Kisan Sabha Update : महसूलमंत्र्यांसोबत झालेल्या पहिल्या बैठकीत कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने अखेर किसान सभेच्या (Kisan Sabha) शेतकऱ्यांनी पायी मोर्चाला (Kisan Long March) सुरूवात केली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शेतकरी आंदोलनाची दखल घेतली आहे.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांच्यासह कामगार मंत्री अशोक खाडे आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची आज (ता.२७) दुपारी किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत बैठक होणार आहे.
शेतकरी आणि कामगारांच्या विविध प्रश्नांसदर्भात किसान सभेने अकोले ते लोणी पायी मोर्चाची हाक दिली आहे. किसान सभेच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आंदोलनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (ता.२५) मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली किसान सभेच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली. मात्र, संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित नसल्याने कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे किसान सभेने आक्रमक पवित्र घेत आंदोलनाची भूमिका कायम ठेवली.
चर्चेनंतर आंदोलनाची दिशा ठरणार
शेतकरी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले ते लोणी असा पायी मोर्चा किसान सभेच्या नेतृत्त्वात काढण्यात आला आहे.
तीन दिवस पायी चालून मोर्चा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर धडकणार आहे.
दरम्यान, मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री शिंदेंनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेतली असून महसूलमंत्र्यासह अन्य दोन मंत्र्याच्या उपस्थितीत किसान सभेचे शिष्टमंडळासोबत त्यांची बैठक होणार आहे.
सरकारने राजकीय इच्छाशक्ती दाखवली नाही, तर हा पायी मोर्चा लोणीच्या दिशेने सुरूच राहील, असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे.
तरच मोर्चा स्थगित करू
मंत्र्यासोबतच्या बैठकीपूर्वी किसान सभेचे शिष्टमंडळांची एक औपचारिक बैठक होणार असून यामध्ये कोणते मुद्दे मांडायचे, याबद्दलची चर्चा होणार आहे. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आणि लेखी आदेश मिळाले तरच मोर्चा स्थगित करण्याबाबत विचार करू, अशी भूमिका डॉ. अशोक ढवले यांनी मांडली. सरकार दिलेली आश्वासने पाळत नसल्याने पुन्हा एकदा लाँग मार्च काढण्याची वेळ आली, असेही ते म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.