (ता.३१) दशमीला विविध दिंड्या आणि पालख्यांचे येथे आगमन झाले.

त्याशिवाय एस. टी., रेल्वे तसेच खासगी वाहनांमधून मोठ्या संख्येने वारकरी पंढरीत दाखल होत होते. बुधवारी (ता.१) दिवसभर वारकऱ्यांची रेलचेल पंढरीत राहिली.

थंडीचे दिवस असतानाही बुधवारी एकादशीचा पर्वकाळ साधण्यासाठी चंद्रभागा नदीवर स्नानासाठी पहाटेपासूनच वारकऱ्यांची गर्दी झाली होती.

स्नानानंतर वारकरी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्शदर्शन, मुखदर्शनासाठी तर काहीजण नगर प्रदक्षिणेसाठी निघत होते.

शहरातील विविध मंदिरे, धर्मशाळा, मठांमध्ये अखंडपणे कीर्तन, प्रवचने रंगल्याचे, तर अनेक ठिकाणी भजनाचे सूर या वातावरणात आणखीनच गोडवा निर्माण करत असल्याचे चित्र होते.

टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमून गेली. विशेषतः चंद्रभागा नदीकाठ, विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रस्ता या भागात दिंड्या, पालख्यांतून वारकरी भजन म्हणत प्रदक्षिणा पूर्ण करत असल्याचे दिसत होते.

दर्शन रांगेसाठी तात्पुरती सहा शेड उभारली आहेत. बुधवारी गोपाळपूरच्या पुढील शेडपर्यंत ही रांग गेली. साधारण प्रतिमिनिटाला ४० ते ५० वारकरी पदस्पर्शदर्शन घेऊन बाहेर पडत होते.

दर्शन रांगेमध्ये वारकऱ्यांना मंदिर समितीच्या वतीने खिचडी आणि चहाचे वाटप करण्यात येत होते. दरम्यान पहाटे मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणीदेवीची महापूजा करण्यात आली.

वारकऱ्यांसाठी सोई-सुविधा

माघी यात्रेच्या कालावधीत पंढरपुरात येणाऱ्या दिंड्यांना मुक्कामासाठी तसेच भजन-कीर्तनासाठी प्रशासनाकडून मोफत जागा देण्यात आली आहे. ६५ एकरांमध्ये ४३५ प्लॉटचे वाटप झाले आहे.

त्यापैकी ३०० हून अधिक दिंड्या दोन दिवस आधीच विसावल्या आहेत. तसेच मंगळवारपर्यंत तिथे ३ लाख ३८ हजार २२७ भाविकांची नोंदणी झाली.

याठिकाणी प्रशासनाने पिण्याचे शुद्ध पाणी, लाइट, सुरक्षा, आरोग्यविषयक सुविधा, शौचालय आदी सुविधा पुरविल्या आहेत. भाविकांच्या मदतीसाठी व आवश्यक सेवा सुविधांसाठी आपत्कालीन मदत केंद्रही कार्यरत ठेवली होती. त्यामुळे वारकऱ्यांची सोय झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT