Maharashtra Budget Session 2023 मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या प्रतिमेला सत्ताधारी आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोडे मारो आंदोलन केल्याचे पडसाद शुक्रवारी (ता. २४) विधानसभेत उमटले.
यावरून प्रथम काँग्रेसने (Congress) आक्रमक पवित्रा घेत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. तर प्रत्युत्तरादाखल भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) आमदारांनीही गोंधळ घातल्याने प्रश्नोत्तराचा तास वाया गेला. या वेळी काँग्रेस आमदारांनी विधानसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.
दरम्यान, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करणारे आमदार आाणि विधानसभेत पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या आमदारांविरोधात शनिवारी (ता. २५) कारवाईचे संकेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.
विधिमंडळ आवारात आमदारांसाठी आचारसंहिता तयार करण्यात येणार असून तिचे उल्लंघन झाल्यास काय कारवाई करता येईल, याबाबतही स्पष्टता येणार आहे.
काँग्रेस खासदार आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात आंदोलन करताना गुरुवारी (ता. २३) सत्ताधारी पक्षांतील काही आमदारांकडून राहुल यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.
याप्रकरणी काँग्रेसच्या आमदारांनी शुक्रवारी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतला. शुक्रवारी विधानसभेचे नियमित कामकाज सुरू होताच काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी या सर्व प्रकरणाबद्दल नाराजी व्यक्त केली.
हा सर्व प्रकार गंभीर असून आंदोलनात तालिका अध्यक्षांचाही समावेश असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी पटोले यांनी केली.
याविरोधात भाजपचे आशिष शेलार यांनी विरोधकांच्या आंदोलनाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. गुरुवारी झालेल्या घटनेचे समर्थन करण्यात येणार नाही. असंसदीय प्रकार आम्हांला मान्य नाही. परंतु गेल्या आठ महिन्यांपासून विरोधकांकडून ‘खोके’ आणि ‘गद्दार सरकार’ बोलले जाते, त्यांच्यावरही कारवाई करा, अशी मागणी शेलार यांनी या वेळी केली.
यामुळे सभागृहात विरोधकांनी घोषणाबाजी सुरू करीत ‘मोदी सरकार चोर हैं’, च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. या सर्व प्रकारामुळे विधानसभेचे कामकाज प्रथम २० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले. सत्ताधारी आणि विरोधकांचा हा गोंधळ लक्षात घेता सभागृहाचे कामकाज एकूण तीनवेळा स्थगित करण्यात आले. त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास वाया गेला.
दरम्यान, सभागृह सुरू झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भातील निर्णय जाहीर केला. त्या वेळी नार्वेकर म्हणाले, की विधान भवनाच्या आवारात गुरुवारी जी घटना घडली. ती अत्यंत चुकीची होती, याबद्दल कोणाच्याही मनात दुमत नाही. त्याचप्रमाणे शुक्रवारी सभागृहात काही सदस्यांकडून पंतप्रधानांबाबत जे वक्तव्य करण्यात आले.
तेही चुकीचे असून तेदेखील शोभनीय नाही. यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संसदीय कामकाज मंत्री आणि इतर दोन्ही बाजूच्या सदस्यांसोबत माझी चर्चा झाली आहे.
यासंदर्भात सभागृहातील आणि सभागृहाबाहेरील माहिती तपासून घेणार आहे. त्यानंतर शनिवारी (ता. २५) यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्यासंदर्भात निर्णय घेईल. वारंवार विधानभवनाच्या आवारात अशा प्रकारच्या घटना घडत आहेत.
मुख्यमंत्र्यांबाबत असो किंवा पंतप्रधानांसह इतर नेत्यांसंदर्भात अशा प्रकारच्या घटना घडत आहेत.
त्यामुळे यासंदर्भात विधानभवनाच्या आवारात आचारसंहिता काय असावी, याबाबत मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जाहीर करण्यात येणार असून ती सर्व सदस्यांना पाळणे बंधनकारक असणार असल्याचे त्यांनी या वेळी जाहीर केले.
तर या वेळी बाळासाहेब थोरात यांनीदेखील जे काही वर्तन झाले, त्यावर निर्णय घेण्याची मागणी लावून धरली.
आम्हाला खोके, चोर, गद्दार म्हणणाऱ्यांवर कारवाई करा : मुख्यमंत्री
गुरुवारी (ता. २३) जी घटना घडली, त्याचे समर्थन करता येणार नाही. पण शुक्रवारी सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे हा देशाचा अपमान आहे.
गेले आठ महिने मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून त्यांना ‘गद्दार’, ‘खोके’, ‘मिंधे’ म्हणणे हे कोणत्या आंचारसंहितेत बसते, जर प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई होणार असेल तर आमच्याविरोधात पायऱ्यांवर घोषणा देणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तर सभागृहाचे पावित्र जपण्याची गरज असल्याचे मत त्यांनी या वेळी अधोरेखित केले.
मात्र, सावरकरांचा वारंवार अपमान करणे, हेदेखील देशद्रोह्यांचेच काम आहे. देशाची कीर्ती जगभरात पोहोचविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. देशाच्या पंतप्रधानांचा अपमान देशातील जनता कधीच सहन करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांचा सभात्याग
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या आंदोलनाचा उल्लेख करत भाष्य केल्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी आक्षेप घेत ही चुकीची पद्धत आहे, असे सांगूत सभात्याग केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.